Sunday, March 26, 2017

अभाविप(ABVP) च्या ‘डिपेक्स २०१७’ मध्ये राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या “एम.एच.०८ रेसिंग कारचे” कौतुक !!


फोटो:- महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री मा. श्री. विनोद तावडे यांनी टीम एम.एच.०८ रेसिंग कार कारला भेट देऊन उत्सुकतेने माहिती जाणून घेतली.
  प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील एम.एच.०८ रेसिंग टीमने यावर्षी बनवलेल्या रेसिंग कारचे प्रदर्शन ‘डिपेक्स २०१७’ या तांत्रिक प्रदर्शनामध्ये करण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व सृजन यांच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनामध्ये हि रेसिंग कार आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. महाराष्ट्राच्या विविध प्रांतामधून
आलेल्या विद्यार्थ्यांनी या रेसिंग कारचे विशेष कौतुक केले.
  आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विविध शाखांमधील ३० विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हि रेसिंग कार बनवली आहे.महालक्ष्मी या नावाने प्रसिध्द असलेल्या या रेसिंग कारने राष्ट्रीय पातळीवर कौतुकास्पद कामगिरी केली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत यांच्या प्रोत्साहनातून तसेच शिक्षक सल्लागार प्रा.ओंकार भाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कारने फॉर्म्युला स्टुडंट इंडियाचा मोस्ट पॉप्युलर कार ऑफ इंडियाहोण्याचा बहुमान पटकावला आहे.
  ‘डिपेक्स २०१७’ प्रदर्शनामध्ये लहानांपासून दिग्गजांपर्यंत सर्वांनीच प्रदर्शनस्थळी भेट देऊन टीमला शाबासकीची थाप दिली. शिक्षणमंत्री मा. श्री. विनोदजी तावडे तसेच डीआरडीओ चे डायरेक्टर मा.डॉ.बी.व्ही.परळीकर यांनी कारला भेट देऊन उत्सुकतेने माहिती जाणून घेतली. मा. विनोदजी तावडे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. डिपेक्समध्ये विशेष कौतुकास पात्र ठरलेल्या या कारच्या निर्मितीमध्ये संस्थाध्यक्ष मा.श्री.रवींद्रजी माने यांच्या प्रेरणेने व प्राचार्य डॉ.महेश भागवत यांच्या सहकार्याने हे यश मिळाल्याचे विद्यार्थी सांगतात.
  या रेसिंग कारच्या निर्मितीमध्ये सुमारे १० लाखांचा खर्च आला असून यामध्ये संस्थेने सिंहाचा वाटा उचलला.या कारचे संपूर्ण डिझाईन व निर्मिती हि विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून आकारास आली आहे.सदर प्रदर्शनामध्ये कॅ.प्रणित वाटवे,नंदन प्रभूतेंडोलकर,सुयश सावंत,रणजित जाधव,आदित्य कदम,अभिजित सकपाळ,प्रणव सावंत,ओंकार सकपाळ,अमित माळी,अजिंक्य पाटील,वैभव बावधनकर यांनी सहभाग घेतला.


Saturday, March 4, 2017

"ग्राहक जागरूकता आणि आर्थिक साक्षरता ” या विषयावर माने अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न ‼  आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅंड टेक्नॉलॉजी मध्ये ग्राहक जागरूकता आणि आर्थिक साक्षरता या विषयावर उद्योजकता विकास विभागातर्फे कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी समन्वयक प्रा. स्वाती बिर्जे यांनी श्री. विक्रांत जिंदाल आणि श्री. प्रफुल्ल पवार या मार्गदर्शकांची ओळख करून दिली. ही कार्यशाळा महाविद्यालयाच्या उद्योजकता विकास विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी व सर्व अंतिम वर्ष विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. दिवसभराच्या तीन सत्रात या व्याख्यानाचा सुमारे २०० विद्यार्थी व ३५ प्राध्यापक यांनी लाभ घेतला.

  श्री. विक्रांत जिंदाल यांनी ग्राहक जागरूकता या विषयावर सखोल मार्गदर्शन करताना आपल्या दैनंदिन खरेदीमध्ये ग्राहकांची होणारी फसवणूक, त्यावर ग्राहकांनी भारताची ‘ग्राहक मार्गदर्शन व तक्रार निवारण केंद्र’ यांच्याकडे तक्रार कशी करावी याचे विवेचन केले. श्री. प्रफुल्ल पवार यांनी भारताची डिजीटल इंडिया कडे होणारी वाटचाल व त्यासाठीची आवश्यक कॅशलेस अर्थव्यवस्था, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असणारी स्मार्ट गुंतवणुकीची गरज, आर्थिक साक्षरता हे विषय आकर्षक व्हिडिओजद्वारे, विविध उदाहरणांसहीत उत्तमप्रकारे मांडले.
 
  या कार्यशाळेचे आयोजन उद्योजकता विकास विभागाचे विभागप्रमुख  प्रा.अजित तातुगडे व  समन्वयक प्रा. स्वाती बिर्जे यांनी केले. समारोप प्रसंगी उद्योजकता विकास विभागप्रमुख  प्रा.अजित तातुगडे यांनी मार्गदर्शक श्री.विक्रांत जिंदाल आणि श्री.प्रफुल्ल पवार तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत व संस्थाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी माने यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.Friday, March 3, 2017

माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उद्योजकता विकास विभागातर्फे “व्यवसायातील संधी, आव्हाने व शासकीय संस्थांची भूमिका ” या विषयावर कार्यशाळा संपन्न ‼!फोटो:- डावीकडून उद्योजकता विकास विभागप्रमुख प्रा.अजित तातुगडे, श्री.किरण धायगुडे, मार्गदर्शक श्री. राजेश पवार, समन्वयक प्रा. स्वाती बिर्जे व विद्यार्थी

  आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅंड टेक्नॉलॉजी मध्ये उद्योजकता विकास विभागातर्फे व्यवसायातील संधी, आव्हाने व शासकीय संस्थांची भूमिका या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेच्या  उद्घाटनप्रसंगी इलेक्ट्रोनिक्स व टेलिकाम्युनिकेशन विभागाच्या समन्वयक प्रा. स्वाती बिर्जे यांनी मार्गदर्शक श्री. राजेश पवार यांची ओळख करून दिली. या कार्यशाळेला श्री. राजेश पवार, डायरेक्टर, मायक्रो इनोटेक इंडिया प्रा.लि.,पुणे यांचे मार्गदर्शन लाभले. ही कार्यशाळा महाविद्यालयाच्या उद्योजकता विकास विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचा सुमारे ६० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी विद्यार्थ्यांचा उद्योजकतेकडे कल असावा व त्यांच्यात रुची निर्माण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

  विद्यार्थ्यांना संबोधित करताना आपल्या अनुभवातून त्यांनी सांगितले की स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये प्रथमत: अनुभव घेऊन त्यानंतरच व्यवसायाला सुरुवात करावी, ज्यामुळे त्यातील अडचणी काम करतानाच समजू शकतात. व्यवसायातील संधी कशा ओळखाव्यात याचे सुयोग्य मार्गदर्शन करताना ते म्हणाले की इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना केवळ त्यातील एकाच विभागामध्ये काम न करता इतरही संलग्न विभागांचा सर्वांगीण अभ्यास करावा ज्यामुळे स्वत:चा व्यवसाय सुरु करताना तुम्हाला निशितच फायदा होईल.
  आपल्या व्यवसायाचे मार्केटिंग करताना जर आपल्याला अगोदर काम केलेल्या इंडस्ट्रीच्या प्रॉडक्ट मार्केटिंगचा अनुभव असेल तर त्याचा उपयोग नक्कीच तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी होतो असे त्यांनी त्यांच्या स्वानुभवातून सांगितले. औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी असलेल्या शासकीय संस्थांच्या भूमिकेबद्दलही त्यांनी विवेचन केले. कॉलेज मध्ये असतानाच उद्योजकतेची मुळे कशी रुजवावित याविषयी सांगताना त्यांनी “इनक्युबेशन सेंटर” निर्माण करण्याची आणि त्यासाठी लागणारा निधी कॉलेजच्या प्रतिष्ठित माजी विद्यार्थ्यांकडून देणगी स्वरूपात जमा करण्याची  सूचना केली.

  या कार्यशाळेचे आयोजन उद्योजकता विकास विभागाच्या समन्वयक प्रा. स्वाती बिर्जे व विभागप्रमुख  प्रा.अजित तातुगडे यांनी केले. समारोप प्रसंगी उद्योजकता विकास विभागप्रमुख  प्रा.अजित तातुगडे यांनी मार्गदर्शक श्री. राजेश पवार तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . महेश भागवत व संस्थाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी माने यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅंड टेक्नोलॉजीमध्ये “पदवी प्रमाणपत्र वितरण” सोहळा संपन्न !!


फोटो :- पदवीप्रदान सोहळ्याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी मनोज पवार तसेच अध्यक्षस्थानी संस्थाध्याक्ष मा. श्री.रविंद्र माने, प्रमुख पाहुणे  श्री.एस. बी.नाईकवाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत,परीक्षा विभागप्रमुख प्रा.विश्वनाथ जोशी, प्रा.एस. डी. देठे
 आंबव, देवरुख येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित, मुंबई विद्यापीठ संलग्न राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅंड टेक्नोलॉजीमध्ये पदवी प्रमाणपत्र प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मुंबई विद्यापीठाच्या निर्देशानुसार महाविद्यालयातच पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात येते. या पदवीप्रदान सोहळ्यासाठी अध्यक्षस्थानी संस्थाध्याक्ष मा. श्री. रविंद्र माने उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे श्री. एस. बी. नाईकवाडे (सुप्रीटेंडंट, चॅरिटी कमिशनर ऑफीस, रत्नागिरी), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  महेश भागवत, परीक्षा विभागप्रमुख प्रा.विश्वनाथ जोशी, प्रा.एस. डी. देठे उपस्थित होते. दिपप्रज्वलनानंतर सरस्वतीपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

   प्रा.विश्वनाथ जोशी यांनी आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या यशस्वी निकालाचे विश्लेषण केले. महाविद्यालयातून पदवी प्राप्त करणारी ही १५ वी बॅच असून आत्तापर्यंत ३७८४ विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली आहे. याही वर्षी सर्वच विभागामध्ये महाविद्यालयाचे निकाल हे विद्यापीठाच्या सरासरी निकालापेक्षा सरस ठरले आहेत. महाविद्यालयाच्या विविध शाखांचे निकाल अनुक्रमे कॉम्प्युटर विभाग ९८.२८%, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभाग १००%, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम विभाग ९८.३९%, मेकॅनिकल विभाग ९६.७७%, ऑटोमोबाईल विभाग ९३.८८% व एम.एम.एस. विभाग ९५.८३% असे आहेत. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरुपात भरत देवरुखकर, मनोज पवार, अनिकेत गावकर, विभावरी देसाई, कौशल हलवाई, पुष्कर सावंत, झिलू राणे, सुभाषचंद्र जोशी या स्नातकांनी महाविद्यालयाप्रती आपल्या कृतज्ञता व्यक्त केल्या व आपल्या करिअरमध्ये संस्थेचे व प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे असे आवर्जून नमूद केले.

    आपल्या स्वागतपर भाषणात प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी स्नातकांना पदवी हा आयुष्याचा एक महत्वाचा भाग असून ही नवीन आयुष्याची सुरुवात असल्याची जाणीव करून दिली. विद्यार्थ्यांच्या मागील चार वर्षांच्या श्रमाचे फळ त्यांना मिळाले तसेच मागील वर्षी महाविद्यालयाच्या ४० विद्यार्थ्यांना चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. नुकतीच महाविद्यालयाने माजी विद्यार्थ्यांसाठी चॅरिटी कमिशनर ऑफीसबरोबर(धर्मादाय आयुक्त संस्थेबरोबर) नोंदणी केली आहे असे ते म्हणाले. यापुढील काळातही माजी विद्यार्थ्यांनी संस्थेशी संपर्कात राहावे असे आवाहनही त्यांनी केले. 

  याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री.एस.बी.नाईकवाडे (सुप्रीटेंडंट,चॅरिटी कमिशनर ऑफीस,रत्नागिरी) हे स्वत: MPSC स्पर्धा परीक्षेचे ट्रेनर असून त्यांनी उपस्थित स्नातकांना शासकीय सेवा नोकरी संदर्भात अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. शासकीय सेवेमध्ये लोकांच्या हितासाठी काम करणे महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले. निर्णयक्षमता, अभ्यासाचे नियोजन योग्यप्रकारे करणे, अभ्यासातील सातत्य, स्वपरीक्षण करणे याचे महत्त्व त्यांनी विशद केले. स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी आपला विद्यार्थ्यांचा गट असणे, आपले काय चुकते आहे हे कळणेसुद्धा आवश्यक आहे असे त्यांनी नमूद केले.
 
    आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री.रविंद्र माने यांनी उपस्थित स्नातकांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. श्री. माने यांनी सांगितले की ज्ञानाचा व बुद्धिमत्तेचा वापर हा आपल्या देशाच्या विकासासाठी व्हायला हवा कारण आपण विद्यार्थीच या समाजाचे आधारस्तंभ आहात त्यामुळे आपणाकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. यशासाठी मी जिंकणारच ही भावना असणे महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले.

  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परीक्षा विभागप्रमुख प्रा.विश्वनाथ जोशी तसेच प्रा.गुरुप्रसाद बुर्शे, प्रा.वैभव डोंगरे, प्रा.स्नेहल मांगले, प्रा.प्रसाद माने, प्रा.प्रल्हाद गमरे, प्रा.विस्मयी परुळेकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन प्रा.एस. डी. देठे यांनी केले. प्रा. इसाक शिकलगार यांनी आभारप्रदर्शन केले.माने अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष शिक्षक पालक सभा संपन्न !!
फोटो:- शिक्षक-पालक सभेप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ.महेश भागवत तसेच संस्थाध्यक्ष मा.श्री.रविंद्रजी माने,सौ.नेहाजी माने,विभागप्रमुख प्रा.दीपक सातपुते, पालक प्रतिनिधी श्री.वासुदेव अणेराव व उपस्थित पालक
  देवरुख येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय आंबव येथे शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न झाली.सदर सभेसाठी संस्थाध्यक्ष मा.श्री.रविंद्रजी माने,सौ.नेहाजी माने, प्राचार्य डॉ.महेश भागवत,विभागप्रमुख प्रा.दीपक सातपुते, पालक प्रतिनिधी श्री.वासुदेव अणेराव,प्राध्यापकवृंद तसेच प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
  सभेची सुरुवात परीक्षाविभागप्रमुख श्री.विश्वनाथ जोशी यांच्या प्रेझेन्टेशनने झाली.त्यांनी मुंबई विद्यापीठाची बदललेली गुणांकन पद्धती(CBGS) विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.त्यानंतर सभेचे समन्वयक श्री.सातपुते यांनी सदर सभेच्या आयोजनाचा उद्देश व हेतू स्पष्ट केला. प्राचार्य डॉ. भागवत यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सदर केला. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची ओळख करून दिली.तसेच संस्थेमार्फत प्रथम व शेवटच्या वर्षातील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेने सुरु केलेल्या विशेष पारितोषिकांची घोषणा केली.
  यावेळी आयोजित चर्चासत्रात सर्व पालकांनी उत्स्फुर्त संवाद साधला. पालकांनी महाविद्यालयाची शिक्षणपद्धती तसेच उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त करून त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होत असल्याचे नमूद केले. पालकांनी  विविध सूचना नोंदविल्या तसेच त्यांच्या अंमलबजावणीसाठी सहकार्याचे अनुमोदनही दिले.
  संस्थाध्यक्ष मा.श्री.रविंद्रजी मानेसाहेबांनी अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांच्या सोयी(क्रीडा,ग्रंथालय,खानावळी,कमी मूल्यात जेवण)तसेच रोजगाराभिमुख शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले.त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध उपलब्ध संधीची माहिती दिली.तसेच शिक्षकांसोबत पालकांची त्यांच्या पाल्याप्रती जबाबदारीची जाणीवही करून दिली. महाविद्यालयातर्फे आत्तापर्यंत सुमारे ६५ विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण प्रदान केल्याचेही त्यांनी नमूद केले. महाविद्यालयाचे विद्यार्थी देश तसेच विदेशातही कार्यरत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.शेवटी पालकांनी पाल्यांच्या मानसिक तसेच शारीरिक बदलाकडे विशेष लक्ष देण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
  श्री.वासुदेव अणेराव यांनी पालक प्रतिनिधी म्हणून नेमणूक केल्याबद्दल तसेच बोलण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले.तसेच परीक्षा मुल्यांकन पद्धत समजावून सांगितल्याबद्दल श्री.जोशी सरांचेही आभार मानले. महाविद्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.प्रा.शिल्पा फलटणे यांनी सभेचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे बहुमोल सहकार्य लाभले.


 
माझ्या मराठीची बोलू कौतुके परि अमृतातेही पैंजा जिंके”

  


  मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील “ग्रंथालय विभाग व मराठी भाषा साहित्य मंडळ “ यांच्या संयुक्तविद्यमाने ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला.
  मराठी भाषेला मोठा वारसा मिळाला आहे.मराठी भाषेचे अस्तित्व टिकविण्यासाठी मराठी भाषेचा वापर होणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने  आपल्या वाढदिवसानिमित व विशेषतः महिलांनी हळदी कुंकू निमित्त एकतरी पुस्तक विकत घेवून प्रथम ते वाचा व आपल्या जवळच्या वाचनालयास भेट द्या म्हणजे वाचनसंस्कृती टिकवीण्यास मदत होईल, असे  मत कार्यक्रमाचे पाहुणे डॉ. सुरेश जोशी यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमात त्यांनी कुसुमाग्रज यांच्या “ विशाखा काव्यसंग्रहातील  “ कोलंबस गर्वगीत “ या कवितेचे वाचन केले व कवितेतील आशय विषद केला.
  मराठी भाषा टिकविण्यासाठी सर्वांनी मराठीचे वाचन केले पाहिजे,भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी मराठी भाषेचे योगदान महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे  ज्येष्ठ कवी ,लेखक यांच्या लेखनाविषयी संस्थेचे चेअरमन मा. रवींद्र माने यांनी आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमानिमित्त ग्रंथालयातर्फे मराठी पुस्तकांचे एक दिवसीय ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले . मुलांच्या साहित्याला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी “लक्षवेध” नावाच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले ,यावेळी संस्थेच्या सदस्या जान्हवी माने उपस्थित होत्या .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी श्रेया पालकर यांनी केले . ग्रंथालय प्रमुख प्रा. जितेंद्र खैरनार यांनी कुसुमाग्रज यांच्या साहित्याची ओळख करून दिली. प्राचार्य डॉ. महेश भागवत व ग्रंथालय प्रमुख प्रा. जितेंद्र खैरनार यांनी  विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त ग्रंथालयाचा वापर करावा , रोज एक तास तरी मराठी वाड्मयाचे वाचन व वर्तमानपत्रातील लेखांचे वाचन करावे यासंदर्भात मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचा समारोप प्रा. सुदर्शन जाधव यांनी केला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रंथालय समिती व मराठी भाषा साहित्य मंडळ यातील सभासद यांनी विशेष मेहनत घेतली .राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या “आरोहन २०१७” चे शानदार उदघाटन !!प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आरोहन २०१७या    वार्षिक कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे शानदार उदघाटन करण्यात आले. संस्थाध्यक्ष व महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री श्री. रवींद्रजी माने यांच्या शुभहस्ते पार पडलेल्या या उदघाटन प्रसंगी संस्थेचे सहसचिव श्री.दिलीप जाधव, संचालिका जान्हवी माने,प्रमुख पाहुणे व आठल्ये सप्रे कॉलेजचे क्रीडा शिक्षक व हॉकी ट्रेनर श्री.सागर पवार, प्राचार्य डॉ. महेश भागवत, महाविद्यालयाच्या सर्व विभागांचे विभागप्रमुख, आरोहनचे क्रीडा समन्वयक प्रा.विकास मोरे तसेच सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. विश्वनाथ गुरव  व्यासपीठावर उपस्थित होते.
  महोत्सवाची सुरुवात इशस्तवनाच्या  मंगल सुरांमध्ये मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर  मान्यवरांचे महाविद्यालयातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आरोहनची क्रीडाज्योत श्री कालीश्री मंदिरात प्रज्वलित करून मिरवणुकीने क्रीडांगणामध्ये आणण्यात आली.  या क्रीडाज्योतीची मा. श्री. रवींद्रजी माने यांच्या हस्ते क्रीडांगणामध्ये स्थापना करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विभागवार सुरेख व शिस्तबद्ध संचालन करून मान्यवरांना मानवंदना दिली. याप्रसंगी विद्यार्थी क्रीडाप्रमुखाने सहभागी विद्यार्थ्यांना खिलाडूवृत्ती व निष्ठेची शपथ दिली.
  प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना खेळामध्ये खिलाडूवृत्तीचे महत्त्व विषद केले व पुढील दहा दिवस चालणा-या विविध कला व क्रीडा प्रकारांमधील स्पर्धांमध्ये त्याची जोपासना करावी असे सांगितले. तसेच याप्रसंगी प्राचार्यांनी विविध अॅवार्ड्सची घोषणा केली.यामध्ये चेअरमन’स्  अॅवॉर्ड् सर्वोत्तम विद्यार्थी व सर्वोत्तम खेळाडूसाठी ,कै.श्री.राजेंद्र माने अॅवॉर्ड् प्रथम वर्ष अभियांत्रिकीमधील प्रथम क्रमांकासाठी, कै.श्रीमती. इंदुमती माने अॅवॉर्ड् प्रत्येक विभागाच्या अंतिम वर्षाच्या प्रथम क्रमांकासाठी जाहीर करण्यात आले.
  प्रमुख पाहुणे श्री.सागर पवार हे सध्या आठल्ये सप्रे कॉलेजमध्ये  क्रीडा शिक्षक व हॉकी ट्रेनर आहेत.भारतीय हॉकी संघाचे ते गोलकीपरदेखील होते.विविध हॉकी स्पर्धांमध्ये त्यांनी भारताचे नेतृत्वदेखील केले आहे. त्यांनी आपल्या भाषणामध्ये खेळाचे महत्त्व विशद केले तसेच आपल्या लहानपणापासून प्रतिकूल परिस्थितीतही आपण कसे घडलो याचे विवेचन केले.आपल्या कुटुंबाच्या पाठींब्यामुळेच हे शक्य झाले असे ते म्हणाले. श्री.सागर पवार यांना नोकरीच्या चांगल्या संधी आलेल्या असूनही त्यांनी त्या नाकारून व गावाकडील नोकरी स्वीकारून तेथील मुलांना हॉकी या खेळामध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवले.

  या कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या संचलन प्रकारचा निकाल जाहीर करण्यात आला.त्यामध्ये कॉम्प्युटर व आयटी विभागाने प्रथम, अणुविद्युत व दूरसंचार  विभागाने द्वितीय व ऑटोमोबाईल विभागाने तृतीय क्रमांक पटकाविला.या क्रीडाप्रकाराचे परीक्षण प्रा.काळे यांनी केले.२६ फेब्रुवारी पर्यंत चालणा-या या महोत्सवामध्ये क्रिकेट,व्हॉलीबॉल,फुटबॉल,टेनिस यांसारख्या मैदानी खेळांबरोबरच कॅरम,पेंटिंग,कविता लेखन,व्यंगचित्रकला यांसारख्या विविध स्पर्धांचा समावेश असणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रसाद मोरे व श्रिया पालकर यांनी केले. क्रीडा समन्वयक प्रा.विकास मोरे यांनी मान्यवर व सर्व उपस्थितांचे आभार मानले.

राजेंद्र माने महाविद्यालयात एमबीए प्रवेश परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा !!

  केवळ पदवीधर होणे आणि मिळेल ती नोकरी स्वीकारणे यापेक्षाही पदवीसोबतच व्यवस्थापनाचा
अभ्यासक्रम पूर्ण करून प्रथितयश कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळवणे हि आजच्या युवकाची गरज बनली आहे. व्यवस्थापकांचा अभाव आणि कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेली  व्यवस्थापकांची गरज याचा ताळमेळ घालण्याच्या दृष्टीने आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील व्यवस्थापन विभाग कार्यरत आहे.
  कोकण विभागात आपल्या गुणवत्तेने नावारूपास आलेल्या या महाविद्यालयामध्ये सन २०१७-१८ ची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली असून यंदाची राज्यशासनाची  एमबीए साठीची सी.ई.टी. परीक्षा दि. ४ व ५ मार्च रोजी घेण्यात येणार आहे.या सी.ई.टी. परीक्षेसंदर्भात मोफत मार्गदर्शन कार्यशाळेचे दि. २५ फेब्रुआरी २०१७  रोजी आयोजन करण्यात आले आहे.तरी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत व एमबीए विभागप्रमुख प्रा.महावीर साळवी यांनी केले आहे.
संपर्क क्रमांक:- ९४२२५६४७१४,९८२२३९३०१४,८१४९२३१७३१


राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

 राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, शिवप्रतिष्ठान आणि हिस्ट्री कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांनी शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला.
शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी संगमेश्वर,कसबा येथील संभाजी महाराज समाधी परिसराची स्वच्छता केली अन या पावन भूमीतून विधिवत पूतन करून शिवज्योत महाविद्यालयामध्ये आणली.
  या शिवज्योत दौडीमध्ये विद्यार्थ्यांबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा.राहुल बेळेकर, शिवप्रतिष्ठान तसेच हिस्ट्री कौन्सिलची धुरा सांभाळणारे प्रा.राहुल राजोपाध्ये, प्रा.अच्युत राउत, प्रा.माणिक पवार
सहभागी झाले होते. संस्थाध्यक्ष श्री. रवींद्र माने व कार्याध्यक्षा सौ.नेहा माने यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर शिवज्योत पूजन केले.
  महाविद्यालय प्रांगणात प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी शिवज्योतीची स्थापना केली. या प्रसंगी हिस्ट्री कौन्सिलच्या विशाल निगडे याने शिवाजी महाराजांविषयी समर्पक माहिती दिली तसेच एक पथनाटयही सादर करण्यात आले. याप्रसंगी आयोजित केलेल्या किल्ला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.वेगवेगळ्या किल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती विद्यार्थ्यांनी साकारल्या.याकरिता प्रा. विस्मयी परुळेकर यांनी मार्गदर्शन केले.
  सायंकाळच्या सत्रामध्ये पुणे येथील प्रथितयश श्री.अभय भंडारी यांचे तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. शिवाजी महाराज आणि अभियांत्रिकी यांचा परस्पर संबंध त्यांनी उलगडून दाखवला. व्याख्यानासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी पुढाकार घेतला.
   आभारप्रदर्शन प्रा.राहुल राजोपाध्ये तसेच सूत्रसंचालन विशाल निगडे यांनी केले. शिवजयंती सोहळा साजरा करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, शिवप्रतिष्ठान आणि हिस्ट्री कौन्सिलच्या  सदस्यांनी मेहनत घेतली.