Friday, July 1, 2022

इंडिया टुडेच्या सर्वेक्षण क्रमवारीत माने अभियांत्रिकीचा समावेश ..

 साडवली :

इंडिया टुडे या प्रख्यात राष्ट्रीय मासिकातर्फे दरवर्षीप्रमाणे जुलै २०२२ मध्ये भारतातील

शासकीय तसेच खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात

संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी

महाविद्यालयाचा भारतातील सर्वोत्तम खाजगी महाविद्यालयांच्या क्रमवारीत सलग चौथ्या

वर्षी समावेश करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय

भारतात २३५ व्या तर महाराष्ट्रात ३४ व्या क्रमांकावर असून मुंबई विद्यापीठात ९ व्या

क्रमांकावर मानांकित झाले आहे. कोकणातील केवळ दोनच अभियांत्रिकी महाविद्यालयांचा या

राष्ट्रीय क्रमवारीत समावेश करण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या या यशामुळे कोकणच्या

शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला आहे.

इंडिया टुडे या मासिकाने घेतलेल्या सर्वेक्षणामध्ये विविध निकषांच्या आधारे भारतातील

महाविद्यालयांची क्रमवारी निश्चित करण्यात आली. या निकषांनुसार महाविद्यालयाची

सर्वांगीण माहिती, नॅक ऍक्रेडीटेशनची श्रेणी, प्रवेश प्रक्रिया, शिक्षण शुल्क, जमाखर्चाचा तपशील,

प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांची शैक्षणिक अर्हता व अनुभव, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय

परिसंवादातील सहभाग आणि शोधनिबंध सादरीकरण, देशविदेशातील माजी विद्यार्थी कार्यरत

असलेल्या नामांकित आस्थापनांची माहिती व माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या सर्वांगीण

प्रगतीसाठी हातभार, संदर्भग्रंथ आणि नामांकित नियतकालिकांनी समृद्ध ग्रंथालय, विद्यार्थी

आणि प्राध्यापकांचा औद्योगिक जगताशी असणारा नियमित संपर्क आणि त्याद्वारे विद्यार्थी

उद्यमशील होण्यासाठी केलेले प्रयत्न, विविध विषयावरील तज्ज्ञांची व्याख्याने व मार्गदर्शन,


महाविद्यालयाच्या आवारातील शैक्षणिक तसेच क्रीडाविषयक सोयीसुविधा इत्यादी बाबींवर

लक्ष केंद्रित करून राष्ट्रीय क्रमवारी निश्चित करण्यात येते.

या सर्वेमधील इन्फ्रास्ट्रक्चर अँड लिविंग एक्स्पीरिअन्स या निकषांमध्ये राजेंद्र माने

महाविद्यालयाने महाराष्ट्रात चौथा क्रमांक व मुंबई विद्यापीठात दुसऱ्या क्रमांक पटकावला

आहे. तसेच ऍकॅडेमीक एक्सलेन्स या निकषांमध्ये महाराष्ट्रात पंधराव्या व मुंबई विद्यापीठात

पाचव्या क्रमांकावर मजल मारली असून कोकणात या दोन्ही निकषांमध्ये पुन्हा एकदा प्रथम

क्रमांकावर कायम राखला आहे.

यापूर्वीही महाविद्यालयाला एआयसीटीइ-सी आय आय सर्वेक्षणामध्ये गोल्ड कॅटॅगरी तसेच

आय. एस. टी. ई. नवी दिल्ली यांचा बेस्ट कॅम्पस पुरस्कार प्राप्त झाला आहे.

या सर्वेक्षणामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या

पालकांना चांगले महाविद्यालय निवडणे सोपे जाणार आहे. पुणे, मुंबई यासारख्या मोठ्या

शहरांमधील महाविद्यालयांच्या तोडीचे दर्जेदार शिक्षण व सुविधा राजेंद्र माने सारख्या

महाविद्यालयाने ग्रामीण भागात उपलब्ध करून दिल्याबद्दल अनेक पालकांनी समाधान व्यक्त

केले असून कोरोनासारख्या महामारीचा धोका लक्षात घेऊन अनेक विद्यार्थी स्थानिक

पातळीवरील दर्जेदार उच्च शिक्षणाला व आरोग्यदृष्ट्या सुरक्षित कॅम्पसला पसंती देत आहेत.

या सर्वेक्षणासाठी समन्वयक म्हणून प्रा. मंगेश प्रभावळकर यांनी काम पाहिले. यासाठी प्राचार्य

डॉ. महेश भागवत यांचे मार्गदर्शन व इतर सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे

सहकार्य लाभले. सलग चौथ्या वर्षी सर्वोत्तम महाविद्यालयांच्या राष्ट्रीय क्रमवारीत स्थान

मिळवल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी पालकमंत्री श्री. रविंद्रजी माने , कार्याध्यक्षा सौ. नेहा

माने , उपाध्यक्ष श्री. मनोहर सुर्वे आणि सर्व संस्था पदाधिकारी यांनी महाविद्यालयाचे सर्व

विद्यार्थी,पालक आणि कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन केले आहे.


फोटो: कॉलेज फोटो सोबत जोडला आहे