Monday, September 18, 2017

राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा !!!व्यासपीठावरील मान्यवर व उपस्थित प्रथितयश माजी विद्यार्थी
  
   आंबव-देवरुख यथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच मुंबई (दादर)येथील हॉटेल अॅव्हॉन रुबी कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित करण्यात आला.या स्नेहमेळाव्यात या महाविद्यालयाच्या पहिल्या तीन बॅचमधील प्रथितयश व आपल्या कार्यक्षेत्रात अग्रेसर असणा-या अशा विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फुर्त सहभाग नोंदवला.याव्यतिरिक्त १७माजी विद्यार्थ्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारतातून व परदेशातूनही आपला सहभाग नोंदवला.माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या कार्यप्रणाली तसेच महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे या उद्देशाने हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला.
   याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गोगटे जोगळेकर महाविद्यालय,रत्नागिरी चे माजी प्राचार्य व शिक्षणतज्ञ डॉ.सुभाष देव,संस्थाध्याक्ष मा.श्री.रविंद्रजी माने,सौ.नेहा माने,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत ,उपाध्यक्ष श्री.मनोहर सुर्वे,संचालक श्री.मनोहर माने,विश्वस्त श्री.दिलीप जाधव,कार्यकारी अधिकारी जान्हवी माने व माजी विद्यार्थी संघप्रमुख प्रा. इसाक शिकलगार,प्लेसमेंट ऑफिसर प्रा.अतुल यादव,सर्व विभागप्रमुख ,ऑफिस सुप्रींटेंडंट श्री.पद्मनाभ शेलार उपस्थित होते.
     सर्वप्रथम दीपप्रज्वलनाने व सरस्वतीवंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून श्री.राहुल बोधे(Dy.Ex.Engineer,Mahavitaran) यांना सन्मानित करण्यात आले.प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.प्रा.इसाक शिकलगार यांनी दृक्श्राव्य माध्यमातून उपस्थितांना माजी विद्यार्थ्यांच्या संघाची उद्दिष्टे व भूमिका स्पष्ट केली.प्रा.अतुल यादव यांनी महाविद्यालयात राबवण्यात येणाऱ्या नोकरीविषयक मार्गदर्शनाविषयी माहिती दिली.याप्रसंगी महाविद्यालयाच्या एम.एच.०८ व टीम फुल थ्रोटल च्या विद्यार्थ्यांनी आपण बनवत असलेल्या स्पोर्ट्स कार विषयी माहिती दिली.
     यानंतर माजी विद्यार्थी राजा सेठी,राहुल बोधे,अॅन्थनी डिसुजा(Founder & Principal Engineer,Able Emsys),विशाल हुरीवाल(Siemens),आशिष राजधान(Dy. Resident Manager, Bridge & Roof Co.Ltd.),गौरव कदम(Associate Consultant, CGI Information & Systems),सनी साल( Professor, LRTCE, Former Principal, Patel Poly Mumbai),हराल्द डिसुजा,ओंकार भोसले(Director-Product &Invester Relations),अंकुश अग्रवाल,दीप्ती पवार(Associate Gen.Manager,HGS),नितीन चंद्रन(Dy. General Manager, Renault, Nissan Tech.),किन्नर राठोड(Asst.manager, Mahindra & Mahindra),आशिष सिंग(Sr.Consultant,Capgemini) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांच्या यशामध्ये असलेल्या महाविद्यालयाच्या वाट्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
   प्रमुख अतिथी डॉ.सुभाष देव यांनी महाविद्यालयात नजीकच्या काळामध्ये येऊ घातलेल्या राष्ट्रीय मुल्यांकन समितीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.उपाध्यक्ष श्री.मनोहर सुर्वे यांनी महाविद्यालयाच्या सुरुवातीच्या जडणघडणीमध्ये माजी विद्यार्थ्यांचे योगदान अधोरेखित केले.संस्थाध्याक्ष मा.श्री.रविंद्रजी माने यांनी अत्यंत भावूक शब्दांमध्ये जुन्या काळातील आठवणी जागवल्या आणि ग्रामीण भागात शिक्षण घेऊन सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपले माजी विद्यार्थी काम करत असल्याबद्दल सार्थ अभिमान व्यक्त केला.आपल्या अनुभव व ज्ञानसंपदेचा ठेवा माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुला करावा अशी विनंती केली.
   माजी विद्यार्थ्यांतर्फे ओंकार भोसले व गौरव कदम यांनी एम.एच.०८ व टीम फुल थ्रोटल साठी उत्स्फुर्त पणे प्रायोजकत्व स्वीकारले.याशिवाय अंकुश अग्रवाल याने शिक्षक व पालक यांच्यात सुसंवाद वाढीसाठी एक अॅंडरॉइड अॅप विकसित करण्याचा मानस व्यक्त केला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.गुरुप्रसाद बुर्शे,प्रा.वैभव डोंगरे,प्रा.प्रसाद माने,प्रा. विश्वनाथ जोशी,श्री.महेंद्र भोसले यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन प्रा. स्नेहल मांगले यांनी केले तर आभारप्रदर्शन प्राचार्य डॉ.महेश भागवत भागवतयांनी केले.

माने अभियांत्रिकी महाविद्यालयात “शिक्षक दिन” उत्साहात साजरा!!

  प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी माजी राष्ट्रपती,उत्तम शिक्षक व तत्वज्ञ भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या विविध विभागांतर्फे शिक्षक दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन इलाईट, “ऑटोट्रेंड्स” स्टुडंट असोसिएशन तर्फे करण्यात आले.ऑटोमोबाईल विभागाच्या ऑटोट्रेंड्स भित्तीपत्रिकेच्या शिक्षक दिन विशेषांकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थी प्रतिनिधींद्वारे मान्यवर शिक्षक व शिक्षकेतरवर्ग यांचे पुष्प व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले.
  कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत,इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम विभागप्रमुख प्रा.अजित तातुगडे,ऑटोमोबाईल विभागप्रमुख प्रा. राहुल राजोपाध्ये यांनी या दिवसाचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आपल्या मनोगतात विद्यार्थी प्रतिनिधी कु.श्रेया जंगम,अलोक दुबे,कु. शलाका राव,हर्षल मोचेमाडकर यांनी त्यांच्या जीवनात असलेले गुरुचे स्थान विशद करताना शालेय जीवनापासून महाविद्यालयीन जीवनापर्यंत शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शन व सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
 सकाळच्या सत्रात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडत द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर वर्ग घेतले.दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांतर्फे उपस्थित शिक्षकांसाठी अंताक्षरी व संगीत खुर्ची असे मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले व त्यात सर्वांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.
  समारोपप्रसंगी शिक्षकांनी विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी व्यक्त करून त्यांनी केलेल्या कार्यक्रमाच्या आयोजनाचे कौतुक केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इलाईटऑटोट्रेंड्स स्टुडंट असोसिएशन  विविध विभागाचे विद्यार्थी प्रतिनिधी यांनी मेहनत घेतली.

युवा सांस्कृतिक महोत्सवात माने महाविद्यालयाची बाजी !!

 
 आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या ५० व्या युवा सांस्कृतिक महोत्सवामध्ये पारितोषिक पटकावीत महाविद्यालयाच्या लौकिकात भर घातली.गोगटे जोगळेकर महाविद्यालय,रत्नागिरी येथे संपन्न झालेल्या यामहोत्सवामध्ये १७ महाविद्यालयांनी आपला सहभाग नोंदवला.

  राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील एकूण ४६ विद्यार्थ्यांनी या महोत्सवाअंतर्गत विविध ३१ इव्हेंटमध्ये सहभाग घेतला त्यामध्ये विविध पारितोषिके मिळवली.बाहेरील तज्ञांचे कोणतेही मार्गदर्शन न घेता विद्यार्थ्यांनी स्वत:वयक्तिक स्तरावर तयारी करून हे यश मिळवले.यामध्ये एकपात्री अभिनय या विभागात महाविद्यालयातील ऑटोमोबाईल विभागाचा शेखर कदम याने प्रथम क्रमांक  मिळवला.तसेच रांगोळी आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये अनुक्रमे अक्षय पेंढारी आणि सुरज सावंत यांनी द्वितीय क्रमांक पटकावले.पाश्चात्य संगीत प्रकारात सुयोग गोसावी याला उतीजानार्थ पारितोषिक मिळाले.

  सर्व विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.गणेश जागुष्टे यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष श्री.रवींद्र माने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी विशेष कौतुक केले.महोत्सवाच्या यशस्वी सहभागाबाबत आणि नियोजनामध्ये सौ.गीतांजली खानविलकर यांनी परिश्रम घेतले.

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘करिअर क्लब’ चे उद्घाटन !


 उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवर


‘करिअर क्लब’ प्रसंगी प्रथितयश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘पारि इंडस्ट्री चे डायरेक्टर व प्रमुख पाहुणे श्री.गोविंद ओझा मार्गदर्शन करताना

  सध्या जगभर भेडसावत असलेला प्रश्न म्हणजे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची बेरोजगारी! कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध असूनही रोजगारक्षम अभियंत्यांचा तुटवडा आणि प्रचंड प्रमाणात निर्माण झालेले अकार्यक्षम मनुष्यबळ यांच्यामध्ये सांगड घालण्याचा प्रयत्न राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील ऑटोमोबाईल विभागातर्फे करण्यात आला.
  विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील करीअरसंदर्भात मार्गदर्शन मिळावे आणि त्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी व्यासपीठ निर्माण व्हावे या उद्देशाने विभागप्रमुख प्रा.राहुल राजोपाध्ये यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयात  करिअर क्लब  ची स्थापना करण्यात आली.त्याचे उद्घाटन प्रथितयश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘प्रिसिजन ऑटोमेशन अॅंड रोबोटिक्स लिमिटेडचे’ डायरेक्टर श्री.गोविंद ओझा यांचे हस्ते झाले.त्याप्रसंगी संस्थाध्यक्ष श्री.रविंद्रजी माने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत,तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा.भोपळे, विभागप्रमुखप्रा.राहुल राजोपाध्ये,ऑटोट्रेंड्स चे इनचार्ज प्रा. स्वप्नील रावूळ उपस्थित होते.
  याप्रसंगी प्रास्ताविक करताना ‘करिअर क्लब  स्थापन करण्यामागची संकल्पना प्रा.राजोपाध्ये यांनी स्पष्ट केली. विद्यार्थ्यांच्या सहभागातून करिअरबाबतचे उपक्रम राबवले तर ते जास्त यशस्वी होतील असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात आस्था निर्माण करणे, करिअरच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देणे,प्रत्येक विद्यार्थ्याचा डाटाबेस तयार करून तो नोकरी मार्गदर्शन केंद्रांना उपलब्ध करून देणे, महाविद्यालयातील करिअर मार्गदर्शन करू इच्छिणा-या माजी विद्यार्थ्यांचे नेटवर्क प्रस्थापित करणे आणि नामवंत तज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करणे हि करिअर क्लबची उद्दिष्टे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
  प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी सांगितले कि सध्याच्या युगामध्ये अशा पद्धतीच्या क्लबमधून विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर संदर्भात आश्वासकता निर्माण होईल. प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक श्री.गोविंद ओझा यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागातून करिअर क्लब हि एक अत्यंत चांगली आणि आवश्यक अशी संकल्पना असल्याचे सांगितले.अशा पद्धतीचे क्लब युरोप,अमेरीकामधील युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत असतात.
  आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री.रविंद्र माने म्हणाले कि मी इंजिनीअरींग केले नाही पण मला इंजिनीअरींग समजते. विद्यार्थ्यांच्या मनात करिअर संदर्भात आवड निर्माण करण्याचे काम या करिअर क्लब तर्फे होईल यात शंका नाही.त्यानंतर महाविद्यालयातील तसेचतंत्रनिकेतनमधील ५०० विद्यार्थ्यांसाठी श्री.गोविंद ओझा यांनी दिवसभर दोन सत्रांमध्ये मार्गदर्शन केले. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
  सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. स्वप्नील रावूळ यांनी समन्वय केला.विभागातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच आदेश आखाडे,अक्षय पेंढारी,प्रवीण आंबेकर, अक्षय मडगे,हर्षल मोचेमाडकर यांनी परिश्रम घेतले. 

राजेंद्र माने अभियांत्रिकी मध्ये श्री.रविंद्र माने यांचा ५९ वाढदिवस व महाविद्यालयाचा १९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा!

 आंबव येथील प्रथितयश प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाचा १९ वा वर्धापनदिन व संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री श्री.रविंद्र माने यांचा ५९ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
   या प्रसंगी  व्यासपीठावर संस्थाध्यक्ष श्री. रविंद्र माने यांचेसह कार्याध्यक्षा सौ.नेहा माने, सचिव श्री. चंद्रकांत यादव,सहसचिव श्री.दिलीप जाधव,जान्हवी माने,प्रद्युम्न माने, सौ.जयश्री दळवी, प्राचार्य डॉ. महेश भागवत, तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा.भोपळे, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
   महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्यावतीने शुभेच्छा दिल्या.महाविद्यालयाच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून साहेबांच्या हस्ते केक कापण्यात आला.शुभेच्छाला उत्तर देताना श्री. रविंद्र माने यांनी सांगितले कि वाढदिवस म्हणजे आयुष्यातील एक वर्ष वजा होणे पण आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी मी भारावून गेलो आहे.विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले कि जसा देशासाठी लढणा-या जवानांना आपल्या देशाप्रती अभिमान असतो तसाच तुम्हालाही असला पाहिजे.पालकांना व कॉलेजला तुमचा अभिमान वाटेल असे चांगले कार्य करा असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
  वर्धापनदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे श्री.सत्यनारायण महापुजा व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या भजनाचा कार्यक्रम पार पडला.
  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.शहाजी देठे यांनी केले.
 

माने अभियांत्रिकी महाविद्यालयात “अॅडव्हांस्ड रिसर्च अॅंड इनोव्हेशन - ग्लोबल परस्पेक्टीव्ह ” या विषयावर व्याख्यान आयोजित ‼अॅडव्हांस्ड रिसर्च अॅंड इनोव्हेशन- ग्लोबल परस्पेक्टीव्ह या विषयावर मार्गदर्शन करतानाडॉ. महेश बुर्शे

  आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रिसर्च अॅंड डेव्हलपमेंटविभागातर्फे अॅडव्हांस्ड रिसर्च अॅंड इनोव्हेशन- ग्लोबल  परस्पेक्टीव्ह”  विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. याव्याख्यानाला डॉमहेश बुर्शे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. लक्ष्मण नाईक यांनी मान्यवरांची ओळख करून दिली.प्राचार्य डॉमहेश भागवत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

  मार्गदर्शक डॉमहेश बुर्शे हे सध्या ‘लॉरेल रिसर्च अॅंड इनोव्हेशन एजीएम - स्किनकेअर मेटिअर’ मध्ये हेड म्हणून कार्यरत आहेत.ते मुळचे देवरुखचे असून महेश एजन्सीज, देवरुखच्या मनोज बुर्शेंचे भाऊ आहेत.त्यांनी युडीसीटी मधून एम.एस.सी. व पी.एच.डी.केले आहे व याआधी त्यांनी ‘कोलगेट’ मध्ये रिसर्चर म्हणून काम केले आहे. त्यांचा अॅकॅडेमिक व इंडस्ट्री मध्ये २० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांच्या अनुभवाचा विविध भारतीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांना फायदा झाला आहे. त्यांनी ‘पर्सनल केअर प्रोडकट्समध्ये’ व त्यांच्या तांत्रिक पूर्ततेची खात्री करण्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे.औद्योगिक क्षेत्राला पूरक ठरलेल्या त्यांच्या संशोधनामुळे त्यांच्या नावावर काही पेटंटसही आहेत.सद्यस्थितीतील जागतिक स्तरावरील अद्ययावत संशोधन व नवनिर्मिती याविषयी त्यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.
 कार्यक्रमाअंती आभारप्रदर्शन रिसर्च अॅंड डेव्हलपमेंट विभागाचे प्रा.लक्ष्मण नाईक यांनी केले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत व मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. एस.एन.वाघमारे यांचे सहकार्य लाभले.