Saturday, December 17, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे आयोजन!!


  देवरुख वार्ताहर:
  आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात “ चेंजिंग टेक्नॉलॉजी अॅंड रुरल डेव्हलपमेंट ” या विषयावर शोधनिबंध परिषदेचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण विकासामध्ये तंत्रज्ञानाचा सहभाग अधोरेखित करणाऱ्या या परिषदेमध्ये विविध महाविद्यालयातील ४० शोधनिबंध मांडण्यात आले.परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी संस्थाध्यक्ष श्री.रवींद्रजी माने,सौ.नेहाजी माने,प्रमुख अतिथी आणि मूलतत्त्व व्याख्याते प्रा.नरेंद्र काटीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत,आयोजक प्रा. लक्ष्मण नाईक,सह आयोजक प्रा. मुश्ताक गडकरी तसेच तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील उपस्थित होते.

  याप्रसंगी आयोजक प्रा. नाईक यांनी  प्रास्ताविकामध्ये आयोजनाचा हेतू विषद केला.आपल्या स्वागतपर भाषणात प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी उद्योग आणि शिक्षण संस्था यांच्यामधील दरी कमी करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे सांगितले.व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे आयोजन करण्याचा मानस प्राचार्य भागवत यांनी व्यक्त केला.त्यानंतर प्रा. गडकरी यांनी  प्रमुख अतिथींची ओळख उपस्थितांना करून दिली.
   
  प्रमुख अतिथी श्री.काटीकर यांनी महाविद्यालयाने परिषद आयोजनासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले.ग्रामीण विकास आणि तंत्रज्ञान या परिषदेच्या मुलतत्वासंदर्भात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना
अभियांत्रिकी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा वापर त्यांच्या प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून,समाजोपयोगी गोष्टींसाठी करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले.आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये  संस्थाध्यक्ष श्री.रवींद्र माने यांनी ग्रामीण विकास हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय असल्याचे सांगितले. ग्रामीण विकासामध्ये राहणीमान,शिक्षण,आरोग्य आदी विषयांवरती चर्चा होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

  त्यानंतर विविध महाविद्यालयातील प्राध्यापकांचे शोधनिबंध दोन दिवशीय सत्रांमध्ये सादर करण्यात आले.याकरिता तज्ञ परीक्षक म्हणून फिनोलेक्स महाविद्यालयाचे डॉ.मिलिंद किरकिरे,प्रा. मिलिंद यादव, एसएसपीएम कणकवली महाविद्यालयाचे प्रा. एस.एस.मुल्ला व डॉ.बाणे उपस्थित होते. परिषदेमध्ये सादर झालेले शोधनिबंध IOSR जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात येणार आहेत.

  उत्तरार्धामध्ये निरोपसमारंभामध्ये मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. याप्रसंगी डॉ.महेश भागवत, डॉ.मिलिंद किरकिरे,प्रा. मिलिंद यादव,प्रा. बाणे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.सूत्रसंचालन प्रा.मनोज सादळे तर आभार प्रदर्शन समन्वयक प्रा.पांडुरंग मगदूम यांनी केले.


   

Thursday, December 8, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा उपक्रम-संगमेश्वर तालुकास्तरीय गणित शिक्षकांसाठी कार्यशाळा!!


फोटो: उद्घाटनप्रसंगी संस्थाध्यक्ष श्री.रवींद्रजी माने, पुणे येथील प्रथितयश एम.प्रकाश अॅकॅडमीचे गणित तज्ञ श्री. एम.प्रकाश, रत्नागिरी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री.किरण लोहार, संगमेश्वर तालुका गणित मंडळाचे अध्यक्ष श्री.काळे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत, विभागप्रमुख प्रा.सातपुते

देवरुख वार्ताहर:
   आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये संगमेश्वर तालुकास्तरीय गणित शिक्षकांसाठी शालेय गणित अभ्यासक्रमाशी मैत्री या एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यशाळेचे उद्घाटनप्रसंगी संस्थाध्यक्ष श्री.रवींद्रजी माने, पुणे येथील प्रथितयश एम.प्रकाश अॅकॅडमीचे गणित तज्ञ श्री. एम.प्रकाश, रत्नागिरी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री.किरण लोहार, संगमेश्वर तालुका गणित मंडळाचे अध्यक्ष श्री.काळे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत, विभागप्रमुख प्रा.सातपुते,प्रा.राम दराडे,ठाकरे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.नलावडे सर उपस्थित होते.
   याप्रसंगी प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी प्रास्ताविक करताना विद्यार्थ्यांना या विषयाची आवड निर्माण व्हावी याकरता गणित शिक्षकांना मार्गदर्शन व्हावे हा हेतू डोळ्यासमोर ठेउन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असे सांगितले.तसेच विभागप्रमुख प्रा.संजय भंडारी यांनी तज्ञ प्रशिक्षकांची ओळख करून दिली.याप्रसंगी बोलताना शिक्षणाधिकारी श्री.लोहार यांनी अशा कार्यशाळा आयोजित करून महाविद्यालयाने समाजाप्रती दाखवलेल्या बांधिलकीचे कौतुक केले.गुण आणि गुणवत्ता यामधील फरक अधोरेखित होण्यासाठी या कार्यशाळांची निकड असल्याचे स्पष्ट केले. संस्थाध्यक्ष श्री.रवींद्रजी माने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गणित विषयाचे आयुष्यातील महत्त्व विषद केले.कोकणातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अशाप्रकारच्या कार्यशाळा जिल्हास्तरावर आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.
   प्रमुख पाहुणे एम.प्रकाश यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गणित हा विषय सोपाही नाही अन् अवघडही नाही ,ज्याला समजला त्याला सोपा अन नाही समजला तर अवघड इतकी साधी अन् समर्पक मिमांसा केली. एम.प्रकाश अॅकॅडमी ही भारतातील एक प्रथितयश संस्था असून विशेष बुद्धिमापन विद्यार्थ्यांना आय.आय.टी.जे.ई.ई. चे ट्रेनिंग देते.तसेच ही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावरील गणित ऑलिम्पियाड ह्या स्पर्धापरीक्षेसाठीही मार्गदर्शन करते.
   त्यानंतर ह्या अॅकॅडमीचे संस्थापक श्री.एम.प्रकाश ह्यांनी स्वत: तज्ञ प्रशिक्षक म्हणून दोन सत्रांमध्ये दिवसभर गणित विषयाच्या शिक्षकांना मार्गदर्शन केले.या कार्यशाळेसाठी संगमेश्वर तालुक्यातील विविध विद्यालयातील ‘५०’ गणित शिक्षकांनी व त्या शाळेतील गणितातील एका हुशार विद्यार्थ्याने आपला सहभाग नोंदवला.या कार्यशाळेचे आयोजन करताना शिक्षकांबरोबर प्रत्येक माध्यमिक विद्यालयातील गणितातील हुशार विद्यार्थ्याला सहभागी करून घेण्यात आले होते.त्याकरिता संगमेश्वर तालुक्यातील सर्व विद्यालयामध्ये श्री.एम.प्रकाश यांनी तयार केलेली विशेष प्रश्नपत्रिका पाठवून त्याआधारे सहभागी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
   हि कार्यशाळा महाविद्यालयाच्या अॅप्लाईड सायन्स विभागाने आयोजित केली.कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.शिल्पा फलटणे तर आभारप्रदर्शन प्रा.मनोज सादळे यांनी केले.   

    

Saturday, October 1, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागतसोहळा संपन्न
देवरुख: राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यांत्रिकी विभागातर्फे ‘जंकयार्ड’ या स्पर्धेचे आयोजन करून अभियंता दिन साजरा करण्यात आला. या स्पर्धेमध्ये एकूण ५७ संघांनी भाग घेतला. यांत्रिकी व तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांमधील कल्पकता व नाविन्यपूर्ण विचारांना चालना देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
   विभागप्रमुख प्रा.संजय भंडारी यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.’मेसा’ या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष शुभम करडे व समन्वयक प्रा.राहुल दंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हि स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. स्पर्धांचे परीक्षक म्हणून प्रा.गणेश जागुष्टे व प्रा.आशिष सुवारे  यांनी काम बघितले.
   या स्पर्धेच्या बक्षीस वितारणासोबतच शिक्षक दिन व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला.यावेळी प्राचार्य डॉ. महेश भागवत व विभागप्रमुख प्रा.संजय भंडारी यांच्या हस्ते बक्षीस वितरण तसेच मागील वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ.भागवत यांनी विद्यार्थ्यांना या तीन वर्षाच्या शैक्षणिक आयुष्याचा वापर भविष्यातील संधींसाठी करण्याचे आवाहन केले. ’मेसा’ या विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षक दिनानिमित्त सर्व प्राध्यापकांचा सत्कार करून कृतज्ञता प्रकट केली.द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील सुविधांविषयी समाधान व्यक्त केले.तसेच या महाविद्यालयाच्या यांत्रिकी विभागात प्रवेश मिळाल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचे नमूद केले.

  याप्रसंगी  विद्यार्थ्यांना सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या तसेच नाविन्यपूर्ण अभियांत्रिकी आविष्कार याविषयी माहिती देणाऱ्या चित्रफित दाखवण्यात आल्या. प्राचार्य डॉ. महेश भागवत,   विभागप्रमुख प्रा.संजय भंडारी, ’मेसा’ समन्वयक प्रा.राहुल दंडगे यांनी सर्वांना अभियंता दिन व शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. शुभम करडे याने आभारप्रदर्शन केले.

Sunday, September 18, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ‘‘अभियंता दिन” व “शिक्षक दिन’’ साजरा !!

आंबव देवरुख स्थित प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अभियंता दिन व शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांच्या हस्ते सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.यावेळी प्राचार्य डॉ.भागवत यांनी उपस्थितांना अभियंता दिनाच्या व शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
  अभियंता दिनाचे औचित्य साधून ऑटोमोबाईल विभागामध्ये सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या व्यक्तिमत्वाची व कार्याची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी या उद्देशाने ‘चरित्रकथनाचा’ कार्यक्रम झाला.यावेळी रुपेश अवसरे,प्रसाद नलावडे,चिन्मय शितूत या विद्यार्थ्यांनी तसेच प्रा.राहुल राजोपाध्ये व विभागप्रमुख प्रा.निमेष ढोले यांनी विद्यार्थ्यांना विश्वेश्वरय्या यांचे चरित्र,कार्य, अभियंत्यांची नीतिमत्ता या विषयी मार्गदर्शन केले.ऑटोट्रेंड्स इनचार्ज प्रा. राहुल पोवार यांनी प्रास्ताविक केले.
  महाविद्यालयाच्या संगणक विभागातर्फे वक्तृत्व,प्रोग्रामिंग आणि गेमिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.त्यासाठी प्रा. मनोज सादळे,प्रा.देठे,प्रा.मगदूम व प्रा.व्ही.एस.जोशी यांनी निरीक्षकाची भूमिका पार पाडली. वक्तृत्व स्पर्धेमध्ये कु.दिपाली देवरुखकर, प्रोग्रामिंगमध्ये गणेश बने तर गेमिंग मध्ये शुभम पाडाळकर,शुभम मोरे,केदार बर्डे यांनी प्रथम क्रमांक पटकावले. कार्य्रक्रमाचे आयोजन संगणक संघटना प्रमुख प्रा. सौ. गीतांजली सावंत यांनी केले.सूत्रसंचालन प्रसाद मोरे यांनी केले.
  अणुविद्युत व दूरसंचार विभागातर्फेही अभियंता दिनाचे औचित्य साधून रोबो रेस,सर्किट बिल्डींग,बेस्ट डिझाईन आउट ऑफ वेस्ट मटेरीअल तसेच स्पॉट फोटोग्राफी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.या स्पर्धाचे आयोजन विभागाच्या ‘इलाईट’ इनचार्ज प्रा. स्वाती बिजें यांनी केले.स्पर्धांचे परीक्षण प्रा.महेश पावसकर,प्रा.पूनम क्षीरसागर,प्रा.इसाक शिकलगार,प्रा.शुभांगी कांबळे यांनी केले.
  सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली  ऑटोमोबाईल  विभागप्रमुख प्रा.निमेष ढोले, संगणक विभागप्रमुख प्रा. लक्ष्मण नाईक, अणुविद्युत व दूरसंचार विभागप्रमुख प्रा.सुनिल अडूरे, प्रा.राहुल पोवार, प्रा. सौ. गीतांजली सावंत, ‘इलाईट’ इनचार्ज प्रा. स्वाती बिजें, अणुविद्युत व दूरसंचार विभागातील विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी संकेत गडदे,कु.समिधा तानवडे,रुपेश अवसरे यांनी मेहनत घेतली. 

Thursday, September 8, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा याहीवर्षी कायम!!


                                
                              
           
  मुंबई विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून त्यामध्ये आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व विभागामध्ये याही वर्षी निकाल विद्यापीठाच्या सरासरी निकालापेक्षा सरस ठरले आहेत.
  अणुविद्युत व दूरसंचार विभागाच्या अंतिम वर्षाचा निकाल ९५.१६% लागला असून मनोज पवार हा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. यांत्रिकी विभागाचा निकाल ९३.५५% लागला असून ओंकार गोमले महाविद्यालयात प्रथम आला. संगणक विभागाचा निकाल ९३.१०% लागला असून झिलू राणे विभागामध्ये सर्वप्रथम आला. माहिती तंत्रज्ञान या शाखेचा निकाल ९२.४५% लागला असून अनिकेत गांवकर विभागामध्ये प्रथम आला. ऑटोमोबाईल विभागाचा निकाल ९१.८४% लागला असून सिद्धेश कुंभार विभागामध्ये प्रथम आला. महाविद्यालयातील व्यवस्थापन विभागाचा निकाल ९५.८३% लागला असून राहुल जाधव याने विभागामध्ये सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला.
  तसेच या शैक्षणिक वर्षाखेरीस महाविद्यालयातील एकूण ४२ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये कॅंपस प्लेसमेंटद्वारे निवड झाली आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री.रवींद्र माने, कार्याध्यक्षा सौ.नेहा माने, उपाध्यक्ष श्री.मनोहर सुर्वे, सचिव श्री. चंद्रकांत यादव, सहसचिव श्री.दिलीप जाधव,सर्व संचालक, प्राचार्य डॉ. महेश भागवत तसेच  सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.

Tuesday, August 30, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात निसर्ग सहलीचे आयोजन!!

देवरुख: अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांची निसर्गासोबत असलेली नाळ तुटू नये आणि त्यांच्यात निसर्गासोबत आत्मियता निर्माण व्हावी या उदात्त हेतूने राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील नेचर क्लब तर्फे विद्यार्थ्यांसाठी निसर्ग सहलीचे आयोजन करण्यात आले.
  एक दिवस - निसर्गाच्या सानिध्यात या संकल्पनेला मूर्त स्वरूप देताना नेचर क्लब तर्फे विशाळगड महादरवाजा,अहिल्याबाई होळकर समाधी,वाघदरा,बर्की धबधबा हि  निसर्ग सहल आयोजित करण्यात आली.सदर सहलीमध्ये ५५ विद्यार्थ्यांसह तीन प्राध्यापक सहभागी झाले होते.
  या  निसर्ग सहलीचा उद्देश स्पष्ट करताना नेचर क्लबचे इनचार्ज व सहल समन्वयक प्रा. मंगेश प्रभावळकर यांनी शिवरायांच्या पराक्रमाने पवित्र झालेल्या व बाजी प्रभूंच्या रक्ताने पावन झालेल्या विशाळगड व पावनखिंडीची माहिती दिली. गड किल्ले,ऐतिहासिक ठिकाणांची माहिती व प्रत्यक्ष दर्शन तसेच निसर्गाच्या सानिध्यात चार निवांत क्षण व्यतीत करत असतानाच निसर्गाची उपयुक्तता विद्यार्थ्यांना जाणवावी या उद्देशाने नेचर क्लब कार्यरत आहे.
  आजपर्यंत निसर्ग सहलीचे बरेचसे उपक्रम या क्लब तर्फे करण्यात आले असून वृक्षारोपणासारख्या सामाजिक बांधिलकीचे उपक्रमही पार पडलेले आहेत.या  निसर्ग सहलीमध्ये विद्यार्थ्यांना विशाळगड महादरवाजा,अहिल्याबाई होळकर समाधी,वाघदरा,बर्की धबधबा, महादेव मंदिर ,राजवाडा, मलिक रेहान दर्गा, पावनखिंड इ. ठिकाणांची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली.

  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत यांच्या प्रोत्साहनातून पार पडलेलता या निसर्ग सहलीमध्ये समन्वयक प्रा. मंगेश प्रभावळकर तसेच  प्रा. राहुल पोवार, प्रा. माणिक पवार सहभागी झाले होते.सहल अविस्मारणीय बनवण्यासाठी हर्शल मोचेमाडकर,सुशांत धारवट,योगिता ढमके,मनीष वारणे,अनिकेत लाखण,हर्षाली,अक्षता,स्वराज सावंत यांनी परिश्रम घेतले. 

Thursday, August 25, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ‘‘रेन वॉटर हार्वेस्टिंगवर’’ व्याख्यान !!फोटो:- “ग्रामीण विकासासाठी तंत्रज्ञानाची उपयुक्तता” या विषयावर व्याख्यान देताना जलवर्धिनी या अशासकीय सामाजिक संस्थेचे श्री.उल्हास परांजपे

देवरुख वार्ताहर:
  महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण होण्यामध्ये मानवाचाही वाटा आहे पण हा दुष्काळाचा प्रश्न सोडवण्यासाठीही आपण खारीचा वाटा कसा उचलू शकतो हे समजून घेणे उपयुक्त ठरेल.कमी अधिक प्रमाणात पाऊस सर्वत्र पडतो पण हा सर्वत्र पडणारा पाऊस बहुतांशीवेळी वाया जातो. म्हणूनच उपलब्ध पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि संधारण याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.अशा प्रकारच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.निमित्त होते ते प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडलेल्या एकदिवशीय कार्यशाळेचे!
  ग्रामीण विकासासाठी तंत्रज्ञानाची उपयुक्तता याविषयावर पार पडलेल्या या कार्यशाळेत उपहारानंतरच्या सत्रामध्ये व्याख्यान देताना जलवर्धिनी या अशासकीय सामाजिक संस्थेचे श्री.उल्हास परांजपे यांनी हे मत व्यक्त केले.व्याख्यानासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.मनोहर सुर्वे, कार्याध्यक्षा सौ.नेहाजी माने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत आणि सर्व प्राध्यापक उपस्थित होते.सुरवातीला प्राचार्य डॉ.भागवत यांनी व्याख्यात्यांची ओळख करून दिली.
   आपल्या व्याख्यानामध्ये श्री. परांजपे यांनी शास्त्रीयदृष्ट्या पावसाच्या पाण्याचे संधारण या संदर्भात माहिती देताना पावसाचे पाणी गोळा करणे,साठवणे,जमिनीखालील पाण्याच्या साठ्याची पातळी वाढवणे यासारख्या असंख्य मुद्द्यांचा परामर्श घेतला. तसेच त्यांनी उपेक्षित असलेल्या अत्यंत कमी खर्चिक फेरोसिमेंटिंग तंत्रज्ञानाचा वापर ग्रामीण विकासासाठी जास्तीत जास्त कसा करता येऊ शकतो यासंदर्भात मार्गदर्शन केले व या तंत्रज्ञानाचा उपयोग करून मूर्त स्वरुपात साकारलेल्या विविध प्रकल्पांचीही छायाचित्रांसह माहिती दिली.

  राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसराची प्रत्यक्ष पाहणी व अभ्यास करून जलसंधारणाबाबत त्यांनी सुयोग्य मार्गदर्शन केले व कृती आराखडाही तयार करून दिला. व्याख्यात्यांचे आभार व्यक्त करताना प्राचार्य डॉ.भागवत यांनी श्री.परांजपे यांच्या ज्ञानाचा उपयोग करून महाविद्यालयातील अंतिम वर्षाचे काही प्रकल्प सामाजिक उपयोगितेचे भान ठेवून करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.भोपळे सर,प्रा.डिके व प्रा.भंडारी यांचे सहकार्य लाभले.

Wednesday, August 17, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकी मध्ये श्री.रविंद्र माने यांचा वाढदिवस साजरा

 आंबव येथील प्रथितयश प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाचा १८ वा वर्धापनदिन व संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री श्री.रविंद्र माने यांचा ५८ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
  या प्रसंगी  व्यासपीठावर संस्थाध्यक्ष श्री. रविंद्र माने यांचेसह कार्याध्यक्षा सौ.नेहा माने, सचिव श्री. चंद्रकांत यादव,सहसचिव श्री.दिलीप जाधव, संचालिका जान्हवी माने,प्रद्युम्न माने, सौ.जयश्री दळवी, प्राचार्य डॉ. महेश भागवत,माजी प्राचार्य डॉ. सुरेंद्र कुमार, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.सुहास पाटील, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्य विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.
  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांतर्फे शुभेच्छा दिल्या.यानंतर माजी प्राचार्य डॉ. सुरेंद्र कुमार यांनी मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून साहेबांच्या हस्ते केक कापण्यात आला.शुभेच्छाला उत्तर देताना श्री. रविंद्र माने हा आपल्या आयुष्यातील भावनाप्रधान दिवस असल्याचे सांगितले.आपल्या माणसांच्या शुभेच्छांच्या जोरावर संस्थेची प्रगती होत असल्याचे पाहून समाधान वाटत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
  या प्रसंगी राजेंद्र माने तंत्रनिकेतनचे प्रा.वाकडे यांच्या “स्माईल विथ लाईफ” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. वर्धापनदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व नेचर क्लबतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे श्री.सत्यनारायण महापुजा प्रा. कोळेकर नवदांपत्याच्या हस्ते करण्यात आली. महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचार्यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला.

  श्री. गोसावी सर,भोम यांनी श्री.रविंद्र माने यांची रेखाटलेली रांगोळी यावर्षी उपस्थितांमध्ये लक्षवेधी धरली . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.मनोज सादळे यांनी केले.

Monday, July 25, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात “इंडस्ट्रीयल ऑटोमेशन प्रोडक्ट” वर कार्यशाळा संपन्न !!
देवरुख: आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या  अणुविद्युत व दूरसंचार विभागातर्फे इंडस्ट्रीयल ऑटोमेशन प्रोडक्ट” या विषयांतर्गत नुकतीच एका आठवड्याची कार्यशाळा संपन्न झाली.हि कार्यशाळा अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली व त्याला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. एकूण ७५ विद्यार्थ्यांनी सदर कार्यशाळेचा लाभ घेतला.
  कार्याशाळेच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत, विभागप्रमुख प्रा.सुनिल अडूरे,कार्यशाळा समन्वयक प्रा. अजित तातुगडे तसेच विभागातील प्राध्यापकवर्ग उपस्थित होते.याप्रसंगी कार्यशाळा समन्वयक प्रा. अजित तातुगडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळेचा उद्देश विभागप्रमुख प्रा. सुनिल अडूरे यांनी विषद केला. याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी आपल्या भाषणात सांगितले की नवीन तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख निर्माण व्हावी यासाठी महाविद्यालय सतत प्रयत्नशील असते. अशा कार्यशाळांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व आपले कौशल्य वाढवावे असे आवाहन त्यांनी केले.
    या कार्याशाळेला श्री.रमेश वाकचौरे(सिनिअर प्रोजेक्ट इंजीनिअर,प्रोलिफिक सिस्टिम्स अॅण्ड टेक्नॉलॉजी प्रा.लि.,पुणे) व इतर तीन सहाय्यक तज्ञांचे मार्गदर्शन लाभले.हि कार्यशाळा इंडस्ट्रीयल ऑटोमेशन प्रोडक्ट-अॅलन ब्रॅडली पिएलसी सिस्टिम्स व स्काडा सॉफ्टवेअर” विषयाचे सखोल ज्ञान,त्याची व्याप्ती विद्यार्थ्यांना समजावी तसेच त्याविषयीच्या कौशल्याची त्यांना माहिती व्हावी या उद्देशाने आयोजित केली होती. कार्याशाळेमध्ये प्रात्यक्षिक करण्यावर जास्त भर देण्यात आला.
  या कार्याशाळेमध्ये पिएलसी प्रोग्रॅमिंग लॉजिक द्वारे एखादे ऑटोमेशन प्रोडक्ट/मोडेल कसे बनवावे, स्काडा सॉफ्टवेअर वापरून एखादे डिव्हाइस कसे जोडावे तसेच पिएलसीचे ट्रबलशुटींग व डायग्नोसीस कसे करावे याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी केले. त्यामुळे या साधनांचा प्रत्यक्ष वापर करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला.
  एका आठवड्याच्या कार्यशाळेनंतर सदर कार्यशाळेचा समारोप सोहळा पार पडला.याप्रसंगी कार्यशाळा मार्गदर्शक श्री.रमेश वाकचौरे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांप्रती गौरवोद्गार काढले. आभारप्रदर्शन कार्यशाळा समन्वयक प्रा. अजित तातुगडे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी कार्यशाळा समन्वयक प्रा. अजित तातुगडे,विभागप्रमुख प्रा.सुनिल अडूरे व अन्य शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

Saturday, April 30, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचा निरोपसमारंभ संपन्न !!!

देवरुख वार्ताहर
    आंबव-देवरुख येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचा निरोपसमारंभ नुकताच महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी संस्थाध्यक्ष मा.श्री.रविंद्रजी माने, कार्याध्यक्षा सौ. नेहाजी माने, विश्वस्त श्री.दिलीप जाधव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
   याप्रसंगी विविध विभागाच्या विद्यार्थी प्रातिनिधींनी आपले ह्द्य मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचा त्यांच्या जडणघडणीत  असलेल्या महत्वाच्या वाट्याचा विशेषत्वाने उल्लेख केला.विविध विभागप्रमुखांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
   याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये या उपक्रमांचे महत्व विषद केले. गेट परीक्षेत मिळालेले विशेष प्राविण्य तसेच नामांकित इंडस्ट्रीजमध्ये कॅम्पस प्लेसमेंट द्वारे विद्यार्थ्यांची झालेली निवड यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला.आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री.रविंद्रजी माने यांनी विद्यार्थ्यांना जिद्द बाळगण्याचे आवाहन केले.
   अभियंता झाल्यानंतर आपण आपल्या समाजाचे देणे लागतो याची जाणीव ठेऊन विद्यार्थ्यांनी समाजाप्रती आपले कर्तव्य बजावयास हवे आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग हा आपल्या देशासाठी  करावयास हवा. महाविद्यालयातील प्लेसमेंट बद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीबद्दल प्राचार्यांचे विशेष अभिनंदन केले.
  यावर्षी पहिल्यांदाच गेट परीक्षेमध्ये महाविद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले तर प्लेसमेंटमधील ब-याच आव्हानांचा सामना खाजगी महाविद्यालये करत असताना देखील या महाविद्यालयातून १३ विद्यार्थ्यांची  नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांचे याप्रसंगी व्यवस्थापनाकडून कौतुक करण्यात आले.

  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समन्वयक प्रा.गणेश जागुष्टे, प्रा.राहुल राजोपाध्ये, प्रा.मंगेश गोसावी यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सादळे यांनी केले.


गेट परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या सात विद्यार्थ्यांसमवेत संस्थाध्यक्ष मा.श्री.रविंद्रजी माने, कार्याध्यक्षा सौ. नेहाजी माने, विश्वस्त श्री.दिलीप जाधव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत


नामांकित इंडस्ट्रीजमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झालेल्या तेरा विद्यार्थ्यांसमवेत संस्थाध्यक्ष मा.श्री.रविंद्रजी माने, कार्याध्यक्षा सौ. नेहाजी माने, विश्वस्त श्री.दिलीप जाधव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत तसेच ट्रेनिंग-प्लेसमेंट इंचार्ज प्रा.अतुल यादव