Friday, March 3, 2017

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘रस्ता सुरक्षा अभियान’ !!!

  

   प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस महानिरीक्षक कार्यालय आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या राज्य रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
   याप्रसंगी व्यासपीठावर वाहतूक शाखा पोलीस इन्स्पेक्टर श्री. ए.एम. खान, सहाय्यक प्रादेशिक मोटार वाहन निरीक्षक श्री. विनोद वसईकर, श्री. आर.एस. ढोबळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत, तंत्रनिकेतन प्राचार्य डॉ.पाटील, विभागप्रमुख प्रा.निमेश ढोले, महाविद्यालयातील मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रमुख प्रा.राहुल राजोपाध्ये,निरीक्षक श्री.संदीप देसाई उपस्थित होते.सर्वप्रथम प्रा.राहुल राजोपाध्ये यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की दरवर्षी अपघातामध्ये मृत्युमुखी पडणा-या ८०% लोकांचे वय हे साधारणपणे १८ ते ३० वयोगटातील असते. राज्यातील तरुण मनुष्यबळाची जर अपघातामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हानी होत असेल तर राज्याच्या दृष्टीने ती चिंतेची बाब आहे.
    महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की महाविद्यालयीन युवकांसाठी सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे.त्यामुळे रस्ता सुरक्षेचे महत्त्व मुलांना उमजू शकेल. रस्ता सुरक्षेचा प्रश्न आता गंभीर होत चालला आहे व युवकांनीही हा विषय आता गांभीर्याने घेण्याची आता वेळ आली आहे. कारण स्पोर्टस् बाईक व कार चालविणार्यांचे प्रमाण खूप जास्त असून याचा विचार हि काळाची गरज आहे.त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकेल. वाहतूक शाखा पोलीस इन्स्पेक्टर श्री.खान यांनी केवळ वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करणे हा या मोहिमेचा उद्देश न ठेवता समाजप्रबोधनातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे यासाठी आम्ही कार्यरत आहोत असे सांगितले.
  यानंतर श्री. विनोद वसईकर यांनी दृकश्राव्य मध्यामाद्वारे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.हेल्मेटची आवश्यकता, वेगमर्यादा, अपघातांची कारणे,घ्यावयाची काळजी याबाबत चलचित्रांद्वारे जागृती केली. त्याला उपस्थित सुमारे ४५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.याप्रसंगी  प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे माहिती पत्रक व माहिती पुस्तिकेचे वितरण करण्यात आले.
    प्रा. राहुल राजोपाध्ये यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागप्रमुख प्रा.निमेश ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम समन्वयक  प्रा.राजोपाध्ये, अनिकेत सुर्वे ,दीपक जंगम,रुपेश अवसरे ,मानस जोशी,चिन्मय शितुत,मैत्रेय नागवेकर यांनी परिश्रम घेतले.




No comments:

Post a Comment