Saturday, January 19, 2019

तंत्रज्ञानयुक्त अध्यापन काळाची गरज - खा. विनायक राऊत (राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्यांची कार्यशाळा संपन्न)


              सध्याच्या शिक्षण प्रणालीत कालानुरूप बदल होत आहेत. या बदलाना तत्परतेने व प्रभावीपणे सामोरे जायचे असेल तर त्यानुसार अध्ययन व अध्यापनामध्ये आवश्यक बदल घडवून आणणे व त्यायोगे विद्यार्थ्यांची तयारी करून घेऊन त्यांचा  दृष्टिकोन बदलणे क्रमप्राप्त झाले आहे. ही आजच्या काळाची तसेच आजच्या शैक्षणिक प्रणालीची गरज ओळखून   आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने इंजिनिअरिंग  कॉलेजने  ११ जानेवारीला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांसाठी “कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण आणि बदलते संदर्भ” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील बहुसंख्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी या कार्यशाळेमध्ये आपला सहभाग नोंदविला.

कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रविंद्रजी माने यांच्या शुभहस्ते व कार्याध्यक्षा  सौ नेहा माने ,प्राचार्य डॉ. महेश भागवत , प्रमुख वक्ते तसेच शिक्षण तज्ञ डॉ. सुभाष देव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी रत्नागिरी- सिंधुदुर्गचे खासदार श्री. विनायक राऊत आणि चिपळूणचे आमदार श्री. सदानंद चव्हाण यांनी देखील सदिच्छा भेट दिली. मा. विनायकजी राउत यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले कि, तंत्रज्ञानयुक्त अध्यापन ही काळाची गरज बनत चालली आहे. यावरील  कार्यशाळा हा संस्थेचा स्तुत्य उपक्रम असून याचा संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना नक्कीच  उपयोग होईल. त्यांनी शेवटी महाविद्यालयाच्या वीस वर्षांच्या यशस्वी वाटचालीबद्दल व्यवस्थापनाचे अभिनंदनही केले.
             कार्यशाळेची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविकात त्यांनी कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला तसेच सध्याच्या शिक्षण प्रणालीत दिवसेंदिवस होणारे बदल व त्यानुसार अध्ययन व अद्यापानातील आवश्यक असणारे बदल याविषयी आपले मत मांडले. त्यानंतर संस्थाध्यक्ष रविंद्रजी माने यांनी पिढी घडविताना शिक्षणातील झालेला बदल व त्यासाठी शिक्षकांची बदल स्वीकारण्याची मानसिकता याविषयी मार्गदर्शन केले.
             कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात प्रमुख वक्ते डॉ. सुभाष देव यांनी शिक्षणातील बदल स्वीकारण्या संदर्भात शिक्षक व पालकांची भूमिका यावर मार्गदर्शन केले. त्यांनी बारावी नंतर उपलब्ध असणाऱ्या उच्च शिक्षणाच्या संधी, आजच्या शिक्षण प्रणाली बाबत शिक्षक व विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन, तसेच शिक्षण प्रणालीतील अडचणी यावर चर्चासत्र घेतले.
            तृतीय सत्रात महाविद्यालयाचे कॉम्पुटर विभाग प्रमुख प्रा. मुश्ताक गडकरी यांनी अध्यापन सुसूत्रीत व प्रभावी करण्यामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग यावर विस्तृत भाष्य केले.  सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जगात विद्यार्थ्यांचा संगणक तसेच मोबाईलचा वापर वाढलेला दिसून येतो. यामुळे आय सी टी सारख्या तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर केल्यास त्याचा विद्यार्थ्याना लाभ होऊ शकतो. यात त्यांनी व्ही लॅब , ईडीमोडो अशा अनेक तंत्रांचे उपस्थिताना प्रात्यक्षिक दाखविले.
            कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी उपस्थित प्राचार्यांनी कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल व्यवस्थापनाचे आभार मानले तसेच येथील शिक्षण पद्धती व तंत्रज्ञानाशी निगडीत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले . कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. देठे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.


Friday, January 18, 2019

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एन एस एस चे निवासी शिबीर उत्साहात संपन्न


आंबव येथील प्र.शि.प्र.संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे निवासी शिबीर उत्साहात पार पडले. हे शिबीर नजीकच्या निवे गावी घेण्यात आले.सात दिवसांच्या शिबिरात विद्यार्थी स्वयंसेवकांनी ग्रामस्वच्छता, समाजसेवा, श्रमदान, बौद्धिक विकास यांचा अनुभव घेतला.शिबिराच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात पहाटे योगा, प्राणायाम, शारीरिक व्यायाम व ईश्वर आराधनेने करण्यात येत होती. नियोजनानुसार दरदिवशी विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी गावातील शिंदे वाडी येथे बंधारा बांधला. निवे गावची ग्रामदेवता वरदानदेवीचा मंदिर परिसर, तसेच सिद्धेश्वर मंदिर परिसर, सहाण, बस थांबा यांची स्वच्छता केली. निवे गावातील रस्ते स्वच्छ केले. गावातील आश्रमशाळेला भेट देऊन तेथील कामकाज समजून घेतले. संस्थाध्यक्ष मा. रवींद्र माने यांनी यादरम्याने शिबिराला भेट दिली.शिबिरादरम्यान विविध विषयांवर बौद्धिक व्याख्याने आयोजित करण्यात आली. यामध्ये ‘काश्मीर भारताचा अविभाज्य भाग’ या विषयावर प्रा. अरविंद कुलकर्णी, ‘युवकांसामोरील आव्हाने’ या विषयावर श्री. अभिजित हेगशेट्ये, ‘अन्न-धान्य भेसळ परीक्षण’ या विषयावर डॉ. सागर संकपाळ, ‘हवामानातील बदलाचे परिणाम’ या विषयावर डॉ. विक्रांत बेर्डे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. संध्याकाळच्या सत्रात स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन ‘माहिती दूत’ या मोबाईल अॅप द्वारा गावच्या ग्रामस्थांना  विविध शासकीय योजनांची माहिती करून दिली.शिबिराची सागंता संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ. नेहा माने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी सरपंच श्री. महेंद्र राजवाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत आदी उपस्थित होते. शिबीर यशस्वितेसाठी प्रा. राहुल बेलेकर, प्रा. विस्मई परुळेकर, प्रा. अच्युत राऊत, प्रा. शूभांगी कांबळे आणि ‘रासेयो’ चे स्वयंसेवक यांनी मेहनत घेतली.

Wednesday, January 9, 2019

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात “CTRD 2K18” राष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन!!

आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये “चेन्जिग
टेक्नोलॉजी अॅंड रुरल डेव्हलपमेन्ट”, CTRD २k१८” या तिस-या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले.
इंजिनीअरिंगच्या विविध शाखामध्ये कार्यरत असणारे संशोधक, व्यावसायिक तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी यांना ग्रामीण भागाच्या विकासासाठी संशोधन करण्यास उद्युक्त कारणे, त्यांनी केलेल्या संशोधनाच्या सादरीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच या सर्वातून मुखत्वे ग्रामीण भागाचा विकास कसा साधता येईल यावर संवाद घडवून आणणे याच उद्देशाने राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाने मागील तीन वर्षेपासून हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.यावर्षी परिषदेमध्ये जेजेटीयु राजस्थान, जि. एफ. जि. कॉलेज कर्नाटक, जैन युनिवर्सिटी बेंगलोर, आदर्श इन्स्टिट्यूट बेंगलोर, डीकेटीइ इचलकरंजी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, घोडावत अभियांत्रिकी महाविदयालय कोल्हापूर, सायबर कोल्हापूर, के आय टी कोल्हापूर, फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविदयालय रत्नागीरी, राजेंद्र माने तंत्रनिकेतन आंबव, यासारख्या प्रतिष्ठित महाविद्यालयामधून प्राध्यापक व विद्यार्थ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
२१ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या भव्य सभागृहामध्ये परिषदेचे उद्घाटन संस्थाध्यक्ष मा.श्री.रवींद्रजी माने
यांच्या शुभहस्ते पार पडले. याप्रसंगी व्यासपीठावर समारंभाचे मुख्य अतिथी मिलिंद दातार, प्राचार्य
डॉ.महेश भागवत, संयोजक डॉ.एस.एन.वाघमारे, समन्वयक प्रा. वैभव डोंगरे तसेच आंबव गावचे माजी
सरपंच बाळ माने उपस्थित होते.उद्घाटन मान्यवराच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर मुख्य अतिथी तसेच सर्व सत्र प्रमुख यांचे महाविद्यायाच्या वतीने पुष्प्गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. महाविद्यालयाच्या सर्व विभागांचे प्रमुख, प्राध्यापक व विविध महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक, व्यावसायिक तसेच विद्यार्थी-विद्यार्थीनीं यावेळी उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक प्रा. प्रशांत क्षीरसागर यांनी केले.यानंतर परिषदेचे संयोजक व मेकनिकॅल विभागप्रमुख डॉ.एस.एन.वाघमारे यांनी परिषदेचा उद्देश
थोडक्यात स्पष्ट केला. प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी ही परिषद इंजिनीरिंग क्षेत्रामध्ये काम
करणा–या सर्वांसाठी प्रेरणा देणारी असून ग्रामीण भागाच्या विकासासाठी योगदान देणारी ठरेल असा विश्वास व्यक्त केला. मुख्य अतिथी व ए आय इ इ, रत्नागिरी चे संचालक मिलिंद दातार हे आपल्या भाषणात म्हणाले कि, टेक्नोलॉजी व ग्रामीण विकास या परस्पर पूरक गोष्टी आहेत. विकास हा आत्मकेंद्रित किवा फक्त पैसा कमावण्यासाठी न राहता तो ग्रामीण व वंचित समाजापर्यंत पोचावा. हा विषय फार संवेदनशील असून यावर परिषद आयोजित केल्याबद्दल महाविद्यालयाचे त्यांनी अभिनंदन केले.मा.श्री.रवींद्रजी माने आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, नवीन तंत्रज्ञान हे विकासाला योग्य दिशा देणारे असावे. तंत्रज्ञानातील बदल हे ग्रामीण विकासाला पूरक असावेत. इथे सादर होणा-या ज्ञानाचा व संशोधनाचा वापर ग्रामीण विकासासाठी व्हावा असे सांगून त्यांनी विविध महाविद्यालयातून आलेल्या सहभागींना शुभेच्छा दिल्या.परिषदेमध्ये यानंतर सत्र प्रमुखांच्या देखरेखीखाली सर्व सहभागींनी आपले शोधनिबंध सादर केले. यामध्ये जवळपास ७० शोधनिबंध सादर केले गेले. कॉम्पुटर, इलेक्ट्रॉनिक्स व आय टी विभागाचे सत्र प्रमुख म्हणून गद्रे इन्फो टेक प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव गोगटे यांनी काम पहिले. मेकनिकॅल, ऑटोमोबाईल व प्रोडक्शन विभागाचे सत्र प्रमुख म्हणून जीपीआर रत्नागीरीचे प्रा. डी. एम. शिंदे यांनी काम पहिले तर सायन्स व व्यवस्थापन विभागाचे सत्र प्रमुख म्हणून आठल्ये सप्रे महाविद्यालयाचे कॉमर्स विभागप्रमुख डॉ. मगदूम यांनी काम पहिले.
परिषदेच्या सांगता समारंभात सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी
मान्यवरांच्या हस्ते सी डी चे अनावरण करण्यात आले. या परिषदेमध्ये सादर झालेले सर्व शोधनिबंध महाविद्यालयाकडून IJREAM या युजिसी ने प्रमाणित केलेल्या जरनल मध्ये प्रकाशित केले जाणार आहेत.
या परिषदेचे नियोजन महाविद्यालयाच्या मेकनिकॅल विभागाने केले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
महाविद्यालयाच्या सर्व शाखातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे सहकार्य लाभले.
फोटो: परिषदेच्या सी डी चे अनावरण करताना मा.श्री.रवींद्रजी माने , डावीकडून: सचिन वाघमारे, डॉ. महेश भागवत,मिलिंद दातार, डी. एम. शिंदे, डॉ. मगदूम, वैभव गोगटे.

राजेंद्र माने इंजिनीअरिंग महाविद्यालयाच्या एम एच - ०८ रेसिंग टीमचे अभिमानास्पद यश

प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या अंबव येथील राजेंद्र माने इंजिनीअरिंग महाविद्यालयातील एम एच ०८ रेसिंग टीमने FMAE FFS
2018 या नुकत्याच तमिळनाडूतील कोईमतूर येथे पार पडलेल्या फॅार्मुला स्टूडंट स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे.
कोकणातील ही एकमेव फॅार्मुला स्टूडंट रेसकार भारतातील ‘बेस्ट डीझाइन’ आणि ‘कमी वजनाची रेसकर’ विजेती ठरली आहे.
२८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०१८ या कालावधीमध्ये येथे झालेल्या FMAE FFS 2018 या राष्ट्रीय स्तरावरील फॅार्मुला स्टूडंट स्पर्धेत
या इंजीनीअरिंग महाविद्यालयाच्या टीम MH-08 रेसिगची महालक्ष्मी – ४ ही रेसकार सहभागी झाली होती. तांत्रिक चाचणी, ब्रेक,
ध्वनी, गती, यासारख्या सुरुवातीच्या महत्वाच्या चाचण्या तसेच मोटार जगातील दिग्गज परीक्षकांसमोर दिलेल्या सफल
सादरीकरणानंतर रेसकार ट्रॅकवर उतरली. यानंतर निर्धारित अंतर समाधानकारक वेळेत पार केल्यानंतर या रेस कारला भारतातील
बेस्ट डीझाइन आणि सर्वात हलकी रेसकर अशी दोन विजेतीपदे घोषित करण्यात आली.
“मेड इन इंडिया” या ना-याने प्रभावित झालेल्या कोकणातील माने इंजीनीअरीगचे विद्यार्थी सलग ४ वर्षापासून या अत्युच्च क्षमतेच्या
फॅार्मुला स्टूडंट रेसकारची निर्मिती करीत आहेत.
वा-याशी स्पर्धा करणा-या या गाड्यांच्या स्पर्धेकडे जगभरातील क्रीडा शौकीनांचे लक्ष होते. वेगाची नशा, अचूक निर्णय, क्षमता,
धाडस, जिद्द, चिकाटी, आणि तंत्रज्ञानाच्या अत्युच्च कसोटीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी भारतातील मोठमोठ्या अभियांत्रिकी
महाविद्यायाच्या ५८ फॅार्मुला स्टूडंट टीमशी स्पर्धा करीत राष्ट्रीय स्तरावर सलग दुस-यांदा बेस्ट डीझाइन रेसकार अॅवार्ड पटकाविला.
तसेच यांत्रिकी कौशल्य, सखोल अभ्यास व मेहनतीच्या जोरावर भारतातील सर्वात हलक्या वजनाची रेसकार बनवली.
संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री मा. रवींद्र माने, कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहा माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत यांचे टीमला प्रोत्साहन
लाभले. पद्मनाभ शेलार, टीम सल्लागार प्रा. अच्युत राउत, मेकॅनिकॅल विभागप्रमुख डॉ. सचिन वाघमारे या सर्वांचे याकामी
मार्गदर्शन व सहकार्य लाभले. टीममध्ये प्रणीत वाटवे याच्या नेतृत्वाखाली दिवेश भारती, अजिंक्य पाटील, अमित माळी, कोमल
सावंत, धनंजय सर्वेकर, मनीष केरकर, अभिजित गोसावी, कुणाल चव्हाण, कोमल मदने, संदेश पालेकर, जयप्रकाश गुप्ता, श्रुती तिखे,
सौरभ फुटक, काकासाहेब चौगुले, संकेत चव्हाण, शैलेश सागवेकर, सिद्धांत जाधव हे विद्यार्थी सहभागी होते. संस्थेचे व्यवस्थापन
सदस्य, प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच परिसरातून या टीममधील विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.