Friday, March 3, 2017

राजेंद्र माने अभियांत्रिकीचा कुणाल भिडे संगीत विशारद !!


  राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक विभागाचा तृतीय वर्षामध्ये शिकणारा कुणाल भिडे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय संचलित संगीत विशारदही परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाला. गांधर्व महाविद्यालय मंडळ हे भारतीय शास्त्रीय संगीताच्या उन्नतीसाठी कार्यरत असून वाशी स्थित मंडळाशी १२०० संस्था आणि ८०० परीक्षा केंद्रे संलग्न आहेत. भारतातील आसाम पासून ते केरळ पर्यंत विविध परीक्षा केंद्रातून प्रारंभिक ते संगीताचार्य अशा परीक्षांना दर वर्षी सुमारे एक लाखांपेक्षा जास्ती विद्यार्थी बसतात.
  अशाच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाशी संलग्न ‘देवरुख ललित कला अकादमी,देवरुख’ या परीक्षामंडळामध्ये कुणाल भिडे संगीत विशारदही परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाला. कुणालला लहानपणापासूनच गाण्याची आवड,त्यातच त्याची आत्या शिल्पा मुंगळे यांच्या प्रोत्साहनामुळे त्याची ही आवड वृद्धिंगत झाली. राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाल्यानंतर त्याला युथ फेस्टिवल,भारतीयम,आरोहन यासारखी व्यासपीठे उपलब्ध झाल्यामुळे त्याच्या उपजत कलागुणांना अधिकच वाव मिळाला.
   त्याच्यावर रत्नागिरी येथील सौ.संगीता बापट तसेच सौ.राधा भट या गुरूंचे संस्कारही झाले.त्यातच कथ्थक अलंकार शिल्पा मुंगळे यांनी नुसते गाणे गाण्यापेक्षा स्वत:चे गाणे विविध परीक्षांच्या माध्यमातून अधिक तंत्रशुद्ध करण्याचे आवाहन केले.त्यामुळे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या माध्यमातून त्याने शास्त्रीय संगीताच्या विविध परीक्षा देण्यास सुरुवात केली.
   या परीक्षामालेतील ‘संगीत विशारद’ हि सातवी परीक्षा तो प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाला.आपल्या यशाचे श्रेय तो गुरु आणि पालकांना देतो तसेच आपल्या यशामध्ये कथ्थक अलंकार शिल्पा मुंगळे यांची भागीदारीही व्यक्त करतो. ‘संगीत विशारद’ झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना कुणाल म्हणाला कि गेली इतकी वर्षे तो जी संगीताची सेवा करत आहे त्या संगीत सेवेमध्ये परीक्षा या वेगळा दृष्टीकोन देतात,अशा परीक्षांमधूनच विचारांची प्रगल्भता निर्माण होते.
 

  कुणालच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष श्री.रवींद्रजी माने तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment