Tuesday, January 30, 2018

माने अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबिर संपन्न‼

 
फोटो:- राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व प्राध्यापक

  प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे एक आठवड्याचे ग्रामीण विकास विषयक जनजागृती युवक युवती शिबिर नुकतेच निवे बुद्रुक येथे पार पडले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी व्यसपीठावर आंबव गावचे सरपंच श्री.रुपेश माने,
उपसरपंच श्री.सुनिल तावडे, ग्रामस्थ प्रतिनिधी श्री.प्रकाश पर्वते,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा.राहुल बेळेकर आणि प्रा.विस्मयी परुळेकर उपस्थित होते.

   विद्यार्थी प्रतिनिधी कु.अभिजित मोहिते यांने प्रास्ताविक केले. प्रा.राहुल बेळेकर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व जाणून घेऊन विद्यार्थ्यांनी ग्रामविकासाबाबत कार्य करण्याचे आवाहन केले.तसेच प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी राष्ट्रीय सेवा योजना देशाच्या विकासात कसा मोलाचा वाटा उचलू शकते हे पटवून दिले. या शिबिरामध्ये महाविद्यालयाच्या सुमारे ४० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.

  या अंतर्गत कालीश्री मंदिर,सिद्धेश्वरमंदिर,वरदानदेवी मंदिर,नागझरी या परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर निवे आणि आंबव गावामध्ये सांडपाण्याच्या नियोजानासाठी दोन शोषखड्डे खोदण्यात आले.तसेच ग्रामस्थांसाठी आंबव ग्रामपंचायत येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.या शिबिरामध्ये श्रमदानातून तीन बंधारे बांधण्यात आले. त्याचबरोबर निवे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले. एक आठवडा चाललेल्या या  शिबीरामध्ये योगा,श्रमदान याचबरोबर रोज व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले.या व्याख्यानमालेमध्ये कनिष्ठ महाविद्यालय देवरुख येथील प्रा.अरविंद कुलकर्णी यांचे “विवेकानंद आणि भारतीय राष्ट्रवाद” या विषयावर तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री.युयुत्सु आर्ते यांचे आपत्ती व्यवस्थापन आणि श्री.सदानंद आग्रे यांचे ‘संत साहित्य काळाची गरज’ या विषयावरील व्याख्याने लक्षवेधी ठरली.श्री.मारुती जोशी यांची ‘अंधश्रद्धा निर्मुलन’ तर श्री.सदानंद भागवत यांनी ‘सामाजिक उद्योगशीलता’ या विषयावर अत्यंत समर्पक विचार मांडले.  


  शिबीर यशस्वी होण्यासाठी प्रा.विस्मयी परुळेकर,प्रा.अमोल कुंभार,श्री.समीर यादव याचबरोबर  विद्यार्थी प्रतिनिधी सुशांत धारवट,प्रविण कुडव,तेजस लेले,सुयोग खेडेकर यांनी परिश्रम घेतले.   

Sunday, January 21, 2018

राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या “आरोहन २०१८” चे शानदार उदघाटन !!

फोटो:- आरोहन २०१८ च्या उदघाटनप्रसंगी विभागवार सुरेख व शिस्तबद्ध संचालन करताना महाविद्यालयाचे विद्यार्थी
   प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आरोहन २०१८ या    वार्षिक कला, क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाचे शानदार उदघाटन करण्यात आले. संस्थाध्यक्ष महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री श्री. रविंद्रजी माने यांच्या शुभहस्ते पार पडलेल्या या उदघाटनप्रसंगी तुळसणी विद्यालयाचे हेडमास्तर क्रीडा शिक्षक श्री.एम.के.काळे सर,प्राचार्य डॉ. महेश भागवत, महाविद्यालयाच्या सर्व विभागांचे विभागप्रमुख, आरोहनचे क्रीडा समन्वयक प्रा.विकास मोरे ,सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. विश्वनाथ गुरव तसेच विद्यार्थी प्रेसिडेंट साहिल शिर्के,व्हाईस प्रेसिडेंट गजानन जुवळेकर,विद्यार्थी क्रीडाप्रमुख वैभव नांदगावकर व्यासपीठावर उपस्थित होते.

   महोत्सवाची सुरुवात इशस्तवनाच्या मंगल सुरांमध्ये मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर  मान्यवरांचे महाविद्यालयातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आरोहनची क्रीडाज्योत श्री कालीश्री मंदिरात प्रज्वलित करून मिरवणुकीने क्रीडांगणामध्ये आणण्यात आली.  या क्रीडाज्योतीची मा. श्री. रविंद्रजी माने यांच्या हस्ते क्रीडांगणामध्ये स्थापना करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विभागवार सुरेख शिस्तबद्ध संचालन करून मान्यवरांना मानवंदना दिली. याप्रसंगी विद्यार्थी क्रीडाप्रमुख वैभव नांदगावकर यांने सहभागी विद्यार्थ्यांना खिलाडूवृत्ती निष्ठेची शपथ दिली.

   प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना खेळामध्ये खिलाडूवृत्तीचे महत्त्व विषद केले पुढील दहा दिवस चालणा-या विविध कला क्रीडा प्रकारांमधील स्पर्धांमध्ये त्याची जोपासना करावी असे सांगितले. महाविद्यालयास नुकत्याच प्राप्त झालेल्या नॅकच्याबी प्लसमानांकनाचा, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (ए.आय.सि.टी.ई),सि.आय.आय सर्व्हेमध्ये सलग दुसऱ्यांदा सुवर्णश्रेणी प्राप्त झाल्याचा तसेच इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आय.एस.टी.ई) या संस्थेकडून महाराष्ट्र व गोवा विभागासाठीचा ‘बेस्ट इंजिनीअरिंग कॅम्पस’ हा अॅवॉर्ड मिळाल्याचा आवर्जून उल्लेख केला.
  संस्थाध्यक्ष रविंद्रजी माने म्हणाले की संघर्ष करण्याची जिंकण्याची तीव्र इच्छा आपल्यात असेल तर जीवनात आलेल्या प्रसंगांचा आपण यशस्वीरीत्या सामना करू शकतो. महाविद्यालय ह्या वर्षी २० व्या वर्षात पदार्पण करत असून यापुढेही अशीच यशस्वी वाटचाल करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
   या कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या संचलन प्रकारचा निकाल जाहीर करण्यात आला.त्यामध्ये मेकॅनिकल विभागाने प्रथम, ऑटोमोबाईल विभागाने द्वितीय अणुविद्युत दूरसंचार  विभागाने तृतीय क्रमांक पटकाविला.या क्रीडाप्रकाराचे परीक्षण प्रा.काळे यांनी केले. २८ जानेवारी पर्यंत चालणा-या या महोत्सवामध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, टेनिस यांसारख्या मैदानी खेळांबरोबरच कॅरम,पेंटिंग,कविता लेखन,व्यंगचित्रकला यांसारख्या विविध स्पर्धांचा समावेश असणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वप्नील तांबे श्रिया पालकर यांनी केले. क्रीडा समन्वयक प्रा.विकास मोरे यांनी मान्यवर सर्व उपस्थितांचे आभार मानले.