Tuesday, August 30, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात निसर्ग सहलीचे आयोजन!!

देवरुख: अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांची निसर्गासोबत असलेली नाळ तुटू नये आणि त्यांच्यात निसर्गासोबत आत्मियता निर्माण व्हावी या उदात्त हेतूने राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील नेचर क्लब तर्फे विद्यार्थ्यांसाठी निसर्ग सहलीचे आयोजन करण्यात आले.
  एक दिवस - निसर्गाच्या सानिध्यात या संकल्पनेला मूर्त स्वरूप देताना नेचर क्लब तर्फे विशाळगड महादरवाजा,अहिल्याबाई होळकर समाधी,वाघदरा,बर्की धबधबा हि  निसर्ग सहल आयोजित करण्यात आली.सदर सहलीमध्ये ५५ विद्यार्थ्यांसह तीन प्राध्यापक सहभागी झाले होते.
  या  निसर्ग सहलीचा उद्देश स्पष्ट करताना नेचर क्लबचे इनचार्ज व सहल समन्वयक प्रा. मंगेश प्रभावळकर यांनी शिवरायांच्या पराक्रमाने पवित्र झालेल्या व बाजी प्रभूंच्या रक्ताने पावन झालेल्या विशाळगड व पावनखिंडीची माहिती दिली. गड किल्ले,ऐतिहासिक ठिकाणांची माहिती व प्रत्यक्ष दर्शन तसेच निसर्गाच्या सानिध्यात चार निवांत क्षण व्यतीत करत असतानाच निसर्गाची उपयुक्तता विद्यार्थ्यांना जाणवावी या उद्देशाने नेचर क्लब कार्यरत आहे.
  आजपर्यंत निसर्ग सहलीचे बरेचसे उपक्रम या क्लब तर्फे करण्यात आले असून वृक्षारोपणासारख्या सामाजिक बांधिलकीचे उपक्रमही पार पडलेले आहेत.या  निसर्ग सहलीमध्ये विद्यार्थ्यांना विशाळगड महादरवाजा,अहिल्याबाई होळकर समाधी,वाघदरा,बर्की धबधबा, महादेव मंदिर ,राजवाडा, मलिक रेहान दर्गा, पावनखिंड इ. ठिकाणांची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली.

  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत यांच्या प्रोत्साहनातून पार पडलेलता या निसर्ग सहलीमध्ये समन्वयक प्रा. मंगेश प्रभावळकर तसेच  प्रा. राहुल पोवार, प्रा. माणिक पवार सहभागी झाले होते.सहल अविस्मारणीय बनवण्यासाठी हर्शल मोचेमाडकर,सुशांत धारवट,योगिता ढमके,मनीष वारणे,अनिकेत लाखण,हर्षाली,अक्षता,स्वराज सावंत यांनी परिश्रम घेतले. 

Thursday, August 25, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ‘‘रेन वॉटर हार्वेस्टिंगवर’’ व्याख्यान !!फोटो:- “ग्रामीण विकासासाठी तंत्रज्ञानाची उपयुक्तता” या विषयावर व्याख्यान देताना जलवर्धिनी या अशासकीय सामाजिक संस्थेचे श्री.उल्हास परांजपे

देवरुख वार्ताहर:
  महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण होण्यामध्ये मानवाचाही वाटा आहे पण हा दुष्काळाचा प्रश्न सोडवण्यासाठीही आपण खारीचा वाटा कसा उचलू शकतो हे समजून घेणे उपयुक्त ठरेल.कमी अधिक प्रमाणात पाऊस सर्वत्र पडतो पण हा सर्वत्र पडणारा पाऊस बहुतांशीवेळी वाया जातो. म्हणूनच उपलब्ध पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि संधारण याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.अशा प्रकारच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.निमित्त होते ते प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडलेल्या एकदिवशीय कार्यशाळेचे!
  ग्रामीण विकासासाठी तंत्रज्ञानाची उपयुक्तता याविषयावर पार पडलेल्या या कार्यशाळेत उपहारानंतरच्या सत्रामध्ये व्याख्यान देताना जलवर्धिनी या अशासकीय सामाजिक संस्थेचे श्री.उल्हास परांजपे यांनी हे मत व्यक्त केले.व्याख्यानासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.मनोहर सुर्वे, कार्याध्यक्षा सौ.नेहाजी माने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत आणि सर्व प्राध्यापक उपस्थित होते.सुरवातीला प्राचार्य डॉ.भागवत यांनी व्याख्यात्यांची ओळख करून दिली.
   आपल्या व्याख्यानामध्ये श्री. परांजपे यांनी शास्त्रीयदृष्ट्या पावसाच्या पाण्याचे संधारण या संदर्भात माहिती देताना पावसाचे पाणी गोळा करणे,साठवणे,जमिनीखालील पाण्याच्या साठ्याची पातळी वाढवणे यासारख्या असंख्य मुद्द्यांचा परामर्श घेतला. तसेच त्यांनी उपेक्षित असलेल्या अत्यंत कमी खर्चिक फेरोसिमेंटिंग तंत्रज्ञानाचा वापर ग्रामीण विकासासाठी जास्तीत जास्त कसा करता येऊ शकतो यासंदर्भात मार्गदर्शन केले व या तंत्रज्ञानाचा उपयोग करून मूर्त स्वरुपात साकारलेल्या विविध प्रकल्पांचीही छायाचित्रांसह माहिती दिली.

  राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसराची प्रत्यक्ष पाहणी व अभ्यास करून जलसंधारणाबाबत त्यांनी सुयोग्य मार्गदर्शन केले व कृती आराखडाही तयार करून दिला. व्याख्यात्यांचे आभार व्यक्त करताना प्राचार्य डॉ.भागवत यांनी श्री.परांजपे यांच्या ज्ञानाचा उपयोग करून महाविद्यालयातील अंतिम वर्षाचे काही प्रकल्प सामाजिक उपयोगितेचे भान ठेवून करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.भोपळे सर,प्रा.डिके व प्रा.भंडारी यांचे सहकार्य लाभले.

Wednesday, August 17, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकी मध्ये श्री.रविंद्र माने यांचा वाढदिवस साजरा

 आंबव येथील प्रथितयश प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाचा १८ वा वर्धापनदिन व संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री श्री.रविंद्र माने यांचा ५८ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
  या प्रसंगी  व्यासपीठावर संस्थाध्यक्ष श्री. रविंद्र माने यांचेसह कार्याध्यक्षा सौ.नेहा माने, सचिव श्री. चंद्रकांत यादव,सहसचिव श्री.दिलीप जाधव, संचालिका जान्हवी माने,प्रद्युम्न माने, सौ.जयश्री दळवी, प्राचार्य डॉ. महेश भागवत,माजी प्राचार्य डॉ. सुरेंद्र कुमार, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.सुहास पाटील, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्य विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.
  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांतर्फे शुभेच्छा दिल्या.यानंतर माजी प्राचार्य डॉ. सुरेंद्र कुमार यांनी मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून साहेबांच्या हस्ते केक कापण्यात आला.शुभेच्छाला उत्तर देताना श्री. रविंद्र माने हा आपल्या आयुष्यातील भावनाप्रधान दिवस असल्याचे सांगितले.आपल्या माणसांच्या शुभेच्छांच्या जोरावर संस्थेची प्रगती होत असल्याचे पाहून समाधान वाटत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
  या प्रसंगी राजेंद्र माने तंत्रनिकेतनचे प्रा.वाकडे यांच्या “स्माईल विथ लाईफ” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. वर्धापनदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व नेचर क्लबतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे श्री.सत्यनारायण महापुजा प्रा. कोळेकर नवदांपत्याच्या हस्ते करण्यात आली. महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचार्यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला.

  श्री. गोसावी सर,भोम यांनी श्री.रविंद्र माने यांची रेखाटलेली रांगोळी यावर्षी उपस्थितांमध्ये लक्षवेधी धरली . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.मनोज सादळे यांनी केले.