Friday, March 3, 2017

राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅंड टेक्नोलॉजीमध्ये “पदवी प्रमाणपत्र वितरण” सोहळा संपन्न !!


फोटो :- पदवीप्रदान सोहळ्याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी मनोज पवार तसेच अध्यक्षस्थानी संस्थाध्याक्ष मा. श्री.रविंद्र माने, प्रमुख पाहुणे  श्री.एस. बी.नाईकवाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत,परीक्षा विभागप्रमुख प्रा.विश्वनाथ जोशी, प्रा.एस. डी. देठे
 आंबव, देवरुख येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित, मुंबई विद्यापीठ संलग्न राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅंड टेक्नोलॉजीमध्ये पदवी प्रमाणपत्र प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मुंबई विद्यापीठाच्या निर्देशानुसार महाविद्यालयातच पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात येते. या पदवीप्रदान सोहळ्यासाठी अध्यक्षस्थानी संस्थाध्याक्ष मा. श्री. रविंद्र माने उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे श्री. एस. बी. नाईकवाडे (सुप्रीटेंडंट, चॅरिटी कमिशनर ऑफीस, रत्नागिरी), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  महेश भागवत, परीक्षा विभागप्रमुख प्रा.विश्वनाथ जोशी, प्रा.एस. डी. देठे उपस्थित होते. दिपप्रज्वलनानंतर सरस्वतीपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

   प्रा.विश्वनाथ जोशी यांनी आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या यशस्वी निकालाचे विश्लेषण केले. महाविद्यालयातून पदवी प्राप्त करणारी ही १५ वी बॅच असून आत्तापर्यंत ३७८४ विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली आहे. याही वर्षी सर्वच विभागामध्ये महाविद्यालयाचे निकाल हे विद्यापीठाच्या सरासरी निकालापेक्षा सरस ठरले आहेत. महाविद्यालयाच्या विविध शाखांचे निकाल अनुक्रमे कॉम्प्युटर विभाग ९८.२८%, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभाग १००%, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम विभाग ९८.३९%, मेकॅनिकल विभाग ९६.७७%, ऑटोमोबाईल विभाग ९३.८८% व एम.एम.एस. विभाग ९५.८३% असे आहेत. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरुपात भरत देवरुखकर, मनोज पवार, अनिकेत गावकर, विभावरी देसाई, कौशल हलवाई, पुष्कर सावंत, झिलू राणे, सुभाषचंद्र जोशी या स्नातकांनी महाविद्यालयाप्रती आपल्या कृतज्ञता व्यक्त केल्या व आपल्या करिअरमध्ये संस्थेचे व प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे असे आवर्जून नमूद केले.

    आपल्या स्वागतपर भाषणात प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी स्नातकांना पदवी हा आयुष्याचा एक महत्वाचा भाग असून ही नवीन आयुष्याची सुरुवात असल्याची जाणीव करून दिली. विद्यार्थ्यांच्या मागील चार वर्षांच्या श्रमाचे फळ त्यांना मिळाले तसेच मागील वर्षी महाविद्यालयाच्या ४० विद्यार्थ्यांना चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. नुकतीच महाविद्यालयाने माजी विद्यार्थ्यांसाठी चॅरिटी कमिशनर ऑफीसबरोबर(धर्मादाय आयुक्त संस्थेबरोबर) नोंदणी केली आहे असे ते म्हणाले. यापुढील काळातही माजी विद्यार्थ्यांनी संस्थेशी संपर्कात राहावे असे आवाहनही त्यांनी केले. 

  याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री.एस.बी.नाईकवाडे (सुप्रीटेंडंट,चॅरिटी कमिशनर ऑफीस,रत्नागिरी) हे स्वत: MPSC स्पर्धा परीक्षेचे ट्रेनर असून त्यांनी उपस्थित स्नातकांना शासकीय सेवा नोकरी संदर्भात अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. शासकीय सेवेमध्ये लोकांच्या हितासाठी काम करणे महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले. निर्णयक्षमता, अभ्यासाचे नियोजन योग्यप्रकारे करणे, अभ्यासातील सातत्य, स्वपरीक्षण करणे याचे महत्त्व त्यांनी विशद केले. स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी आपला विद्यार्थ्यांचा गट असणे, आपले काय चुकते आहे हे कळणेसुद्धा आवश्यक आहे असे त्यांनी नमूद केले.
 
    आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री.रविंद्र माने यांनी उपस्थित स्नातकांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. श्री. माने यांनी सांगितले की ज्ञानाचा व बुद्धिमत्तेचा वापर हा आपल्या देशाच्या विकासासाठी व्हायला हवा कारण आपण विद्यार्थीच या समाजाचे आधारस्तंभ आहात त्यामुळे आपणाकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. यशासाठी मी जिंकणारच ही भावना असणे महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले.

  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परीक्षा विभागप्रमुख प्रा.विश्वनाथ जोशी तसेच प्रा.गुरुप्रसाद बुर्शे, प्रा.वैभव डोंगरे, प्रा.स्नेहल मांगले, प्रा.प्रसाद माने, प्रा.प्रल्हाद गमरे, प्रा.विस्मयी परुळेकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन प्रा.एस. डी. देठे यांनी केले. प्रा. इसाक शिकलगार यांनी आभारप्रदर्शन केले.



No comments:

Post a Comment