Saturday, January 19, 2019

तंत्रज्ञानयुक्त अध्यापन काळाची गरज - खा. विनायक राऊत (राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्यांची कार्यशाळा संपन्न)


              सध्याच्या शिक्षण प्रणालीत कालानुरूप बदल होत आहेत. या बदलाना तत्परतेने व प्रभावीपणे सामोरे जायचे असेल तर त्यानुसार अध्ययन व अध्यापनामध्ये आवश्यक बदल घडवून आणणे व त्यायोगे विद्यार्थ्यांची तयारी करून घेऊन त्यांचा  दृष्टिकोन बदलणे क्रमप्राप्त झाले आहे. ही आजच्या काळाची तसेच आजच्या शैक्षणिक प्रणालीची गरज ओळखून   आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने इंजिनिअरिंग  कॉलेजने  ११ जानेवारीला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांसाठी “कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण आणि बदलते संदर्भ” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील बहुसंख्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी या कार्यशाळेमध्ये आपला सहभाग नोंदविला.

कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रविंद्रजी माने यांच्या शुभहस्ते व कार्याध्यक्षा  सौ नेहा माने ,प्राचार्य डॉ. महेश भागवत , प्रमुख वक्ते तसेच शिक्षण तज्ञ डॉ. सुभाष देव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी रत्नागिरी- सिंधुदुर्गचे खासदार श्री. विनायक राऊत आणि चिपळूणचे आमदार श्री. सदानंद चव्हाण यांनी देखील सदिच्छा भेट दिली. मा. विनायकजी राउत यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले कि, तंत्रज्ञानयुक्त अध्यापन ही काळाची गरज बनत चालली आहे. यावरील  कार्यशाळा हा संस्थेचा स्तुत्य उपक्रम असून याचा संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना नक्कीच  उपयोग होईल. त्यांनी शेवटी महाविद्यालयाच्या वीस वर्षांच्या यशस्वी वाटचालीबद्दल व्यवस्थापनाचे अभिनंदनही केले.
             कार्यशाळेची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविकात त्यांनी कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला तसेच सध्याच्या शिक्षण प्रणालीत दिवसेंदिवस होणारे बदल व त्यानुसार अध्ययन व अद्यापानातील आवश्यक असणारे बदल याविषयी आपले मत मांडले. त्यानंतर संस्थाध्यक्ष रविंद्रजी माने यांनी पिढी घडविताना शिक्षणातील झालेला बदल व त्यासाठी शिक्षकांची बदल स्वीकारण्याची मानसिकता याविषयी मार्गदर्शन केले.
             कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात प्रमुख वक्ते डॉ. सुभाष देव यांनी शिक्षणातील बदल स्वीकारण्या संदर्भात शिक्षक व पालकांची भूमिका यावर मार्गदर्शन केले. त्यांनी बारावी नंतर उपलब्ध असणाऱ्या उच्च शिक्षणाच्या संधी, आजच्या शिक्षण प्रणाली बाबत शिक्षक व विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन, तसेच शिक्षण प्रणालीतील अडचणी यावर चर्चासत्र घेतले.
            तृतीय सत्रात महाविद्यालयाचे कॉम्पुटर विभाग प्रमुख प्रा. मुश्ताक गडकरी यांनी अध्यापन सुसूत्रीत व प्रभावी करण्यामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग यावर विस्तृत भाष्य केले.  सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जगात विद्यार्थ्यांचा संगणक तसेच मोबाईलचा वापर वाढलेला दिसून येतो. यामुळे आय सी टी सारख्या तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर केल्यास त्याचा विद्यार्थ्याना लाभ होऊ शकतो. यात त्यांनी व्ही लॅब , ईडीमोडो अशा अनेक तंत्रांचे उपस्थिताना प्रात्यक्षिक दाखविले.
            कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी उपस्थित प्राचार्यांनी कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल व्यवस्थापनाचे आभार मानले तसेच येथील शिक्षण पद्धती व तंत्रज्ञानाशी निगडीत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले . कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. देठे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.


No comments:

Post a Comment