Sunday, February 7, 2016

माने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी फुलवले आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेह-यावर हास्य !

माने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी फुलवले आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या
चेह-यावर हास्य ! 


 कुतूहल मिश्रित नजरा, चेह-यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि या आनंदमिश्रित हास्यात तरळणारे निरागस भाव, भावनांच्या या हिंदोळ्यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या मनाचाही ठाव घेतला. निमित्त होते ते निवे येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे.आंबव येथील राजेंद्र  माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील ऑटोमोबाईल विभागाच्या विद्यार्थ्यांनी आज एक वेगळेच भावनाविश्व अनुभवले.आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना या मुलांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि अशातच नवरात्रीसारख्या काही कार्यक्रमातून शिल्लक ठेवलेल्या पैशाचा विनियोग समाजोपयोगी कार्यासाठी व्हावा अशी अपेक्षा विभागप्रमुख प्रा.निमेष ढोले यांनी व्यक्त केल्यानंतर ऑटोट्रेंडस या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून इनचार्ज प्रा. राहुल राजोपाध्ये व विभागप्रमुख प्रा.निमेष ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली ऑटोमोबाईल विभागाच्या विद्यार्थ्यांनी या कार्याला मूर्त स्वरूप दिले.
  निवे येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना या प्रसंगी त्यांना उपयुक्त  ठरेल असे शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले.या प्रसंगी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. यु.बी. चव्हाण, विभागप्रमुख प्रा.निमेष ढोले, विद्यार्थी संघाचे प्रमुख प्रा. राहुल राजोपाध्ये, प्रा.सुमित सुर्वे, प्रा.अमोल यादव,श्री. रोहित मुरकर उपस्थित होते.

  विद्यार्थ्यांच्या चेह-यावर शैक्षणिक साहित्य स्विकारताना जितका आनंद दिसत होता त्यापेक्षा जास्त आनंद अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या चेह-यावर दिसत होता. या प्रसंगी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. प्रा. ढोले यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यास करून मोठे होण्याचा सल्ला दिला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सोमनाथ पाटील, सौरभ सुर्वे, रुपेश बाबर, आनंद हातपक्की यांचे सहकार्य लाभले.  

No comments:

Post a Comment