Wednesday, February 27, 2019

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात

आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी यामध्ये हिरीहीरीने सहभागी झाले होते.
यादिवशी पहाटे संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक या ठिकाणी स्वच्छता करून पूजा करण्यात आली. त्यानंतर याठिकाणी शिवज्योत प्रज्वलित करून छत्रपती शिवाजी महाराजाची पालखी ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीने आंबव येथील महाविद्यालाच्या प्रांगणात आणण्यात आली. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर शिवज्योत व पालखी येताच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत व उपस्थितांनी विधिवत पूजन केले तसेच प्रवेश्द्वारावरील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन केले. शिवचरित्र अभ्यासक प्रा. अरविंद कुलकर्णी यांचे यानंतर व्याख्यान झाले. शिवआरतीने व्याख्यानाला आरंभ करण्यात आला. प्रा कुलकर्णी यांनी “आजचा राष्ट्रवाद आणि शिवचरित्र” हा विषय घेऊन उपस्थितासमोर महाराजांचे जीवन व सध्ध्याचा राष्ट्रवाद यातील दुवा जोडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, शिवकालीन घटना या वास्तव असून आजही अचंबित करून जातात. त्यांचे चरित्र हे स्वधर्म, स्वदेशी व स्वभाषा या त्रिसूत्रीवर आधारलेले आढळते. महाराजांनी भारतामध्ये या तिन्ही गोष्टींचा सर्वप्रथम जागर केला. स्वधर्माचे उत्तम पालन व आचरण केले. स्वदेशीसाठी मोगल साम्राज्यामुळे उध्वस्त झालेल्या कारागिरांना पुन्हा प्रस्थापित केले. संगमेश्वरी गलबते, मजबुत किल्लेबांधणी यासारख्या गोष्टी त्याची आजही साक्ष देत आहेत. स्वभाषां जपण्यासाठी त्यांनी मराठीतून राज्यकोषही निर्माण केला. मात्र आजचा राष्ट्रवाद हा छत्रपतींच्या विचाराबरोबरच मोगल व ब्रिटीश साम्राज्य या सर्वांचे मिश्रण आहे. ते शेवटी म्हणाले कि, महाराजांच्या विचारातून अखंड जागरूकता, सावधानता, सामर्थ्य व प्रभावी प्रशासनाचा संदेश मिळतो.
राष्ट्राकल्याणासाठी त्यांचा हा आदर्श सर्वांनी अंगिकारला पाहिजे.महाविद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनीही यावेळी महाराजांवरील आपले विचार व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास मंचचे समन्वयक प्रा. विशाल पारकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. प्रा. अच्च्युत राउत
तसेच महाविद्यालयाच्या शिवप्रतिष्ठान व इतिहास मंचचे विद्यार्थी प्रतिनिधीं व सदस्य यांचेही सहकार्य लाभले.
फोटो: १) छत्रपती शिवाजी महाराजाची पालखी व शिवज्योत ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीने महाविद्यालयामध्ये आणताना
२) शिवचरित्रावर व्याख्यान देताना प्रा. अरविंद कुलकर्णी, उपस्थित मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी






No comments:

Post a Comment