Sunday, May 13, 2018

माने अभियांत्रिकीच्या तीन संशोधन प्रकल्पांची निवड !!


     
 
फोटो: संशोधन अनुदान उपक्रमांतर्गत निवड करण्यात आलेले प्राध्यापक डावीकडून अनुक्रमे प्रा.राहुल दंडगे, प्रा. पूनम क्षीरसागर व प्रा.लक्ष्मण नाईक
   देवरुख वार्ताहर:
   गतवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन संशोधन प्रकल्पांची विद्यापीठ अनुदान मंडळातर्फे संशोधन अनुदान उपक्रमांतर्गत निवड करण्यात आली. यामध्ये मेकॅनिकल विभागामधून प्रा.राहुल दंडगे, इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकॉम विभागातून प्रा. पूनम क्षीरसागर तसेच कॉम्प्यूटर विभागातून प्रा.लक्ष्मण नाईक यांच्या प्रकल्पांना मुंबई विद्यापीठातर्फे अनुदानाची घोषणा करण्यात आली. मुंबई विद्यापीठातर्फे अभियांत्रिकी तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये अत्याधुनिक संशोधनाला चालना मिळावी या उद्देशाने विविध संशोधन प्रकल्पांची निवड करण्यात येते.
   याअंतर्गत गेल्याचवर्षी सहा प्राध्यापकांच्या संशोधन प्रकल्पांना अनुदानीत करण्यात आले होते. हे सहा संशोधन प्रकल्प पूर्णत्वास जात असतानाच नवीन तीन संशोधन प्रकल्पांची निवड झाल्याने महाविद्यालयातील गुणवत्तेला चालना मिळाली आहे. यावर्षी मंजूर झालेल्या प्रकल्पांमध्ये मेकॅनिकल विभागामधून प्रा.राहुल दंडगे यांच्या प्रकल्पाला ३०,०००/- रुपयांचे अनुदान मिळाले आहे.तसेच इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकॉम विभागातून प्रा.पूनम क्षीरसागर, कॉम्प्यूटर विभागातून प्रा.लक्ष्मण नाईक यांच्या प्रकल्पांना प्रत्येकी २२,०००/- रुपयांचे अनुदान मिळाले आहे.

  मेकॅनिकल विभागामधून प्रा.राहुल दंडगे यांचा प्रकल्प “एक्स्प्लोरींग अँड अॅनालायझिंग द क्रिटीकल सक्सेस फॅक्टरस् फॉर इफेक्टिव्ह एससीएम इन इंडियन इंडस्ट्रीज युसिंग आयएसएम अँड टॉपसीस” हा आहे.भारतातील औद्योगिक विकास प्रगतीपथावर असून त्याच्या यशस्वीतेमध्ये सप्लाय चेन मॅनेजमेंट हा एक महत्त्वाचा घटक आहे. भारतीय औद्योगिक व्यवस्थेमध्ये या सप्लाय चेनचे अधिक प्रभावीपणे व यशस्वीपणे व्यवस्थापन करण्यासाठी जे महत्त्वाचे घटक आहेत ते ओळखणे व त्यांचा प्राधान्यक्रम ठरवणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.या प्रकल्पाअंतर्गत विविध मान्यवरांच्या मुलाखती घेऊन त्यानुसार सप्लाय चेनचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी संशोधन करण्यात येत आहे.

  इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकॉम विभागातून प्रा.पूनम क्षीरसागर ह्या “सोलर पॉवर ग्रास कटिंग रोबोट” या संशोधन प्रकल्पामध्ये सौर उर्जा ही सहज उपलब्ध असणारी अपारंपरिक उर्जा वापरून गवत कापणी करणारे यंत्र बनविणार असून यामध्ये मायक्रोकंट्रोलर,मोटर्स,सेन्सर्स आदींचा वापर करून स्वयंचलित असा रोबोट तयार करणार आहेत.शेती उद्योगासाठी हा प्रकल्प उपयोगी ठरेल. कॉम्प्यूटर विभागातून प्रा.लक्ष्मण नाईक यांचे संशोधन हे “ आयओटी(IOT) बेस्ड टेक्नोलॉजीस् टू एन्हांस व्हिलेज लाईफ ” या विषयावर असून ते आयओटी (Internet Of Things) हे आधुनिक तंत्रज्ञान वापरून स्वावलंबी गावाचे मॉडेल बनवणार असून असे गाव विविध सेवा,नोकरी पुरवून जगाशी असलेला संपर्क वाढवेल कारण राष्ट्र निर्मितीची व विकासाची सुरुवात प्रथम गावापासून होते. गावाला भेडसावणाऱ्या मुलभूत समस्या जसे की उर्जा,पाणी,सुरक्षा,जमीनीची चाचणी,पाण्याचे व्यवस्थापन आदींचे निराकरण करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

   महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत तसेच संस्थाध्यक्ष श्री. रवींद्र माने यांनी सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन केले व पुढील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या.


  
  

  


No comments:

Post a Comment