Thursday, August 25, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ‘‘रेन वॉटर हार्वेस्टिंगवर’’ व्याख्यान !!



फोटो:- “ग्रामीण विकासासाठी तंत्रज्ञानाची उपयुक्तता” या विषयावर व्याख्यान देताना जलवर्धिनी या अशासकीय सामाजिक संस्थेचे श्री.उल्हास परांजपे

देवरुख वार्ताहर:
  महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण होण्यामध्ये मानवाचाही वाटा आहे पण हा दुष्काळाचा प्रश्न सोडवण्यासाठीही आपण खारीचा वाटा कसा उचलू शकतो हे समजून घेणे उपयुक्त ठरेल.कमी अधिक प्रमाणात पाऊस सर्वत्र पडतो पण हा सर्वत्र पडणारा पाऊस बहुतांशीवेळी वाया जातो. म्हणूनच उपलब्ध पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि संधारण याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.अशा प्रकारच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.निमित्त होते ते प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडलेल्या एकदिवशीय कार्यशाळेचे!
  ग्रामीण विकासासाठी तंत्रज्ञानाची उपयुक्तता याविषयावर पार पडलेल्या या कार्यशाळेत उपहारानंतरच्या सत्रामध्ये व्याख्यान देताना जलवर्धिनी या अशासकीय सामाजिक संस्थेचे श्री.उल्हास परांजपे यांनी हे मत व्यक्त केले.व्याख्यानासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.मनोहर सुर्वे, कार्याध्यक्षा सौ.नेहाजी माने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत आणि सर्व प्राध्यापक उपस्थित होते.सुरवातीला प्राचार्य डॉ.भागवत यांनी व्याख्यात्यांची ओळख करून दिली.
   आपल्या व्याख्यानामध्ये श्री. परांजपे यांनी शास्त्रीयदृष्ट्या पावसाच्या पाण्याचे संधारण या संदर्भात माहिती देताना पावसाचे पाणी गोळा करणे,साठवणे,जमिनीखालील पाण्याच्या साठ्याची पातळी वाढवणे यासारख्या असंख्य मुद्द्यांचा परामर्श घेतला. तसेच त्यांनी उपेक्षित असलेल्या अत्यंत कमी खर्चिक फेरोसिमेंटिंग तंत्रज्ञानाचा वापर ग्रामीण विकासासाठी जास्तीत जास्त कसा करता येऊ शकतो यासंदर्भात मार्गदर्शन केले व या तंत्रज्ञानाचा उपयोग करून मूर्त स्वरुपात साकारलेल्या विविध प्रकल्पांचीही छायाचित्रांसह माहिती दिली.

  राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसराची प्रत्यक्ष पाहणी व अभ्यास करून जलसंधारणाबाबत त्यांनी सुयोग्य मार्गदर्शन केले व कृती आराखडाही तयार करून दिला. व्याख्यात्यांचे आभार व्यक्त करताना प्राचार्य डॉ.भागवत यांनी श्री.परांजपे यांच्या ज्ञानाचा उपयोग करून महाविद्यालयातील अंतिम वर्षाचे काही प्रकल्प सामाजिक उपयोगितेचे भान ठेवून करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.भोपळे सर,प्रा.डिके व प्रा.भंडारी यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment