Thursday, March 24, 2022

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील ११ विद्यार्थ्याची इन्फोजेन लॅब्ज कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड

 राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील ११ विद्यार्थ्याची इन्फोजेन लॅब्ज कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड

देवरुख येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील 11 विद्यार्थ्यांची इन्फोजेन लॅब्ज, पुणे येथील बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये यशस्वी निवड झाली आहे . ही कंपनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सॉफ्टवेअर क्षेत्रात नामांकित म्हणून ओळखली जाते. या कंपनीच्या प्रामुख्याने कॅलिफोर्निया तसेच यु.के. या ठिकाणी शाखा आहेत. भारतातील शाखा पुणे येथे आहे.

या कंपनीसाठी प्लेसमेंट ड्राईव्ह दिनांक २६ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. करोनाचे सर्व बंधनकारक नियम यावेळी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी कटाक्षाने पाळण्यात आले. या प्लेसमेंट प्रोसेस मध्ये  लेखी बुद्धीमत्ता चाचणी सहित टेक्निकल इंटरव्यू तसेच एच आर इंटरव्यू घेण्यात आले. या सर्व प्रोसेससाठी एकूण ६३  विद्यार्थी प्रवेशित झाले होते. ही निवड प्रक्रिया मेकॅनिकल ,ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसेच कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या सर्व शाखांसाठी घेण्यात आली.

एकूण निवड प्रक्रियेत विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विषयाचे ज्ञान व इतर कौशल्यांचा कस लागला. या कठीण प्रक्रियेनंतर एकूण अकरा विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली.

 

यामध्ये कॉम्प्युटर विभागातील संकेत धुरी, वैष्णवी आचरेकर, कामाक्षी प्रभू आजगावकर, शीतल गुरव, विनय भोले, पूर्वा पवार, सुरज कुंभार, राहुल गुप्ता हे विद्यार्थी तसेच ऑटोमोबाईल विभागातील सागर रेडकर व अनिकेत बने आणि मेकॅनिकल विभागातील प्रथमेश भूरवणे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

संस्थाध्यक्ष मा. श्री रवींद्र माने यांचा अथक प्रयत्न परिश्रमातून बावीस वर्षांपूर्वी उदयास आलेल्या या अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती सोबत इतर सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले जाते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आपल्या उज्वल भवितव्याचा हा समर्पक पर्याय ठरला आहे. उच्चशिक्षित शिक्षक वर्ग, अद्ययावत प्रयोगशाळा, वर्कशॉप, सर्व सोयींनी युक्त निवास व्यवस्था आणि अभ्यासासाठी अद्ययावत ग्रंथालयाची उपलब्धता हे सर्व घटक विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूरक प्रगतीस हातभार लावतात. एकूण ३५ एकर निसर्गरम्य परिसर, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकन, मुंबई विद्यापीठ व ए आय सी टी ई या शासकीय संस्थाशी संलग्नीकरण यामुळे  संस्था प्रगतीपथावर यशस्वी मार्गाक्रमण करीत आहे. यासाठी प्राचार्य तसेच प्राध्यापक सक्षमपणे कार्यरत आहेत. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवडले जात असून काही शिक्षण पूर्ण होण्याआधीच कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रियेद्वारे आपल्या करिअरमध्ये प्रवेशित होत आहेत .

या प्लेसमेंट प्रक्रियेसाठी कंपनीतर्फे श्री संकेत प्रभू, डायरेक्टर, इन्फोजेन लॅब्ज तसेच एच आर मॅनेजर व अन्य तज्ञांची समिती उपस्थित होती. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री रवींद्र माने तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी विशेष कौतुक केले आहे. ही प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहन गोसावी तसेच प्रा. स्नेहल मांगले व महाविद्यालयाची प्लेसमेंट टीम यांचे अथक  परिश्रम कारणीभूत ठरले या सर्वांतर्फे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

Photo Caption: इन्फोजेन लॅब्ज या कंपनीमध्ये निवड झालेल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमवेत प्राचार्य डॉ. महेश भागवत, संकेत प्रभू, प्रा. मोहन गोसावी व कंपनीचे इतर अधिकारी.



राजेंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

 राजेंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी शिवरायांना वंदन केलं जात आहे. राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिवप्रतिष्ठान समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोविड नियमांचे पालन करून मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे शिवजयंती साजरी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे यावर्षी  शिवजयंती साजरी करण्यात विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाचा उत्साह दिसून आला.

विद्यार्थ्यांनी प्रथम शिवज्योत संस्थेचे संस्थापक माननीय श्री रवींद्र माने यांच्या हस्ते प्रज्वलित करून  देवरुखहून  आंबव कॉलेज पर्यंत आणली. महाविद्यालयाच्या प्रांगणात शिवरायांच्या पालखीची  मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी सर्वांमध्ये कमालीचा  उत्साह होता. यानंतर महाविद्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये समन्वयक प्रा. अच्युत राऊत यांनी आपल्या प्रास्ताविकात शिवजयंतीचे महत्व विषद केले. 

 अध्यक्षीय भाषणात डॉ. महेश भागवत यांनी शिवाजी महाराजांचे अतुलनीय नेतृत्व आणि समाजकल्याणासाठी त्यांनी केलेलं कार्य पिढ्यानपिढ्या लोकांना प्रेरणा देत राहील, असे मत व्यक्त केले . आजच्या युवा पिढीने त्यांच्या मार्गदर्शक तत्वांचा व गुणांचा सखोल अभ्यास करून अंगीकार केला तर एक आदर्श युवापिढी  समाजाला मिळू शकेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी प्रा. अजित तातूगडे, प्रा. दीपक सातपुते, प्रा. मोहन गोसावी तसेच समीर यादव उपस्थित  होते.

यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये नाट्य, समूह गायन, शिवचरित्राची माहिती, गीत गायन अशा विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी नेहा विचारे हिने केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवप्रतिष्ठान  समितीच्या सर्व विद्यार्थी प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.







Monday, January 31, 2022

राजेंद्र माने महाविद्यालयाच्या एम एम एस विभागामध्ये उद्योजकता विकास व भागधारक व्यवस्थापन (स्टेकहोल्डर मॅनॅजमेंट)सेमिनारचे यशस्वी आयोजन

 

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एम एम एस विभागाने विद्यार्थ्यांसाठी  “उद्योजकता विकास व भागधारक व्यवस्थापन (स्टेकहोल्डर मॅनॅजमेंट)” या विषयावर सेमिनारचे आयोजिन केले होते. यामध्ये अभियांत्रिकी पदवीधर तसेच आय आय एम, अहमदाबाद मधून  एम बी ए पदवी प्राप्त व सध्या बंगळूर येथे स्टार्टअप मध्ये कार्यरत असलेले श्री कार्तिकेयन रामस्वामी यांचे  उपस्थित विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.

आजच्या जगात कोणताही उद्योग यशस्वी करण्यासाठी त्या उद्योगाच्या संबंधित सर्व घटकांना समान महत्व देणे आवश्यक असते. या घटकांमध्ये  ग्राहक, सरकारी यंत्रणा, पुरवठादार, सल्लागार, कर्मचारी इ. समाविष्ट होतात. या सर्वांचा योग्य ताळमेळ घालून व्यवसाय पुढे नेणे महत्वाचे असते. यासाठी व्यावसायिक व वैयक्तिक कौशल्ये कशी वापरावीत  याचे विशेष ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे या हेतूने या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.

उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी या कार्यक्रमाचे महत्व विशद केले. विद्यार्थ्यांनी नुसते नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय हा सुध्दा पर्याय स्वीकारावा असे आवाहन त्यांनी केले. सध्या नोकऱ्यांची उपलब्धता पाहता उद्योग  करण्याची मानसिकता आवश्यक असून तरुण वर्गाने हा पर्याय स्वीकारावा असे आवाहन त्यांनी केले. 

यानंतर विषय तज्ञ श्री कार्तिकेयन यांनी कोणताही व्यवसाय चालू करण्यासाठी असणारी मार्गदर्शक तत्वे व नियम यावर सविस्तर मार्गदर्शन यांनी केले. व्यवसाय चालू केल्यानंतर येणाऱ्या अडचणी व त्याचा सामना करण्यासाठी असणारी मानसिकता याचा सखोल विचार त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला. यासाठी त्यांनी काही उपक्रमांचा आधार घेतला. नवीन व्यवसाय वृध्धिंगत करण्यासाठी कोणत्या घटकांना महत्व दिले पाहिजे,  त्यांना कोणत्या प्रसंगी किती महत्व दिले पाहिजे, त्यांच्या अपेक्षांचा एक समान व्यासपीठावर कसा आढावा घेतला पाहिजे याची उद्बोधक चर्चा या प्रसंगी झाली.  आपल्या व्याख्यानाच्या शेवटी  ते म्हणाले कि, देशाची आर्थिक व सामाजिक प्रगती उद्योग वाढीवर अवलंबून असते. विकसित देशात उद्योजकांची संख्या अविकसित देशांच्या तुलनेत खुप अधिक आहे. तसेच आपला देश हा एक विकसित राष्ट्र होण्यासाठी अग्रेसर असून यासाठी युवा पिढीने उद्योजाग्तेकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.

या सेमिनारच्या माध्यमातून उपस्थित प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना व्यावसायाभिमुख शिक्षणाचा अनुभव मिळाला. तसेच या सर्व नियोजन पद्धतीमध्ये  व्यवस्थापन कौशल्ये कशी महत्वाची आहेत व त्यांचा समर्पक वापर कसा करावा याचेही ज्ञान झाले.

या कार्यशाळेचे नियोजन विभागप्रमुख प्रा. मोहन गोसावी यांनी केले. कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष व माजी मंत्री मा. श्री रवींद्र माने, संचालक मा. जान्हवी माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

फोटो: कार्यक्रम प्रसंगी विशेष अतिथी व तज्ञ मार्गदर्शक श्री रामसामी कार्तिकेयन सहभागी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना.