Tuesday, March 14, 2023

राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या टीम फुल थ्रोटलची राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी (राष्ट्रीय स्तरावर उपविजेतेपद

 आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविदयालयाच्या टीम फुल थ्रोटलने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्पर्धा गाजवली आहे. नुकत्याच बेंगळूरु येथे पार पडलेल्या गो कार्ट डीझाइन चॅलेंज स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.  इसनी मोटारस्पोर्ट फॉर्मुला गो कार्ट डीझाइन चॅलेंज सिझन नऊ  मध्ये निवड झालेल्या महाविद्यालयाच्या विविध शाखेतील २५ सदस्यीय टीमने एकूण तीन किताब पटकावून पुन्हा एकदा महाविद्यालायाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.

बेंगळूरु (कर्नाटक) येथे झालेल्या सर्वात प्रतिष्ठीत अशा स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या या टीमची निवड झाली होती. विविध शैक्षणिक संस्थामधील तब्बल ६५ हून अधिक टीम या स्पर्धेत उतरल्या होत्या. गोकार्ट  डीझाइन चॅलेंजस्पर्धेमध्ये दरवर्षी शेकडो दिग्गज शैक्षणिक संस्थाच्या विद्यार्थी टीम सहभागी होतात. ही स्पर्धा जनरल मोटर्स, टाटा मोटर्स, होंडा, फोर्ड यासारख्या ऑटोमोबाइल डिझाईन व उत्पादन क्षेत्रातील नामवंत कंपन्यांच्या अध्यक्षतेखाली घेतली जाते. या स्पर्धेत निवड होण्यासाठी सुरुवातीला तांत्रिक तपासणी, डिझाईन प्लान, खर्च मूल्यमापन, ब्रेक टेस्ट यासारख्या विशेष चाचण्या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातात. विशेष म्हणजे सर्व चाचण्यांमध्ये प्रथम पाच मध्ये स्थान मिळवत या टीमने अंतिम राष्ट्रीय  स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. या फेरीदरम्यान ३५  टीम पुढील डायनॅमिक इव्हेंटसाठी पात्र ठरल्या.

ऑगस्ट २०२२ मध्ये बेंगळूरु येथे पार पडलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभानंतर रेस, ऑटोक्रॉस, स्किडपॅड यासारखे डायनॅमिक इव्हेंट घेतले गेले. टीमची गुणवत्ता, तंत्रज्ञान व सर्व टेस्टच्या आधारे टीमला एकूण तीन प्रकारच्या स्टॅटीक व डायनॅमिक इव्हेंट ट्रॉफी बहाल करण्यात आल्या. त्यामध्ये ऑटोक्रॉस विनर ऑल ओवर इंडीया, ऑल ओवर इंडीया रनर अप, ऑल ओवर मुंबई विद्यापीठामध्ये प्रथम यांचा समावेश आहे.

देशभरातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनी स्पर्धा परीक्षण केले. टीम चा कप्तान महिप सावंत तसेच रामचंद्र रेगे, अश्विन टिके, अमोल सावंत व इतर विद्यार्थी सदस्यांचे परीक्षकानी विशेष कौतुक केले. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन या विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर व टीम अॅडवायझर प्रा. सुमित सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली या गो कार्टची निर्मिती केली आहे.

संस्थेचे संस्थापक व माजी राज्यमंत्री मा. रविंद्रजी माने, कार्यकारी अध्यक्ष सौ. नेहा माने, सर्व संस्था पदाधिकारी, प्राचार्य डॉ. महेश भागवत तसेच महाविद्यालयाच्या सर्व विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी टीममधील सर्व सदस्यांचे स्वागत करून अभिनंदन केले. टीमच्या या उत्तुंग यशामुळे विवध स्तरातील मान्यवरांकडून महाविद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

फोटो:




राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे स्वागत

 प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे आयोजित केलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता प्रचार यात्रेचे प्राचार्य डॉ. महेश भागवत, महाविद्यालयाच्या इन्स्टीट्युट इनोवेशन सेलचे प्राध्यापक सदस्य व विद्यार्थ्यांनी स्वागत केले.

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामध्ये देशातील तरुण वर्गाला नाविन्यपूर्ण कल्पना निर्माण करण्याची प्रेरणा मिळावी व त्या समाजासाठी उपयुक्त माध्यमामध्ये परावर्तीत करता याव्यात यासाठी मदत मिळावी या प्रमुख उद्देशाने इनोवेशन सेलची स्थापना करण्यात आली. तसेच त्यानुसार या मंत्रालयाकडून उच्च शिक्षण देणाऱ्या काही निवडक महाविद्यालयांना आपल्या ठिकाणीहि  इनोवेशन सेल  स्थापन करण्याचे निर्देश आहेत. या विविध संस्थांच्या स्वतंत्रपणे कार्यरत असणा-या सेलमार्फत त्या त्या भागातील युवकांना स्टार्टअप व त्यांच्या संकल्पना साकारण्यासाठी साठी पूरक यंत्रणा उभी करणे यावर भर दिला जात आहे.   

या अनुषंगाने महाविद्यालयामध्ये स्थापन झालेल्या इन्स्टीट्युट इनोवेशन सेलमार्फत विद्यार्थ्यांना उद्योजकता वाढीसाठी बहुमोल मार्गदर्शन करण्यात येते. नामांकित उद्योजक, गुंतवणूकदार, व्यावसायिक यांची व्याख्याने तसेच कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे सकारात्मकतेने पाहण्याची दृष्टी देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. संस्थाध्यक्ष व माजी राज्यमंत्री मा. रवींद्र माने तसेच संस्था पदाधिकारी यांचे याअंतर्गत उपक्रमांना नेहमीच पाठबळ लाभत असते.

 महाराष्ट्र राज्य इनोवेशन सोसायटीतर्फे १३ व १४ सप्टेंबर रोजी स्टार्टअप स्पर्धा होत आहेत. कृषी, शिक्षण, आरोग्य व इतर विषयांवरील युवकांच्या स्टार्टअप कल्पनांचे यावेळी सादरीकरण होणार असून विजेत्यांना रोख रकमेची भरघोस पारितोषिके देण्यात येतील. जिल्हा व राज्य अशा दोन्ही स्तरावर विजेते निवडले जाणार असून त्यांना तज्ञ मार्गदर्शन, निधी व आवश्यक पाठबळ पुरविले जाणार आहे.

या स्पर्धेची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी  शासनाच्या रत्नागिरी येथील कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता सेंटरतर्फे  सहसंचालक मा. गणेश बितोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा सुरु आहे. दरम्यान गणेश मुंढे यांनी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना यात्रा वाहनावरील डिजिटल स्क्रीनद्वारे सखोल माहिती देऊन मार्गदर्शन केले. डॉ. महेश भागवत यांनी  याप्रसंगी आजच्या काळात विद्यार्थ्यांनी उद्योजकतेकडे जास्तीतजास्त वळण्याची गरज असल्याचे सांगून या यात्रेमुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मदत मिळेल असे म्हटले तसेच या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यानी हिरीहीरीने सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. यांनी समन्वयक प्रा. स्वप्नील राउळ, व प्राध्यापक सदस्य यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

 

Photos:

१.      महविद्यालयातील विद्यार्थ्यांना यात्रा वाहनावरील डिजिटल स्क्रीनद्वारे स्टार्टअप स्पर्धेसंबंधी माहिती देताना गणेश मुंढे सोबत प्राचार्य डॉ. महेश भागवत व प्राध्यापक

२.      महविद्यालयातील विद्यार्थ्यांना यात्रा वाहनावरील डिजिटल स्क्रीनद्वारे स्टार्टअप स्पर्धेसंबंधी माहिती देताना गणेश मुंढे सोबत प्राचार्य डॉ. महेश भागवत व प्राध्यापक

३.      महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा प्रसंगी श्री. गणेश मुंढे यांचे स्वागत करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत सोबत प्राध्यापक व विद्यार्थी





मुंबई विद्यापिठाच्या ५५ व्या युवा महोत्सवची प्राथमिक फेरी राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्साहात संपन्न

 प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मुंबई विद्यापीठाच्या   ५५  व्या युवा महोत्सवाची प्राथमिक फेरी अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाली. दक्षिण रत्नागिरी या प्रादेशिक विभागातील महाविद्यालायांतर्गत विद्यार्थ्यांच्या युवा महोत्सव निवड फेरीचे माने अभियांत्रिकीमध्ये हे तिसऱ्या वर्षी यशस्वी आयोजन करण्यात आले. प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे पदाधिकारी, मुंबई विद्यापीठाचे अधिकारी, महाराष्ट्राच्या कला व सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत अभिनेते व कलाकार, विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या महोत्सवामध्ये जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या अतिउत्कृष्ट कलाकृती पाहण्याची संधी मिळाली.

महोत्सवाचे उद्घाटन संस्थाध्यक्ष व माजी राज्यमंत्री मा. रवींद्र माने व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यानंतर विद्यापीठ गीत गायन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नागपूर विद्यापीठाचे डॉ. अरुण पाटील, प्राचार्य डॉ. महेश भागवत, मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ. निलेश सावे, जिल्हा समन्वयक डॉ. आनंद आंबेकर उपस्थित होते. याप्रसंगी प्रथम सर्व मान्यवरांचे संस्थेतर्फे यथोचित स्वागत करण्यात आले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी प्रास्ताविक करून महाविद्यालातर्फे स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

युवा महोत्सवाची माहिती देताना डॉ. आंबेकर म्हणाले कि, युवा महोत्सव हा स्पर्धा व व्यवस्थापन यांचा संगम असून यामध्ये प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत असते. डॉ. सावे यांनी हा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी वेगळी पर्वणी असून सर्वागीण विकासासाठीचा उपक्रम असल्याचे सांगून आयोजकांचे विशेष आभार मानले. मा. माने साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अभियांत्रिकी महाविदयालयामध्ये या महोत्सवाच्या आयोजनाचा विशेष आनंद आहे अशा कार्यक्रमांसाठी महाविदयालय यापुढेही सहकार्य करेल असे सांगितले. त्यांनी सर्वाना सुयश मिळावे अशी सदिच्छा व्यक्त केली. महाविदयालय समन्वयक प्रा. गणेश जागुष्टे यांनी आभार प्रदर्शन केले.

त्यानंतर महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये सहभागी स्पर्धकांच्याशास्त्रीय नृत्य, स्केचींग, पेंटिंग, क्ले मॉडेलिंग, कोलाज, मेहंदी, रांगोळी, कथाकथन, एकपात्री नाटक, हास्यप्रधान कथानक, वक्तृत्व यासारख्या २९ विविध कला व सांस्कृतिक प्रकारांच्या प्राथमिक फेरीतील स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये दक्षिण रत्नागीरी या प्रादेशिक विभागातील लांजा, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर या चार तालुक्यातील १७ महाविद्यालयामधून जवळपास ६५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सर्व स्पर्धांचे परीक्षण विद्यापीठ नियुक्त परीक्षकांनी केले. यामध्ये प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन केणी, नृत्य दिग्दर्शक देवेंद्र शेलार,प्रा. प्रकाश राजेशिर्के, श्री. दिगंबर राणे, श्री. महेश देशमुख यासारख्या  कला क्षेत्रातील मान्यवर आणि टेलिव्हिजनच्या विविध वाहिन्यांवरील मालिका व कार्यक्रमामधील अभिनेते व कलाकारांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

सायंकाळच्या शेवटच्या सत्रात, महाविद्यालयाच्या प्रशस्त प्रांगणात, दिव्यांच्या प्रकाशझोतात व सर्वांच्या उपस्थितीत तरुणाईच्या  आवडत्या  अशा लोकनृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये सहभागी विद्यार्थी गटांनी विविध लोकगीतांवर बहारदार व मनमोहक नृत्ये सदर करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

यानंतर झालेल्या समारोपप्रसंगी मा. माने साहेब,  विद्यापीठाचे पदाधिकारी, प्राचार्य, प्रद्युम्न माने आदी मान्यवरांच्याहस्ते सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात केली. तसेच इतर विद्यार्थ्यांनाही सहभाग प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. गोगटे जोगळेकर महाविदयालय रत्नागीरीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमाकांची नऊ, द्वितीय क्रमांकाची तीन तसेच तृतीय चार व उत्तेजनार्थ दोन अशा एकूण अठरा पारीतोषिकांसह या युथ फेस्टिवलमध्ये आपला ठसा उमटवला तर देवरूखच्या आठल्ये सप्रे महाविदयालयाने प्रथम क्रमाकांची सहा, द्वितीय क्रमांकाची तीन तसेच तृतीय सात व उत्तेजनार्थ एक अशी एकूण सतरा पारीतोषिके मिळविली. श्रीमान कीर लॉ कॉलेजने एकूण नऊ, रत्नागिरी सब सेंटर, नवनिर्माण कॉलेज, लांजा कॉलेज व फ़िनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालय रत्नागिरीने प्रत्येकी एकूण पाच पारितोषिके मिळवली. राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या शुभम वाघधरे व ओंकार सुर्वे यांनी इंग्लिश डिबेट प्रकारामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला.

विद्यापीठाच्या पदाधिका-यानी महाविद्यालयाचा परिसर  रमणीय व निसर्गरम्य असल्याचे यावेळी नमूद केले तसेच महाविद्यालयाने केलेल्या या महोत्सवाच्या उत्तम नियोजनाबद्दल महाविदयालय व्यवस्थापन, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी प्रतिनिधींचे आभार मानले. महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक प्रा. गणेश जागुष्टे, सर्व प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थी प्रतिनिधींनी महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. लक्ष्मण सावंत व भावना परब यांनी महोत्सवाचे विद्यार्थी समन्वयक म्हणून काम पहिले.

Photos: 








आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा २४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था आंबव संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाने १७ ऑगस्ट रोजी  आपल्या स्थापनेची २४ वर्षे पूर्ण केली. तसेच या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री श्री. रवींद्र माने यांचा या दिवशी ६४  वा वाढदिवस. त्यामुळे महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी वृंद,विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी हा उत्साहाचा दिवस असतो.

महाविद्यालयाने या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन  व नवनवीन उपक्रमांची सुरुवात केली. आंबव ग्रामदैवता कालीश्री देवीचे दर्शन झाल्यावर मा. माने यांचे महाविद्यालयामध्ये आगमन झाले. त्यानंतर सुरुवातीला महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांच्या सौभाग्यवती नेहा माने व अन्य सवाष्णीनी भारतीय परंपरेनुसार त्यांचे मंत्रोच्चाराच्या गजरात औक्षण करून अभिष्टचिंतन केले. याप्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी प्र. शि. प्र. संथेच्या कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहा माने, सचिव चंद्रकांत यादव,  सहसचिव दिलीप जाधव, खजिनदार सौ. जयश्री दळवी आदी संस्था पदाधिकारी तसेच माजी नायब तहसीलदार विजय दळवी,  प्राचार्य डॉ. महेश भागवत, प्रा. नितीन भोपळे, तालुक्यातील राजकीय नेतेमंडळी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.  

सुरीवातीला राजेंद्र माने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी सर्वांचे स्वागत केले. महाविद्यालयाच्या मागील चोवीस वर्षाच्या दैदिप्यमान कामगिरीचा त्यांनी आढावा घेत यशस्वी वाटचालीची उपस्थिताना माहिती दिली. तसेच महाविद्यालयाच्या वतीने मा. माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी, व विद्यार्थ्यांनी मा. माने यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

या दिवसाचे निमित्त साधून महाविद्यालयामध्ये नव्याने विकसित केलेल्या “स्मार्ट क्लासरूम” व महाविद्यालयाच्या एन एस एस विभागाने आयोजित केलेल्या “रक्तदान शिबीराचे”  मा. माने यांनी उद्घाटन केले. डेरवण येथील वालावलकर रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने घेतलेल्या या शिबिरात बहुसंख्य विद्यार्थी व कर्मचा-यानी रक्तदान केले. डॉ. विजय शिंदे, रवी अग्रवाल यांचे यासाठी सहकार्य लाभले. यानिमित्ताने महाविद्यालयामध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करून यावेळी गौरविण्यात आले. वार्षिक प्रथेप्रमाणे सत्यनारायण पूजाहि बांधण्यात  आली.

यानंतर मा. रविंद्रजी माने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या उभारणीपासून मागील चोवीस वर्षातील आपले अनुभवकथन केले. या महाविद्यालयातून बाहेर पडलेले सुमारे पाच हजाराहून अधिक विद्यार्थी इंजिनीअर विविध क्षेत्रामध्ये उत्तम योगदान देत आहेत. महाविद्यालयाच्या माध्यमातून आपल्याला कोकण तसेच पूर्ण देशाची सेवा करण्याची अशारितीने संधी मिळाली हे आपले भाग्य आहे असे ते म्हणाले. तसेच त्यांनी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी, व विद्यार्थी यांच्याकडून मिळालेल्या प्रेम व विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले.

यानंतर महाविद्यालयामध्ये  विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित केलेल्या स्नेह्भोजनाने समारंभाची सांगता झाली.

फोटो:

1.       मा. रविंद्रजी माने  यांचे औक्षण करताना सौ. नेहा माने व महाविद्यालयाच्या प्राध्यापिका

2.       मा. रविंद्रजी माने आपल्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभात बोलताना

3.       मा. रविंद्रजी माने यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत आणि सर्व विभागप्रमुख

4.       मा. रविंद्रजी माने यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयामध्ये आयोजित रक्तदान शिबीर प्रसंगी डेरवण येथील वालावलकर रुग्णालय रक्तपेढीचे रवी अग्रवाल, डॉ. विजय शिंदे यांचे स्वागत करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत






Friday, July 1, 2022

इंडिया टुडेच्या सर्वेक्षण क्रमवारीत माने अभियांत्रिकीचा समावेश ..

 साडवली :

इंडिया टुडे या प्रख्यात राष्ट्रीय मासिकातर्फे दरवर्षीप्रमाणे जुलै २०२२ मध्ये भारतातील

शासकीय तसेच खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात

संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी

महाविद्यालयाचा भारतातील सर्वोत्तम खाजगी महाविद्यालयांच्या क्रमवारीत सलग चौथ्या

वर्षी समावेश करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय

भारतात २३५ व्या तर महाराष्ट्रात ३४ व्या क्रमांकावर असून मुंबई विद्यापीठात ९ व्या

क्रमांकावर मानांकित झाले आहे. कोकणातील केवळ दोनच अभियांत्रिकी महाविद्यालयांचा या

राष्ट्रीय क्रमवारीत समावेश करण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या या यशामुळे कोकणच्या

शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला आहे.

इंडिया टुडे या मासिकाने घेतलेल्या सर्वेक्षणामध्ये विविध निकषांच्या आधारे भारतातील

महाविद्यालयांची क्रमवारी निश्चित करण्यात आली. या निकषांनुसार महाविद्यालयाची

सर्वांगीण माहिती, नॅक ऍक्रेडीटेशनची श्रेणी, प्रवेश प्रक्रिया, शिक्षण शुल्क, जमाखर्चाचा तपशील,

प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांची शैक्षणिक अर्हता व अनुभव, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय

परिसंवादातील सहभाग आणि शोधनिबंध सादरीकरण, देशविदेशातील माजी विद्यार्थी कार्यरत

असलेल्या नामांकित आस्थापनांची माहिती व माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या सर्वांगीण

प्रगतीसाठी हातभार, संदर्भग्रंथ आणि नामांकित नियतकालिकांनी समृद्ध ग्रंथालय, विद्यार्थी

आणि प्राध्यापकांचा औद्योगिक जगताशी असणारा नियमित संपर्क आणि त्याद्वारे विद्यार्थी

उद्यमशील होण्यासाठी केलेले प्रयत्न, विविध विषयावरील तज्ज्ञांची व्याख्याने व मार्गदर्शन,


महाविद्यालयाच्या आवारातील शैक्षणिक तसेच क्रीडाविषयक सोयीसुविधा इत्यादी बाबींवर

लक्ष केंद्रित करून राष्ट्रीय क्रमवारी निश्चित करण्यात येते.

या सर्वेमधील इन्फ्रास्ट्रक्चर अँड लिविंग एक्स्पीरिअन्स या निकषांमध्ये राजेंद्र माने

महाविद्यालयाने महाराष्ट्रात चौथा क्रमांक व मुंबई विद्यापीठात दुसऱ्या क्रमांक पटकावला

आहे. तसेच ऍकॅडेमीक एक्सलेन्स या निकषांमध्ये महाराष्ट्रात पंधराव्या व मुंबई विद्यापीठात

पाचव्या क्रमांकावर मजल मारली असून कोकणात या दोन्ही निकषांमध्ये पुन्हा एकदा प्रथम

क्रमांकावर कायम राखला आहे.

यापूर्वीही महाविद्यालयाला एआयसीटीइ-सी आय आय सर्वेक्षणामध्ये गोल्ड कॅटॅगरी तसेच

आय. एस. टी. ई. नवी दिल्ली यांचा बेस्ट कॅम्पस पुरस्कार प्राप्त झाला आहे.

या सर्वेक्षणामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या

पालकांना चांगले महाविद्यालय निवडणे सोपे जाणार आहे. पुणे, मुंबई यासारख्या मोठ्या

शहरांमधील महाविद्यालयांच्या तोडीचे दर्जेदार शिक्षण व सुविधा राजेंद्र माने सारख्या

महाविद्यालयाने ग्रामीण भागात उपलब्ध करून दिल्याबद्दल अनेक पालकांनी समाधान व्यक्त

केले असून कोरोनासारख्या महामारीचा धोका लक्षात घेऊन अनेक विद्यार्थी स्थानिक

पातळीवरील दर्जेदार उच्च शिक्षणाला व आरोग्यदृष्ट्या सुरक्षित कॅम्पसला पसंती देत आहेत.

या सर्वेक्षणासाठी समन्वयक म्हणून प्रा. मंगेश प्रभावळकर यांनी काम पाहिले. यासाठी प्राचार्य

डॉ. महेश भागवत यांचे मार्गदर्शन व इतर सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे

सहकार्य लाभले. सलग चौथ्या वर्षी सर्वोत्तम महाविद्यालयांच्या राष्ट्रीय क्रमवारीत स्थान

मिळवल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी पालकमंत्री श्री. रविंद्रजी माने , कार्याध्यक्षा सौ. नेहा

माने , उपाध्यक्ष श्री. मनोहर सुर्वे आणि सर्व संस्था पदाधिकारी यांनी महाविद्यालयाचे सर्व

विद्यार्थी,पालक आणि कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन केले आहे.


फोटो: कॉलेज फोटो सोबत जोडला आहे



Thursday, March 24, 2022

राजेंद्र माने महाविद्यालय देवरूख येथील एमबीए विभागातील विद्यार्थ्यांची स्कॉलर्स कट्टा पुणे कंपनीमध्ये निवड

 राजेंद्र माने महाविद्यालय देवरूख येथील एमबीए  विभागातील विद्यार्थ्यांची स्कॉलर्स कट्टा पुणे कंपनीमध्ये निवड

स्कॉलर्स कट्टा पुणे या ई लर्निंग सॉफ्टवेअर कंपनीने महाविद्यालयाच्या एम बी ए विभागातील नऊ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली आहे. विविध निवड चाचण्यांमधून एकूण  27 विद्यार्थ्यांपैकी नऊ विद्यार्थी यशस्वी झाले त्यामधील सात विद्यार्थ्यांना मार्केटिंग मॅनेजर पदावर रुजू करण्यात आले व दोन विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कु. अश्विनी मोहिते , कु. धनश्री साळवी , कु. मानसी अणेराव, कु अंकिता पिंपळकर, कु जुईली हिरवे,  कु पूजा गुरव, कु. सानिया वास्ता, शैलेश गुरव, ऋषिकेश खानविलकर यांचा समावेश आहे.

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय देवरुख येथे 2010 सालापासून एम बी ए विभाग कार्यरत आहे. आज या विभागातून अनेकानेक विद्यार्थी व्यवस्थापन शास्त्र या विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेऊन आपली कारकीर्द यशस्वीपणे पुढे नेत आहेत. या विभागातून आतपर्यंत दहा बॅचेस यशस्वी होऊन बाहेर पडल्या आहेत. व्यवस्थापन शास्त्र हे एक नुसते शिक्षण नसून विद्यार्थ्यांच्या यशस्वी कारकिर्दीसाठी एक अविभाज्य घटक आहे. या विभागातर्फे व्यवस्थापन शास्त्र त्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये याचे संपूर्ण ज्ञान तज्ञ  प्राध्यापकांकडून महाविद्यालय सातत्याने देत आहे. महाविद्यालयाचा एम बी ए विभाग मुंबई विद्यापीठाशी सलग्न असून यास ए आय सी टी ई नवी दिल्ली ची मान्यता आहे. तसेच संपूर्ण अभ्यासक्रम अद्ययावत मार्केटशी संलग्नित आहे. या दोन वर्षाच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना विविध विषयांचे ज्ञानाबरोबरच रिसर्च प्रोजेक्टचे सुद्धा ज्ञान दिले जाते. हे रिसर्च प्रोजेक्ट विद्यार्थ्यांची सर्व कौशले आणि विद्वत्ता यांचा एक समर्पक संगम आहे. 

हे महाविद्यालय व एमबीए विभाग नुसते शिक्षण देऊन थांबत नाही तर विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख बनवणे व त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे यासाठी प्रयत्नशील असते. यासाठी विविध शासकीय व निमशासकीय आस्थापनांची मदत मिळत असते. पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर यशस्वीपणे एखाद्या कंपनीमध्ये निवड होणे अनिवार्य असते आणि यासाठी सातत्याने कंपन्यांशी संपर्क साधणे इ. काम अविरतपणे चालू असते. याचेच फलित म्हणून अनेक नामवंत कंपन्या विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आपल्या कंपनीमध्ये विविध पदांवर घेण्यासाठी इच्छुक आहेत.

या प्लेसमेंट ड्राइव्ह साठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर व विभाग प्रमुख प्रा. मोहन गोसावी तसेच इतर सहकारी प्राध्यापक यांचे प्रयत्न विशेष कारणीभूत ठरले. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन मा. श्री.  रवींद्र माने तसेच प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी अभिनंदन केले.

 

 

Photo: सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे फोटो सोबत जोडले आहेत