Monday, April 2, 2018

माने अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील “सिंटीला २k१८” परिषदेचे भव्य आयोजन!!




फोटो: सिंटीला २k१८ उद्घाटनप्रसंगी संस्थाध्यक्ष मा.श्री.रवींद्रजी माने,कार्यकारी अध्यक्षा सौ.नेहाजी माने,उपाध्यक्ष श्री.मनोहर सुर्वे, प्राचार्य डॉ.महेश भागवत
 


जनरल चॅंम्पियनशिपची ट्रॉफी स्विकारताना राजेंद्र माने तंत्रनिकेतनचे विद्यार्थी व उपस्थित मान्यवर
देवरुख वार्ताहर:
  आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सिंटीला k१८ या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक परिषदेचे आयोजन करण्यात आले. इंजिनीअरिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांकडून वाढत्या अपेक्षा लक्षात घेता त्यांच्या सुप्त कल्पना विकसित व्हाव्यात,अभ्यासक्रमातील ज्ञानाचा वापर करून त्या आमलात आणता याव्यात तसेच त्याचा वापर इतर तंत्रज्ञ व समाजासाठी व्हावा हा विचार त्यांच्यामध्ये जागृत व्हावा या उद्देशाने राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय मागील काही वर्षे  सिंटीला” चे राष्ट्रीय स्तरावर आयोजन करते.यामध्ये विविध महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थीनीकरिता नाविन्यपूर्ण स्पर्धांचा समावेश असतो.

  १६ ते १७ फेब्रुवारी दरम्यान महाविद्यालयाच्या प्रशस्त प्रांगणात विविध स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये पेपर प्रेझेंटेशन,कॅलसी वॉर,लॅन गेमिंग,प्रोग्रामिंग,फुट्साल,कार क्विझ,रोबो रेस,ग्रीन टेक्नोमॉडेल,स्पॉट फोटोग्राफी यासारख्या विविध स्पर्धांचा समावेश होता.परिषदेचे उद्घाटन संस्थाध्यक्ष मा.श्री.रवींद्रजी माने यांच्या शुभहस्ते कार्यकारी अध्यक्षा सौ.नेहाजी माने,उपाध्यक्ष श्री.मनोहर सुर्वे, प्राचार्य डॉ.महेश भागवत, राजेंद्र माने पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.एन बी.भोपळे, संयोजक डॉ.एस.एन.वाघमारे,समन्वयक प्रा.राहुल दंडगे, प्रा.गणेश जागुष्टे,सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व सहभागी स्पर्धक विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या उपस्थितीत पार पडले. मान्यवरांचे महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

  याप्रसंगी प्रथम संयोजक डॉ.एस.एन.वाघमारे यांनी परिषदेचा उद्देश स्पष्ट केला. प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी उपस्थितांना महाविद्यालयाची उज्ज्वल कामगिरी व विशेष प्रगतीचा आलेख मांडला व विविध जिल्ह्यातून आलेल्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. मा.श्री.रवींद्रजी माने आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की उद्याचा भारत घडविण्यासाठी कुशल व जाणत्या विद्यार्थ्यांची गरज आहे. अशाप्रकारच्या स्पर्धा व उपक्रम हे विद्यार्थ्यांना पैलू पाडण्याचे काम करतात.

  परिषदेच्या दुस-या दिवशी संस्थाध्यक्ष मा.श्री.रवींद्रजी माने, कार्याध्यक्षा सौ.नेहाजी माने, प्राचार्य डॉ.महेश भागवत, राजेंद्र माने पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.एन बी.भोपळे या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात कॉलेजचा निसर्गरम्य परिसर, प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे सहकार्य यामुळे प्रभावित झाल्याचे सांगितले.

  यावर्षी ही परिषद तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली होती व “जनरल चॅंम्पियनशिप” स्पर्धेचे विशेष आकर्षण होते. जनरल चॅंम्पियनशिपची ट्रॉफी आंबव येथील राजेंद्र माने तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी पटकावली.

  आभारप्रदर्शन प्रा. राहुल दंडगे यांनी केले.संपूर्ण परिषदेचे समन्वयक म्हणून प्रा. राहुल दंडगे व प्रा.गणेश जागुष्टे यांनी काम पाहिले.परिषद यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी तसेच स्वराज सावंत,अक्षय वारंग,राहुल झोरे,सुशांत धारवत,आकाश शेलार,ओंकार हेळेकर,सुयोग कोकाटे या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.दोन्ही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील तांबे व अभिजित मोहिते यांनी केले.      

माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रा.राजोपाध्ये यांच्या ‘अंतर्साद’ चे प्रकाशन





फोटो:- अंतर्साद या कवितासंग्रहाचे प्रकाशनप्रसंगी डावीकडून साम टीव्हीचे संपादक श्री.संजय आवटे, जय महाराष्ट्र टीव्हीचे संपादक श्री.तुळशीदास भोईटे, प्रा.राहुल राजोपाध्ये, ज्येष्ठ अभिनेते श्री.सचिन खेडेकर, कुबेर समूहप्रमुख श्री.संतोष लहामगे
   आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील ऑटोमोबाईल विभागाचे विभागप्रमुख प्रा.राहुल राजोपाध्ये यांच्या अंतर्साद या कवितासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते श्री.सचिन खेडेकर यांच्या हस्ते पार पडले.
   कुबेर समूहाच्या वतीने सोलापूर येथे पार पडलेल्या कुबेर संमेलन २०१८ च्या व्यासपीठावर हा सोहळा पार पडला.याप्रसंगी कुबेर समूहप्रमुख श्री.संतोष लहामगे,साम टीव्हीचे संपादक श्री.संजय आवटे तसेच जय महाराष्ट्र टीव्हीचे संपादक श्री.तुळशीदास भोईटे उपस्थित होते.
  प्रा.राहुल राजोपाध्ये यांनी इस्लामपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमधून पदवी तसेच मेकॅनिकल प्रोडक्शन इंजिनिअरिंगमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. अभियांत्रिकीसारख्या यंत्र आणि तंत्र यासारख्या जगामध्ये कार्यरत राहूनही त्यांनी काव्य क्षेत्रामध्ये आपला वावर सुरु ठेवला. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी कवितालेखनास सुरुवात केली.आजपर्यंत विविध स्पर्धांमध्ये त्यांच्या काही कविता पारितोषिक प्राप्त ठरल्या आहेत. काव्य लेखनाबरोबरच ललित लेख आणि लघुकथा लेखनामध्येही ते कार्यरत असून  कुबेर प्रकाशनाच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘आरंभ’ या लघुकथा संग्रहात त्यांची लघुकथा प्रसिद्ध झाली आहे.
   याप्रसंगी त्यांनी ज्येष्ठ विचारवंत श्री.आ.ह.साळुंखे,चला हवा येऊ द्या मधील पत्रलेखक श्री.अरविंद जगताप,जाऊबाई जोरात या मालिकेतील अभिनेते नंदू सावंत,रहस्य कथाकार श्री.सचिन परांजपे,ज्येष्ठ लेखक श्री.श्रीनिवास चितळे, ज्येष्ठ लेखिका अन्नपूर्णा पेंढारकर,प्रथितयश कवियत्री डॉ.वसुधा वैद्य, प्रबोधन संस्थाध्यक्ष श्री. रवींद्र माने तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांना अंतर्साद सप्रेम भेट दिला.त्यांनी श्री.राजोपाध्ये यांचे अभिनंदन केले.
  याबरोबरच श्री. राहुल राजोपाध्ये यांच्या कवितेची ९१ व्य अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये कविता वाचनासाठी निवड झाली.येत्या १६,१७,१८ फेब्रुवारीला गुजरातमधील बडोदा येथे साज-या होणा-या अ.भा.साहित्य संमेलनामध्ये ते आपल्या ‘धरा बिचारी’ या कवितेचे वाचन करणार आहेत.त्यासाठी परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सदर अंतर्साद हा काव्यसंग्रह पुणे येथील प्रकाशक श्री.जयंत भा.फाटक यांच्या तरलरंग प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला असून तो सर्वत्र उपलब्ध आहे.


Thursday, February 1, 2018

राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या “आरोहन२०१८” चा समारोप !!



1) समारोप प्रसंगी आदर्श विद्यार्थीनी म्हणून इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम विभागाची कु.शलाका राव हिस  गौरवताना संस्थाध्यक्ष मा.श्री. रवींद्रजी माने,कार्यकारी अध्यक्षा सौ.नेहा माने,संस्था प्रतिनिधी प्रद्युम्न माने, सन्माननीय अतिथी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री.अक्षय लिमये आदी मान्यवर
२) उत्तम खेळाडू म्हणून कॉम्प्युटर विभागाचा दिपक निकत यास गौरवताना संस्थाध्यक्ष मा.श्री. रवींद्रजी माने,कार्यकारी अध्यक्षा सौ.नेहा माने,संस्था प्रतिनिधी प्रद्युम्न माने, सन्माननीय अतिथी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री.अक्षय लिमये आदी मान्यवर
देवरुख वार्ताहर:
 आंबव येथील  प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आरोहन २०१८ चा समारोप समारंभ मान्यवरांची उपस्थिती, कला क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा बक्षीस समारंभ तसेच विद्यार्थी विद्यार्थीनींच्या गीत व नृत्यांनी सजलेली रात्र अशा उत्साही वातावरणात पार पडला.
  समारंभाला या वर्षी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.पी.प्रदीप (आयएएस,कलेक्टर,रत्नागिरी जिल्हा) व सन्माननीय अतिथी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री.अक्षय लिमये (मॅनेजर,फिडीलीटी इन्फो.सर्व्हिसेस,पुणे) तसेच आपल्यात असलेल्या विविध कलागुणांमुळे नाव कमावलेले माजी विद्यार्थी समरजित  पाटील,तेजस शिंदे,प्रितेश मंगले,अभिजित गानू,अजय पाटील उपस्थित होते.ह्या सर्वांची उपस्थिती व त्यांचे मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांसाठी प्रमुख आकर्षण ठरले. त्याचबरोबर संस्थाध्यक्ष मा.श्री. रवींद्रजी माने,कार्यकारी अध्यक्षा सौ.नेहा माने,संस्था प्रतिनिधी प्रद्युम्न माने,उपाध्यक्ष श्री.मनोहर सुर्वे, चंद्रकांत यादव(सेक्रेटरी),श्री.दिलीप जाधव(जॉईंट सेक्रेटरी),श्री.बाळ माने(सरपंच आंबव),श्री.संदीप कदम(तहसीलदार),श्री.सुरेंद्र माने (माजी एसटी डेपो मॅनेजर),प्राचार्य डॉ. महेश भागवत,सर्व विभागांचे विभागप्रमुख तसेच पत्रकार उपस्थित होते.
  कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीवंदन व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.त्यानंतर प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील मान्यवरांचे महाविद्यालयाच्या वतीने शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यानंतर प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी गतवर्षातील महाविद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल सादर करताना महाविद्यालयाला नुकत्याच मिळालेल्या नॅकच्या बी प्लस मानांकनाचा,एआयसीटीई सीआयआय सर्व्हेमध्ये सलग दुसर्यांदा मिळालेल्या सुवर्णश्रेणीचा तसेच आयएसटीई या संस्थेकडून महाराष्ट्र व गोवा विभागासाठीचा बेस्ट इंजिनीअरिंग कॅम्पस या अॅवॉर्डचा आवर्जून उल्लेख केला.विविध विभागातील विद्यार्थ्यांचे निकाल,त्यांनी विविध स्पर्धांमध्ये मिळवलेले उल्लेखनीय यश,त्याचबरोबर प्राध्यापकांनी पीएचडी,सेट,एनपीटीईएल सारख्या परीक्षांमध्ये मिळवलेल्या यशाचाही उल्लेख केला. तसेच महाविद्यालयाने विविध कंपन्यांशी केलेले सामंजस्य करार व त्याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेले मार्गदर्शनपर कोर्सेस यांची माहिती दिली.
   डॉ.एस.एन.वाघमारे यांनी प्रमुख अतिथींची ओळख करून दिली.प्रमुख पाहुणे श्री.पी.प्रदीप यांनी विद्यार्थ्यांशी हसतखेळत संवाद साधला.जीवनाचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे व जीवनात समतोल साधणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.महाविद्यालय कोकणाच्या विकासासाठी कार्यरत असून महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख असाच वाढत जावो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.माजी विद्यार्थी श्री. अक्षय लिमये यांनी आपला अनुभव सांगताना आपल्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, ग्लोबलायझेशनमुळे परदेशातील कंपन्या भारतात येत असून त्यासाठी कुशल इंजिनीअर व तंत्रज्ञांची गरज भासणार आहे.माने साहेबांनी याचा अचूक वेध घेत आपल्या कठोर परिश्रमांनी,आवडीने व सामाजिक बांधिलकीतून हे महाविद्यालय उभारले आहे.असेच कठोर परिश्रम व झोकून देण्याची वृत्ती विद्यार्थ्यांनी अंगी बाळगावी असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.यश मिळवण्यासाठी प्रामाणिकपणा,संयम व कठोर परिश्रम हि त्रिसूत्री आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
   श्री माने साहेब आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की आंबव सारख्या गावात महाविद्यालय उभारणे हे अतिशय अवघड व आव्हानात्मक काम होते.पण ते आम्ही पेलले व आज त्या छोट्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झालेले पाहताना अतिशय आनंद होत आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले हे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांसमोरील उदाहरण आहे. तसेच त्यांच्याप्रमाणे तुमचाही सत्कार करण्याची संधी आम्हाला मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर घेण्यात आलेल्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा बक्षीस व प्रमाणपत्र वितरण सोहळा मान्यवरांच्या  हस्ते पार पडला. माजी विद्यार्थी समरजित पाटील,तेजस शिंदे,प्रितेश मंगले,अभिजित गानू,अजय पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.आदर्श विद्यार्थी म्हणून इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम विभागाची विद्यार्थिनी कु.शलाका राव व उत्तम खेळाडू म्हणून कॉम्प्युटर विभागाचा दिपक निकत यांना गौरवण्यात आले.
  शेवटी  विद्यार्थी विद्यार्थीनिंनी रंगीबेरंगी प्रकाशयोजनेत विविध हिंदी-मराठी गीतांवर नृत्याविष्कार सदर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस.डी.देठे तसेच विद्यार्थी स्वप्नील तांबे व सिद्धी सावंत यांनी केले.आभार प्रदर्शन प्रा.विश्वनाथ गुरव यांनी केले. संपूर्ण आठवडाभर चाललेल्या या स्नेहसंमेलनाच्या यशस्वितेसाठी क्रीडा समन्वयक प्रा.विकास मोरे,सांस्कृतिक विभाग समन्वयक प्रा.विश्वनाथ गुरव,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी प्रमुखांचे मोलाचे सहकार्य लाभले.