Friday, March 3, 2017

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘थ्रीडी प्रिंटर’कार्यशाळा संपन्न!!!!

आंबव(देवरुख) येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यांत्रिकी विभागातर्फे ‘थ्रीडी प्रिंटर’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय व राजेंद्र माने तंत्रनिकेतनच्या ४८ विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रोबोकार्ट, मुंबई यांच्या तर्फे श्री योगेश भोळे उपस्थित होते.रोबोकार्ट, मुंबई व आय. आय.टी. मुंबईच्या इनोव्हेशन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने होई विद्यार्थ्यांना संपन्न झाली.
    या कार्यशाळेमध्ये ‘थ्रीडी प्रिंटर’ या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.पारंपारिक उत्पादन यंत्रसामुग्रीपेक्षा थ्रीडी प्रिंटरची उपयुक्तता या विषयी सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेनुसार डिझाईन केलेल्या मॉडेलना थ्रीडी प्रिंटरच्या सहाय्याने प्रत्यक्षात निर्माण करण्यात आले. थ्रीडी प्रिंटर तयार करण्याचे मार्गदर्शनही या कार्यशाळेत करण्यात आले.
    विभागप्रमुख प्रा. भंडारी यांनी यावेळी बोलताना सांगितले की १० वर्षांपूर्वी थ्रीडी प्रिंटरची किंमत २४ लाख रुपयांच्या आसपास होती. जी आज साधारणपणे ५० ते ६० हजार रुपये  इतकी कमी झाली आहे यामुळे आधुनिक तंत्रज्ञान हे सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये आले आहे . ज्याचा उपयोग स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी यापुढे निश्चितपणे करता येईल.
  प्राचार्य डॉ.भागवत यांनी थ्रीडी प्रिंटरची भविष्यकाळातील उपयुक्तता नमूद करून अभियांत्रिकीच्या सर्वच क्षेत्रात या तंत्रज्ञानाद्वारे निर्मितीला प्रचंड वाव असल्याचे सांगितले. रोबोकार्ट तर्फे प्रत्यक्ष थ्रीडी प्रिंटर महाविद्यालयात उपलब्ध करून विद्यार्थ्यांना स्वतः त्यावर निर्मिती करण्याची संधी दिल्यामुळे सहभागी विद्यार्थ्यांनिई समाधान व्यक्त केले व यापुढेही अशा प्रकारच्या कार्यशाळा नेहमी आयोजित केल्यास सहभागी होण्याची ग्वाही दिली.

   ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रमुख समन्वयक प्रा. राहुल दंडगे व प्रा. अरुण जावीर यांच्यासह विद्यार्थी  समन्वयक प्रथमेश भोगले व हर्षाली माकडे यांनी विशेष परिश्रम घेतले. यांत्रिकी विभागातील इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी महत्वपूर्ण साहाय्य केले. विभागप्रमुख प्रा. संजय भंडारी व प्राचार्य डॉ.महेश भागवत यांच्या विशेष मार्गदर्शनामुळे कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली.अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयी विद्यार्थ्यांना परिपूर्ण बनवण्यासाठी महाविद्यालयाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही विद्यार्थ्यांना या कार्यशाळेच्या निमित्ताने देण्यात आली.

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ‘ग्रंथ प्रदर्शनाचे’ आयोजन!!


  राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ग्रंथालय विभागातर्फे दि.१९ व २० फेब्रुवारी २०१७ रोजी विद्यार्थ्यांसाठी ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले.सदर ग्रंथप्रदर्शनात मराठी व इंग्रजी वाड:मयावर आधारित ग्रंथ,व्यक्तिमत्त्व विकास,स्पर्धा परीक्षासंदर्भात ग्रंथ व भारतीय/आंतरराष्ट्रीय मासिकांचे प्रदर्शन भरवण्यात आले.
  सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन मा.श्री.रविंद्रजी माने,विश्वस्त श्री.दिलीप जाधव व श्री.चंद्रकांत यादव यांची उपस्थिती होती. उद्घाटनप्रसंगी मा.श्री.रविंद्रजी माने यांनी सांगितले कि अशा ग्रंथप्रदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा कारण त्यातून व्यक्तिमत्त्व विकास होऊ शकतो.या ग्रंथप्रदर्शनात २००० पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. प्रदर्शनासाठी ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी भेट दिली.
  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत, ग्रंथालयप्रमुख प्रा.जितेंद्र खैरनार, ग्रंथालय कर्मचारी ,प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.       

राजेंद्र माने अभियांत्रिकीचा कुणाल भिडे संगीत विशारद !!


  राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक विभागाचा तृतीय वर्षामध्ये शिकणारा कुणाल भिडे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय संचलित संगीत विशारदही परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाला. गांधर्व महाविद्यालय मंडळ हे भारतीय शास्त्रीय संगीताच्या उन्नतीसाठी कार्यरत असून वाशी स्थित मंडळाशी १२०० संस्था आणि ८०० परीक्षा केंद्रे संलग्न आहेत. भारतातील आसाम पासून ते केरळ पर्यंत विविध परीक्षा केंद्रातून प्रारंभिक ते संगीताचार्य अशा परीक्षांना दर वर्षी सुमारे एक लाखांपेक्षा जास्ती विद्यार्थी बसतात.
  अशाच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाशी संलग्न ‘देवरुख ललित कला अकादमी,देवरुख’ या परीक्षामंडळामध्ये कुणाल भिडे संगीत विशारदही परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाला. कुणालला लहानपणापासूनच गाण्याची आवड,त्यातच त्याची आत्या शिल्पा मुंगळे यांच्या प्रोत्साहनामुळे त्याची ही आवड वृद्धिंगत झाली. राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाल्यानंतर त्याला युथ फेस्टिवल,भारतीयम,आरोहन यासारखी व्यासपीठे उपलब्ध झाल्यामुळे त्याच्या उपजत कलागुणांना अधिकच वाव मिळाला.
   त्याच्यावर रत्नागिरी येथील सौ.संगीता बापट तसेच सौ.राधा भट या गुरूंचे संस्कारही झाले.त्यातच कथ्थक अलंकार शिल्पा मुंगळे यांनी नुसते गाणे गाण्यापेक्षा स्वत:चे गाणे विविध परीक्षांच्या माध्यमातून अधिक तंत्रशुद्ध करण्याचे आवाहन केले.त्यामुळे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या माध्यमातून त्याने शास्त्रीय संगीताच्या विविध परीक्षा देण्यास सुरुवात केली.
   या परीक्षामालेतील ‘संगीत विशारद’ हि सातवी परीक्षा तो प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाला.आपल्या यशाचे श्रेय तो गुरु आणि पालकांना देतो तसेच आपल्या यशामध्ये कथ्थक अलंकार शिल्पा मुंगळे यांची भागीदारीही व्यक्त करतो. ‘संगीत विशारद’ झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना कुणाल म्हणाला कि गेली इतकी वर्षे तो जी संगीताची सेवा करत आहे त्या संगीत सेवेमध्ये परीक्षा या वेगळा दृष्टीकोन देतात,अशा परीक्षांमधूनच विचारांची प्रगल्भता निर्माण होते.
 

  कुणालच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष श्री.रवींद्रजी माने तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले.

माने अभियांत्रिकीच्या सहा संशोधन प्रकल्पांची निवड !!


 वर्षी प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहा संशोधन प्रकल्पांची विद्यापीठ अनुदान मंडळातर्फे संशोधन अनुदान उपक्रमांतर्गत निवड करण्यात आली. यामध्ये मेकॅनिकल विभागामधून प्रा. प्रशांत क्षीरसागर, प्रा. अरुण जावीर, ऑटोमोबाईल विभागातून प्रा.राहुल वाटेगावकर, अणुविद्युत आणि दूरसंचार विभागातून प्रा.सुनील अडूरे, प्रा.इसाक शिकलगार तसेच भौतिकशास्त्र विभागातून प्रा. शिल्पा फलटणे यांच्या प्रकल्पांना मुंबई विद्यापीठातर्फे अनुदानाची घोषणा करण्यात आली. मुंबई विद्यापीठातर्फे अभियांत्रिकी तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये अत्याधुनिक संशोधनाला चालना मिळावी या उद्देशाने विविध संशोधन प्रकल्पांची निवड करण्यात येते.
   याअंतर्गत गेल्याचवर्षी प्रा.राहुल राजोपाध्ये, प्रा.अच्युत राउत प्रा.वैभव डोंगरे यांच्या संशोधन प्रकल्पांना अनुदानीत करण्यात आले होते.हे तीन संशोधन प्रकल्प पूर्णत्वास जात असतानाच नवीन सहा संशोधन प्रकल्पांची निवड झाल्याने महाविद्यालयातील गुणवत्तेला चालना मिळाली आहे. यावर्षी मंजूर झालेल्या प्रकल्पांमध्ये प्रा. प्रशांत क्षीरसागर यांनी डिशवॉशिंग मधील मानवी कष्ट कमी करण्याच्या उद्देशाने
डिशवॉशर वरती प्रयोगात्मक संशोधन करून वेळ व चलन बचतीचे मार्ग सुचवणार आहेत. प्रा. अरुण जावीर हे अभियांत्रिकीमध्ये सर्वाधिक वापर होणा-या कपलिंग करिता वेगवेगळ्या शिम  मटेरीयलच्या निवडीवरती प्रयोग करून निष्कर्ष काढणार आहेत. यामध्ये ‘ANSYS’ यासारख्या आधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करणार आहेत.
   प्रा.राहुल वाटेगावकर हे ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये विविध वाहनांच्या डॅंम्परमध्ये एम.आर. फ्लुईड चा वापर करून वाहनामधील व्हायब्रेशन कमी करून वाहन प्रवास अधिक आरामदायक कसा करता येईल यावर संशोधन करणार आहेत. प्रा.सुनील अडूरे हे सौरउर्जेवर आधारित स्वयंचलित ड्रीप इरिगेशनचा वापर करून शेतीमधील पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्यासंदर्भात कार्य करणार आहेत. प्रा.इसाक शिकलगार हे पोल्ट्री व्यवसायाला उपयुक्त असे अंडी उबवणी यंत्रातील उर्जेचा सुनियोजित वापर होण्याकरिता या यंत्राची सुधारित आवृत्ती बनविणार आहेत तसेच प्रा. शिल्पा फलटणे पदार्थ विज्ञान या विषयांतर्गत जल प्रदूषण कमी करण्यासाठी संशोधन करणार आहेत.
   महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी प्राध्यापकांचे अभिनंदन करताना सांगितले कि शेती, पोल्ट्री,वाहन उद्योग,गृहोपयोगी उद्योग,जलशुधीकरण यांसारख्या सर्वसामान्यांशी निगडीत अशा विषयांवरती संशोधन करून अभियांत्रिकीचा उपयोग सर्वसामान्यांना करून देण्यामध्ये या प्राध्यापकांचे संशोधनाअंती मोठे योगदान होईल.संस्थाध्यक्ष श्री. रवींद्र माने यांनी सांगितले कि संशोधन कार्यामध्ये महाविद्यालय नेहमीच अग्रेसर राहिले असून यापुढील काळामध्ये सुद्धा प्राध्यापकांना संशोधन सुविधा निर्माण करून देण्यात येतील.
   प्रा.संजय भंडारी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत यांचे सर्वांना मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष श्री. रवींद्र माने यांनी या प्राध्यापकांचे अभिनंदन केले.



राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात “एम्बेडेड टेक्नोलॉजी” वर कार्यशाळा संपन्न !!




 1) कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रोलिफिक सिस्टिम्सचे तज्ञ, समन्वयक प्रा. इसाक शिकलगार
2) समारोप प्रसंगी प्रोलिफिक सिस्टिम्सचे तज्ञ,  प्राचार्य डॉ.भागवत, विभागप्रमुख प्रा.अडूरे, समन्वयक प्रा. इसाक शिकलगार

आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या  अणुविद्युत व दूरसंचार विभागातर्फे एम्बेडेड टेक्नोलॉजी ” या विषयांतर्गत नुकतीच सहा दिवसांची कार्यशाळा संपन्न झाली.हि कार्यशाळा तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली व त्याला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. एकूण ५३ विद्यार्थ्यांनी सदर कार्यशाळेचा लाभ घेतला.  
    या कार्याशाळेला श्री.राजेश रागासे व श्री.गणेश ओझा (प्रोलिफिक सिस्टिम्स प्रा.लि.,पुणे) या तज्ञांचे मार्गदर्शन लाभले.हि कार्यशाळा एम्बेडेड टेक्नोलॉजी विषयाचे सखोल ज्ञान,त्याची व्याप्ती विद्यार्थ्यांना समजावी तसेच त्याविषयीच्या कौशल्याची वृद्धी व्हावी या उद्देशाने आयोजित केली होती.अशा कोर्सेसना भारत सरकारच्या ‘नॅशनल स्किल डेव्ह्लपमेंट कॉर्पोरेशनची’ मान्यता आहे. महाविद्यालयाने याच कारणास्तव प्रोलिफिक सिस्टिम्स प्रा.लि.,पुणे यांच्याशी सामंजस्य करार केला आहे.
  या कार्याशाळेमध्ये मायक्रोकन्ट्रोलर व आर्म प्रोसेसर यांच्या ‘एम्बेडेड सी’ आणि ‘असेम्ब्ली’ भाषांमधून प्रोग्रॅमिंगद्वारे प्रात्यक्षिक करण्यावर भर देण्यात आला.किल आयडीइ,फ्लॅश मॅजिक या सॉफ्टवेअर माध्यमांचा उपयोग विद्यार्थ्यांनी केला.त्यामुळे या साधनांचा प्रत्यक्ष वापर करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. मायक्रोकन्ट्रोलरच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी मोटर ड्राईव्हर ,एल सी डी डिस्प्ले,कीपॅड इ.उपकरणांवर नियंत्रण कसे करावे याचे प्रात्यक्षिक केले.

  कार्यशाळेचा उद्देश विभागप्रमुख प्रा.अडूरे यांनी विषद केला.यावेळी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी सांगितले की नवीन तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख निर्माण व्हावी यासाठी महाविद्यालय सतत प्रयत्नशील असते.अशा कार्यशाळांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व आपले कौशल्य वाढवावे तसेच आपण मिळवलेले ज्ञान आपल्या ज्युनिअर्सना द्यावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी कार्यशाळा समन्वयक प्रा. इसाक शिकलगार,विभागप्रमुख प्रा.सुनिल अडूरे व अन्य शिक्षकेतर कर्मचा-यांनी विशेष मेहनत घेतली.

माने अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक वाहन दिनानिमित्त दोन दिवशीय दुचाकी दुरुस्ती कार्यशाळा संपन्न!!!!

 

फोटो: उद्घाटन प्रसंगी रत्नागिरी जिल्हा मोटार मेकॅनिक असोसिएशनचे अध्यक्ष श्री. फय्याज खतीब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत, विभागप्रमुख प्रा. निमेश ढोले, ऑटोट्रेंड्सचे इनचार्ज प्रा.स्वप्नील राउळ 
आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील ऑटोमोबाईल विभागातर्फे ‘जागतिक वाहन दिन’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ऑटोट्रेंड्स’ या विद्यार्थी संघटनेने या उपक्रमांचे आयोजन केले होते. या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल मध्ये पार पडला.त्याकरिता  रत्नागिरी जिल्हा मोटार मेकॅनिक असोसिएशनचे अध्यक्ष श्री. फय्याज खतीब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत, विभागप्रमुख प्रा. निमेश ढोले, ऑटोट्रेंड्सचे इनचार्ज प्रा.स्वप्नील राउळ उपस्थित होते.
   प्रा.राउळ यांनी प्रास्ताविक केले. प्रा.निमेश ढोले यांनी उपस्थितांचे स्वागत करून मेकॅनिक असोसिएशनशी आपली असलेली बांधिलकी अधिक वृद्धिगत करण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी अशा उपक्रमांची गरज अधोरेखीत करून विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. श्री. फय्याज खतीब आपल्या भाषणात म्हणाले कि हुशार इंजिनिअर आणि कुशल कारागीर एकत्र आले की काय होऊ शकते हे अशा उपक्रमातून दिसून येते. मन ,बुद्धी आणि मनगट याच्या जोरावर आपण कोणताही आविष्कार घडवू शकतो.
   विनोद कळंबटे यांनी अद्ययावत वर्कशॉपची माहिती दिली. याअंतर्गत मेकॅनिक असोसिएशनचे श्री. फय्याज खतीब,मोहसीन वणू, विनोद कळंबटे, धनंजय कदम, गणेश शेंडे,सुशील कदम,तानाजी मंडले,दिलीप शिंदे,समीर शेटे,महेश पालकर या सदस्यांनी विद्यार्थ्यांना वाहन दुरुस्ती बाबत मार्गदर्शन केले.
  याप्रसंगी जागतिक वाहन दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरी जिल्हा मेकॅनिक असोसिएशन तर्फे दोन दिवशीय दुचाकी दुरुस्ती कार्यशाळेचे मोफत आयोजन करण्यात आले.तसेच सेलिब्रिटी कॅच, ऑटोमोबाईल क्रिकेट लीग या सारख्या स्पर्धाही घेण्यात आल्या.
  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनिकेत सुर्वे,चैतन्य परुळेकर, चिन्मय शितूत,मैत्रेय नागवेकर, रुपेश अवसरे,प्रथमेश जाधव यांनी मेहनत घेतली. ऑटोमोबाईल क्रिकेट लीगसाठी  श्री. केतन पवार, साईनाथ कोल्ड्रिंक्स,हॉटेल खमंग, हॉटेल गिरीराज,संतोष कोकाटे, अभिजित धामापूरकर,चिन्मय ट्रॅव्हल्स यांचे प्रायोजकत्व लाभले.      
 


माने अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबिर संपन्न‼





प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे एक आठवड्याचे ग्रामीण विकास विषयक जनजागृती युवक युवती शिबिर निवे बुद्रुक येथे पार पडले.शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी व्यसपीठावर पोलीस पाटील श्री. शांताराम इथपे,सचिव श्री. चंद्रकांत यादव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा.राहुल बेळेकर तसेच ग्रामस्थ प्रतिनिधी राजवाडे उपस्थित होते. प्रा.राहुल बेळेकर यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व जाणून घेऊन विद्यार्थ्यांनी ग्रामविकासाबाबत कार्य करण्याचे आवाहन केले.या शिबिरामध्ये महाविद्यालयाच्या सुमारे ४० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.
   या अंतर्गत निवे बसस्थानक ,स्मशानभुमी,सिद्धेश्वरमंदिर,मराठी शाळा परिसर, निवे सहान ,नागझरी या परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर निवे गावामध्ये सांडपाण्याच्या नियोजानासाठी दोन शोषखड्डे खोदण्यात आले.आरोग्यकेंद्रामध्ये ग्रामस्थांना पोहोचाण्यासाठीची अडचण लक्षात घेऊन रस्ता दुरुस्ती श्रमदानातून करण्यात आली त्याचबरोबर निवे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी विद्यार्थांनी करिअर मार्गदर्शन केले. एक आठवडा चाललेल्या या  शिबीरामध्ये योगा,श्रमदान याचबरोबर रोज व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले.
  या व्याख्यानमालेमध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायत सदस्य सौ. वेदा प्रभुदेसाई यांचे ‘ग्राहक संरक्षण कायदा’ या विषयावर तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्री. विनोद वायंगणकर यांचे ‘अंधश्रद्धा निर्मूलन व सर्पज्ञान’ या विषयावर व्याख्यान लक्षवेधक ठरले.कनिष्ठ महाविद्यालय देवरुखचे श्री. राजेंद्र राजवाडे यांनी युवपिढीसमोरील आव्हाने तर राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. संजय भंडारी यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर या विषयावर अत्यंत समर्पक विचार मांडले. राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हाध्यक्ष श्री.राहुल मराठे यांनी विद्यार्थ्यांना  प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय सेवा योजनेची माहिती दिली.
  सदर शिबीरामध्ये सहभागी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले त्याचे संयोजन शाहीद सोलकर, सुशांत धारवाड,समीर रसाळ यांनी केले. शिबीराच्या समारोपप्रसंगी सरपंच श्री.विजय शिंदे, ग्रामस्थ प्रतिनिधी राजवाडे दांपत्य,अनिता गुरव तसेच प्राचार्य डॉ. महेश भागवत उपस्थित होते. याप्रसंगी सरपंच श्री.विजय शिंदे यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमाचे कौतुक केले.

  शिबीर यशस्वी होण्यासाठी प्रा.विस्मयी परुळेकर,प्रा.माणिक पवार,श्री. समीर यादव, प्रा.गुरुप्रसाद बुर्शे,प्रा सुरेश कोळेकर,विनायक पास्ते याचबरोबर तुषार आग्रे,आदित्य जाधव,निकिता गांगण,जागृती काटे यांनी परिश्रम केले.   

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘रस्ता सुरक्षा अभियान’ !!!

  

   प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस महानिरीक्षक कार्यालय आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या राज्य रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
   याप्रसंगी व्यासपीठावर वाहतूक शाखा पोलीस इन्स्पेक्टर श्री. ए.एम. खान, सहाय्यक प्रादेशिक मोटार वाहन निरीक्षक श्री. विनोद वसईकर, श्री. आर.एस. ढोबळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत, तंत्रनिकेतन प्राचार्य डॉ.पाटील, विभागप्रमुख प्रा.निमेश ढोले, महाविद्यालयातील मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रमुख प्रा.राहुल राजोपाध्ये,निरीक्षक श्री.संदीप देसाई उपस्थित होते.सर्वप्रथम प्रा.राहुल राजोपाध्ये यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की दरवर्षी अपघातामध्ये मृत्युमुखी पडणा-या ८०% लोकांचे वय हे साधारणपणे १८ ते ३० वयोगटातील असते. राज्यातील तरुण मनुष्यबळाची जर अपघातामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हानी होत असेल तर राज्याच्या दृष्टीने ती चिंतेची बाब आहे.
    महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की महाविद्यालयीन युवकांसाठी सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे.त्यामुळे रस्ता सुरक्षेचे महत्त्व मुलांना उमजू शकेल. रस्ता सुरक्षेचा प्रश्न आता गंभीर होत चालला आहे व युवकांनीही हा विषय आता गांभीर्याने घेण्याची आता वेळ आली आहे. कारण स्पोर्टस् बाईक व कार चालविणार्यांचे प्रमाण खूप जास्त असून याचा विचार हि काळाची गरज आहे.त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकेल. वाहतूक शाखा पोलीस इन्स्पेक्टर श्री.खान यांनी केवळ वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करणे हा या मोहिमेचा उद्देश न ठेवता समाजप्रबोधनातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे यासाठी आम्ही कार्यरत आहोत असे सांगितले.
  यानंतर श्री. विनोद वसईकर यांनी दृकश्राव्य मध्यामाद्वारे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.हेल्मेटची आवश्यकता, वेगमर्यादा, अपघातांची कारणे,घ्यावयाची काळजी याबाबत चलचित्रांद्वारे जागृती केली. त्याला उपस्थित सुमारे ४५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.याप्रसंगी  प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे माहिती पत्रक व माहिती पुस्तिकेचे वितरण करण्यात आले.
    प्रा. राहुल राजोपाध्ये यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागप्रमुख प्रा.निमेश ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम समन्वयक  प्रा.राजोपाध्ये, अनिकेत सुर्वे ,दीपक जंगम,रुपेश अवसरे ,मानस जोशी,चिन्मय शितुत,मैत्रेय नागवेकर यांनी परिश्रम घेतले.