Monday, April 2, 2018

माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रा.राजोपाध्ये यांच्या ‘अंतर्साद’ चे प्रकाशन





फोटो:- अंतर्साद या कवितासंग्रहाचे प्रकाशनप्रसंगी डावीकडून साम टीव्हीचे संपादक श्री.संजय आवटे, जय महाराष्ट्र टीव्हीचे संपादक श्री.तुळशीदास भोईटे, प्रा.राहुल राजोपाध्ये, ज्येष्ठ अभिनेते श्री.सचिन खेडेकर, कुबेर समूहप्रमुख श्री.संतोष लहामगे
   आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील ऑटोमोबाईल विभागाचे विभागप्रमुख प्रा.राहुल राजोपाध्ये यांच्या अंतर्साद या कवितासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते श्री.सचिन खेडेकर यांच्या हस्ते पार पडले.
   कुबेर समूहाच्या वतीने सोलापूर येथे पार पडलेल्या कुबेर संमेलन २०१८ च्या व्यासपीठावर हा सोहळा पार पडला.याप्रसंगी कुबेर समूहप्रमुख श्री.संतोष लहामगे,साम टीव्हीचे संपादक श्री.संजय आवटे तसेच जय महाराष्ट्र टीव्हीचे संपादक श्री.तुळशीदास भोईटे उपस्थित होते.
  प्रा.राहुल राजोपाध्ये यांनी इस्लामपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमधून पदवी तसेच मेकॅनिकल प्रोडक्शन इंजिनिअरिंगमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. अभियांत्रिकीसारख्या यंत्र आणि तंत्र यासारख्या जगामध्ये कार्यरत राहूनही त्यांनी काव्य क्षेत्रामध्ये आपला वावर सुरु ठेवला. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी कवितालेखनास सुरुवात केली.आजपर्यंत विविध स्पर्धांमध्ये त्यांच्या काही कविता पारितोषिक प्राप्त ठरल्या आहेत. काव्य लेखनाबरोबरच ललित लेख आणि लघुकथा लेखनामध्येही ते कार्यरत असून  कुबेर प्रकाशनाच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘आरंभ’ या लघुकथा संग्रहात त्यांची लघुकथा प्रसिद्ध झाली आहे.
   याप्रसंगी त्यांनी ज्येष्ठ विचारवंत श्री.आ.ह.साळुंखे,चला हवा येऊ द्या मधील पत्रलेखक श्री.अरविंद जगताप,जाऊबाई जोरात या मालिकेतील अभिनेते नंदू सावंत,रहस्य कथाकार श्री.सचिन परांजपे,ज्येष्ठ लेखक श्री.श्रीनिवास चितळे, ज्येष्ठ लेखिका अन्नपूर्णा पेंढारकर,प्रथितयश कवियत्री डॉ.वसुधा वैद्य, प्रबोधन संस्थाध्यक्ष श्री. रवींद्र माने तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांना अंतर्साद सप्रेम भेट दिला.त्यांनी श्री.राजोपाध्ये यांचे अभिनंदन केले.
  याबरोबरच श्री. राहुल राजोपाध्ये यांच्या कवितेची ९१ व्य अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये कविता वाचनासाठी निवड झाली.येत्या १६,१७,१८ फेब्रुवारीला गुजरातमधील बडोदा येथे साज-या होणा-या अ.भा.साहित्य संमेलनामध्ये ते आपल्या ‘धरा बिचारी’ या कवितेचे वाचन करणार आहेत.त्यासाठी परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सदर अंतर्साद हा काव्यसंग्रह पुणे येथील प्रकाशक श्री.जयंत भा.फाटक यांच्या तरलरंग प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला असून तो सर्वत्र उपलब्ध आहे.


No comments:

Post a Comment