Tuesday, January 9, 2018

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये “CTRD 2k17” या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे आयोजन!!

फोटो:- उद्घाटनप्रसंगी डावीकडून व्यासपीठावर प्रमुख अतिथी व आयएसटीई न्यू दिल्लीचे अध्यक्ष प्रा.प्रतापसिंह देसाई, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत, सन्माननीय अतिथी व कार्यकारी परिषद आयएसटीई न्यू दिल्लीचे प्रतिनिधी प्रा.आर.के. सावंत, संस्था प्रतिनिधी श्री.प्रद्युम्न माने, सत्र अध्यक्ष व सरदार पटेल इंजिनीअरिंग कॉलेज मुंबई चे डॉ.एस.बी.राणे, आयोजक प्रा. अजित तातुगडे, सहआयोजक प्रा. लक्ष्मण नाईक
   देवरुख वार्ताहर:
  आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात “चेंजिंग टेक्नॉलॉजी अॅंड रुरल डेव्हलपमेंट CTRD 2k17 या विषयावर सलग दुसऱ्या शोधनिबंध परिषदेचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण विकासामध्ये तंत्रज्ञानाचा सहभाग अधोरेखित करणाऱ्या या परिषदेमध्ये विविध महाविद्यालयातील ५० शोधनिबंध मांडण्यात आले.परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी व्यासपीठावर प्रमुख अतिथी व आयएसटीई , न्यू दिल्लीचे अध्यक्ष प्रा.प्रतापसिंह देसाई,सन्माननीय अतिथी व कार्यकारी परिषद आयएसटीई ,न्यू दिल्लीचे प्रतिनिधी प्रा.आर.के. सावंत,सत्र अध्यक्ष व सरदार पटेल इंजिनीअरिंग कॉलेज मुंबई चे डॉ.एस.बी.राणे, संस्था प्रतिनिधी श्री.प्रद्युम्न माने,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत, समन्वयक प्रा. अजित तातुगडे,सह समन्वयक प्रा. लक्ष्मण नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

  आपल्या स्वागतपर भाषणात प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी उद्योग आणि शिक्षण संस्था यांच्यामधील दरी कमी करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे सांगितले.व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने भविष्यामध्ये कोकणातील सर्वोत्तम महाविद्यालय बनविण्याचा मानस प्राचार्य भागवत यांनी व्यक्त केला.नॅक मानांकनात नुकत्याच मिळालेल्या “बी प्लस” ग्रेडचा व एआयसिटीई च्या सुवर्ण श्रेणीचाही त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. त्यानंतर प्रा. नाईक यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.
   
  प्रमुख अतिथी व आयएसटीई,न्यू दिल्लीचे अध्यक्ष प्रा.प्रतापसिंह देसाई यांनी अत्यंत प्रभावी शैलीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. संस्थाध्यक्ष श्री.रवींद्र माने यांचे संस्थेप्रती असलेले समर्पण व प्रेरणादायी प्रयत्नांचे त्यांनी विशेष कौतुक केले.संस्थेप्रती व खासकरून कोकणाविषयी असलेला आपला स्नेहभाव त्यांनी व्यक्त केला. उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की आधुनिक तंत्रज्ञान हे दिवसेंदिवस झपाट्याने बदलत असल्याने उद्योगविश्वही बदलत आहे.त्यासाठी आपणालाही बदलावे लागेल व त्यादृष्टीने इंजिनिअर्स घडवावे लागतील.यासाठी विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनीही अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांना घडविण्याची व त्यांच्या क्षमता विकसित करण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांची आहे असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांची एखाद्या विषयाप्रती उत्सुकता वाढली पाहिजे व त्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे.बदलत्या तंत्रज्ञाचे आव्हान पेलण्यासाठी नजर, सोच व दिशा बदलो असा मंत्र त्यांनी दिला.

  संस्था प्रतिनिधी श्री.प्रद्युम्न माने यांनी उपस्थित मान्यवरांचे व सह्भागी स्पर्धकांचे स्वागत केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य व आत्मविश्वासाची असलेली कमतरता भरून काढण्याची आवश्यकता असल्याने त्यादृष्टीनेही संस्था प्रयत्न करत आहे.कोकणातील विद्यार्थी हुशार असून आपल्या क्षमता वाढवण्यावर त्याने भर द्यावा असे त्यांनी सांगितले.यानंतर सत्र अध्यक्ष व सरदार पटेल इंजिनीअरिंग कॉलेज मुंबई चे डॉ.एस.बी.राणे यांनी “लेसन्स लर्नड फ्रॉम लीन सिक्स सिग्मा प्रोजेक्ट्स” याविषयावर उपस्थितांना संबोधित केले.आपल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा असून त्याना पूरक वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

  त्यानंतर विविध महाविद्यालयातून आलेल्या विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी आपले शोधनिबंध दोन सत्रांमध्ये सादर केले.याकरिता तज्ञ परीक्षक म्हणून सरदार पटेल इंजिनीअरिंग कॉलेज मुंबई चे डॉ.एस.बी.राणे,फिनोलेक्स महाविद्यालयाचे डॉ.एस.व्ही.चौगुले,डॉ.व्ही.ए.भराडी उपस्थित होते. परिषदेमध्ये सादर झालेले शोधनिबंध IJSART या यु.जी.सी. मान्यताप्राप्त जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात येणार आहेत.

  निरोपसमारंभामध्ये मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली तसेच प्रत्येक विभागाच्या प्रथम विजेत्यास बक्षीस देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सत्र अध्यक्ष डॉ.संतोष राणे, डॉ.एस.व्ही.चौगुले,प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी आपली मनोगते व्यक्त केली.निवडक विद्यार्थी व प्राध्यापकांनीही परिषदेसंदर्भात आपली मनोगते व्यक्त करून परिषदेच्या सुयोग्य नियोजनाबद्दल आभार व्यक्त केले. समन्वयक प्रा. अजित तातुगडे यांनी परिषदेचा आढावा घेतला व सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे आभार मानले. संस्थेचे सहसचिव श्री.दिलीप जाधव यांनीही आपले विचार मांडले.सूत्रसंचालन प्रा.एस.डी.देठे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.प्रमोद वाईकर व प्रा.पी.पी.क्षिरसागर यांनी केले.

 
      

No comments:

Post a Comment