Tuesday, January 9, 2018

माने अभियांत्रिकीस नॅक ची “ बी प्लस ” श्रेणी प्रदान !




देवरुख (आंबव) येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी  महाविद्यालयाला नॅक अर्थात राष्ट्रीय मुल्यांकन प्रमाणन परिषदेने केलेल्या परीक्षणात पाच वर्षांसाठीबी प्लस  श्रेणी प्रदान केली आहे. शैक्षणिक संस्थांचे, तिथल्या शिक्षण पद्धतींचे आणि विद्यार्थ्यांच्या एकूणच विकासाचे मूल्यमापन करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने बंगळूरू येथे उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांचा शैक्षणिक दर्जा तपासून त्यांना अधिस्वीकृती देण्यासाठी नॅकअर्थात, राष्ट्रीय मूल्यांकन आणि    प्रमाणन परिषदेची स्थापना केली आहे.

  याच  परिषदेच्या त्रिसदस्यीय समितीने दिनांक 3 4 नोव्हेंबरला महाविद्यालयास भेट दिली. या समितीमध्ये  गुलबर्गा विद्यापीठचे माजी कुलगुरू डॉ. बी. जी. मुलीमणी, हिमाचल प्रदेश विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. अरविंद कालिया तसेच कोलकाता येथील जे.आय.एस.कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. उर्मीब्रता बन्ड्योपाध्याय यांचा सहभाग होता. त्यांनी सलग दोन  दिवस  कॉलेजमधील प्राचार्य, सर्व विभागप्रमुख, व्यवस्थापन, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक, ग्रंथालय, कॅण्टिन, क्रीडा विभाग, एनएसएस,डब्ल्यू.डी.सी.,टी.पी.सी.,ई.डी.सेल इत्यादी कमिटी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अशा सर्व घटकांशी संवाद साधून विविध बाबींचे परीक्षण केले. समितीने कॉलेजमधील पायाभूत सुविधांचे आणि व्यवस्थापनाची कार्यप्रणाली कर्मचाऱ्यांशी असलेल्या समन्वयाचे विशेष कौतुक केले. 
 
  महाविद्यालयात प्रा.डी.एम.सातपूते यांनी नॅक समन्वयक म्हणून काम पाहिले.सर्व शिक्षक  शिक्षकेतर कर्मचा-यांच्या उत्कृष्ट सांघिक कामगिरीमुळेच हे यश मिळाल्याचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी नमूद केले.या यशाबद्दल संस्थाध्यक्ष श्री रविंद्रजी माने यांनी सर्वांचे विशेष अभिनंदन केले. या महाविद्यालयाला बी प्लस श्रेणी प्राप्त झाल्याबद्दल देवरुखवासियांमधूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment