Saturday, December 17, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे आयोजन!!


  देवरुख वार्ताहर:
  आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात “ चेंजिंग टेक्नॉलॉजी अॅंड रुरल डेव्हलपमेंट ” या विषयावर शोधनिबंध परिषदेचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण विकासामध्ये तंत्रज्ञानाचा सहभाग अधोरेखित करणाऱ्या या परिषदेमध्ये विविध महाविद्यालयातील ४० शोधनिबंध मांडण्यात आले.परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी संस्थाध्यक्ष श्री.रवींद्रजी माने,सौ.नेहाजी माने,प्रमुख अतिथी आणि मूलतत्त्व व्याख्याते प्रा.नरेंद्र काटीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत,आयोजक प्रा. लक्ष्मण नाईक,सह आयोजक प्रा. मुश्ताक गडकरी तसेच तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील उपस्थित होते.

  याप्रसंगी आयोजक प्रा. नाईक यांनी  प्रास्ताविकामध्ये आयोजनाचा हेतू विषद केला.आपल्या स्वागतपर भाषणात प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी उद्योग आणि शिक्षण संस्था यांच्यामधील दरी कमी करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे सांगितले.व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे आयोजन करण्याचा मानस प्राचार्य भागवत यांनी व्यक्त केला.त्यानंतर प्रा. गडकरी यांनी  प्रमुख अतिथींची ओळख उपस्थितांना करून दिली.
   
  प्रमुख अतिथी श्री.काटीकर यांनी महाविद्यालयाने परिषद आयोजनासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले.ग्रामीण विकास आणि तंत्रज्ञान या परिषदेच्या मुलतत्वासंदर्भात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना
अभियांत्रिकी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा वापर त्यांच्या प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून,समाजोपयोगी गोष्टींसाठी करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले.आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये  संस्थाध्यक्ष श्री.रवींद्र माने यांनी ग्रामीण विकास हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय असल्याचे सांगितले. ग्रामीण विकासामध्ये राहणीमान,शिक्षण,आरोग्य आदी विषयांवरती चर्चा होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

  त्यानंतर विविध महाविद्यालयातील प्राध्यापकांचे शोधनिबंध दोन दिवशीय सत्रांमध्ये सादर करण्यात आले.याकरिता तज्ञ परीक्षक म्हणून फिनोलेक्स महाविद्यालयाचे डॉ.मिलिंद किरकिरे,प्रा. मिलिंद यादव, एसएसपीएम कणकवली महाविद्यालयाचे प्रा. एस.एस.मुल्ला व डॉ.बाणे उपस्थित होते. परिषदेमध्ये सादर झालेले शोधनिबंध IOSR जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात येणार आहेत.

  उत्तरार्धामध्ये निरोपसमारंभामध्ये मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. याप्रसंगी डॉ.महेश भागवत, डॉ.मिलिंद किरकिरे,प्रा. मिलिंद यादव,प्रा. बाणे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.सूत्रसंचालन प्रा.मनोज सादळे तर आभार प्रदर्शन समन्वयक प्रा.पांडुरंग मगदूम यांनी केले.


   

No comments:

Post a Comment